Thursday, 23 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.05.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३  मे २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  देशभरातल्या ५४२ लोकसभा मतदार संघात आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी
Ø  आमदार स्थानिक विकास निधीतून दुष्काळ निवारणाची कामं करण्यास राज्य सरकारची मान्यता
Ø  बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश
Ø  नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर शीला भवरे यांचा राजीनामा
आणि 
Ø  मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष देवीदास कुलकर्णी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
****

 देशभरातल्या ५४२ लोकसभा मतदार संघात आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत आठ हजाराहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आंध्रप्रदेश, ओडिसा, सिक्किम आणि अरूणाचल प्रदेश या चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचीही आज मतगणना होईल.  दुपारनंतर निवडणूक निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राज्यात ४८ केंद्रांवर ही मतमोजणी होत आहे. यापैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजेच पस्तीस फेऱ्या होतील. त्या खालोखाल गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात प्रत्येकी तेहतीस तर बीड आणि शिरुर मतदारसंघात मतमोजणीच्या ३२ फेऱ्या होतील. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वात कमी सतरा फेऱ्या होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी बहुतेक सर्व निकाल संध्याकाळपर्यंत हाती येतील, असा अंदाज आहे.

 लोकसभा निवडणुकीच्या मतदान मोजणी बाबतचे निकाल आणि विश्लेषण आपण आकाशवाणी केंद्रावरून दिवसभर ऐकू शकाल. याशिवाय  आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाची अधिकृत यू ट्यूब वाहिनी, फेसबूक पेज, ट्विटर आणि आरएनयु औरंगाबाद डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम वरही या निकालांचं लाईव्ह प्रसारण सुरू आहे.
****

 दरम्यान, व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या पावत्यांची आधी पडताळणी करून नंतरच मतमोजणी करावी, ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. पूर्वी ठरल्याप्रमाणे मतमोजणी झाल्यानंतरचं या पावत्यांची पडताळणी होईल, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र यंदा टपाली मतपत्रिकांची मोठी संख्या लक्षात घेता, टपाली मतांची मोजणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या मतमोजणीसोबतच घेणार असल्याचं, आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
****

 केंद्रात भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए ऐवजी पर्यायी सरकार स्थापन करण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य भूमिका असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पीटीआयशी बोलत होते. यंदा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचं मलिक म्हणाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत, विक्रमी जागा जिंकेल, असा विश्वासही मलिक यांनी वर्तवला. २००९ मध्ये या पक्षानं आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे नऊ जागा जिंकल्या आहेत.
****

 सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियनं शिफारस केलेल्या चार न्यायमूर्तींच्या नावांवर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातले न्यायाधीश भूषण गवई, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, झारखंड उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, आणि गुवाहाटी उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांचा समावेश आहे.
****

 आमदार स्थानिक विकास निधीतून दुष्काळ निवारणासाठी विविध १३ प्रकारची कामं करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, नवीन नळ जोडणी उपलब्ध करुन देणं, नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन आणि टाकीच्या विशेष दुरुस्तीची कामं करणं, पाणीपुरवठा विहिरी खोल करणं, त्यामधला गाळ काढणं, नवीन विंधन विहिरी घेणं, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, खोलीकरण, विहिरी पुनर्जिवित करणं, नदीपात्रात बुडक्या घेणं अशा उपाय योजनांसाठी आता हा निधी खर्च करता येणार आहे.
****

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना –मनरेगा अंतर्गतच्या कामांना उपविभागीय अधिकारी स्तरावर मंजूर देण्यात यावी अशी सूचना रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रावल यांच्या उपस्थितीत काल मुंबईत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. कार्य मंजुरीसाठी वेळेचा होणारा अपव्यय टाळून लोकांना त्वरित रोजगार आणि कामांना मंजुरी मिळावी यासाठी या सूचना देण्यात आल्या.
****

 बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. त्यापूर्वी क्षीरसागर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं उपेक्षा केल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं क्षीरसागर यांनी सांगितल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर शीला किशोर भवरे यांनी काल राजीनामा दिला. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत भवरे यांनी, महापालिका आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर नवीन महापौर निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सेलू बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर आणि उपसभापती सुंदर गाडेकर यांच्या विरोधात दाखल अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. नऊ सदस्यांनी, गेल्या १७ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर काल चर्चा होणार होती. मात्र कालच्या सभेला एकही संचालक हजर न राहिल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव बारगळल्याचं जाहीर केलं. सध्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यात ही बाजार समिती असून १८ पैकी १६ संचालक हे बोर्डीकरांचे आहेत. अन्य दोन सदस्यांमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर अन्य अपक्ष आहे.
****

 अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी, भारतीय जनता पक्षाच्या सविता शशिकांत लोमटे विजयी झाल्या आहेत. काल झालेल्या निवडणुकीत लोमटे यांना २२ मतं मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंदडा गटाचे शेख खलील जलील यांचा सोळा मतांनी पराभव केला, शेख यांना ६ मतं मिळाली. अंबाजोगाई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, काँग्रेस पक्षाचे ७ असे आघाडीचे एकूण २२ नगरसेवक तर भाजपचे सहा नगरसेवक आहेत. पक्षाच्या विरोधात मतदान केलेल्या नगरसेवकांच्या विरोधात पक्षीय पातळीवर अहवाल पाठवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेख रहीम यांनी सांगितलं.
****

 मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि परभणीच्या साहित्यिक तसंच सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, देवीदास कुलकर्णी यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. कुलकर्णी यांनी, परभणी इथं अखिल भारतीय साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, तसंच बालकुमार साहित्य संमेनाचं यशस्वी आयोजन करण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचं रानशिन्या हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी परभणीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****

 लातूर -चाकूर रस्त्यावर आष्टामोड गावाजवळ काल सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जवान जखमी झाले. लातूर इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात जात असताना या जवानांच्या जीपला एका खाजगी वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: