Wednesday, 22 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.05.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०१९ सायंकाळी ६.००

****



लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी उद्या व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या पावत्यांची आधी पडताळणी करून नंतरच मतमोजणी करावी, ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं अमान्य केली आहे. ठरल्याप्रमाणे मतमोजणीनंतर ही पडताळणी होईल, असं आयोगानं म्हटलं आहे. मात्र टपालानं आलेल्या मतपत्रिकांची मोठी संख्या लक्षात घेत अशा मतपत्रिकांची मतमोजणी इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधल्या मतांच्या आधी न होता, त्या मतांच्या मोजणीसोबत होईल, असा निर्णयही आयोगानं घेतला आहे.

दरम्यान, व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या पोचपावतींची पडताळणी मतमोजणीपूर्वी न करण्याचा निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या, अशा उपकरणांसंदर्भातल्या एका निकालातल्या तत्वाचं उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी दिली आहे.

यावर, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अविश्वास दाखवून विरोधक जनादेशाचा अनादर करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे.

****



लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मतमोजणीच्या पंचवीस फे-या होणार आहेत. येथील एकूण प्रक्रियेत सहाशे ते सातशे कर्मचारी सहभागी होतील, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातही मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. व्यवस्था सुरळीत असल्याचं जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची आज रंगीत तालीम झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे . अलिबाग इथंही मतमोजणीची रंगीत तालीम झाली. कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली आहे. निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता असणा-या तेहतीस  ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. सांगली, भिवंडी इथंही मतममोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

****



राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारपदाचा आज राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं उपेक्षा केल्यामुळं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं क्षीरसागर यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. क्षीरसागर यांनी काही वेळापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला.

****



परभणी इथले ज्येष्ठ साहित्यिक देवीदास कुलकर्णी यांचं आज परभणी इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले कुलकर्णी यांनी, परभणी इथं अखिल भारतीय साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, तसंच बालकुमार साहित्य संमेलनाचं यशस्वी आयोजन करण्यात मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या परभणीत अंत्यविधी होणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर आणि उपसभापती सुंदर गाडेकर यांच्या विरोधात दाखल अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. नऊ सदस्यांनी, गेल्या १७ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी आज सकाळी बोलावण्यात सभेला एकही संचालक हजर नसल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव बारगळल्याचं जाहीर केलं.

****



अंबाजोगाई नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी, भाजपच्या सविता शशिकांत लोमटे विजयी झाल्या आहेत. त्यांना २२ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंदडा गटाचे शेख खलील जलील यांना सहा मतं मिळाली. अंबाजोगाई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, काँग्रेस पक्षाचे सात असे आघाडीचे एकूण २२ नगरसेवक तर भाजपचे सहा नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात मतदान केलेल्या नगरसेवकांच्या विरोधात पक्षीय पातळीवर अहवाल पाठवणार असल्याचं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शेख रहीम यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: