Sunday, 5 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 05.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 May 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मे २०१९ दुपारी .०० वा.

****

ओडिशातल्या फोनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात बचाव आणि पुनर्वसनाचं कार्य सुरु आहे. भारतीय आरमारानं राज्य सरकारच्या समन्वयानं पुरी आणि उपनगरातल्या नुकसानग्रस्त भागात तीन पुनर्वसन केंद्रं सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओडिशाला भेट देणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही दिलं.

दरम्यान, वादळाची तीव्रता कमी होत असून, हे वादळ बांगलादेशकडे सरकत आहे. भुवनेश्वर विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरू झाली असून, अडकलेल्या प्रवाशांना विशेष विमानानं नवी दिल्लीला रवाना करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्येही कोलकाता इथून हवाई वाहतूक, रेल्वे आणि दूरसंचार सेवा पूर्वपदावर येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पश्चिम बंगालमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातल्या सात जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये बराकपूर, बोंगाव, श्रीरामपूर, हुगळी, अरंबग, हावडा आणि उलुबेरिया यांचा समावेश आहे. या ठिकाणी एक कोटी १६ लाख मतदार असून, ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रं, सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिसांच्या सुमारे ५८० कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत.

****

मध्य प्रदेशातल्या दुसऱ्या टप्प्यात सात मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. या राज्यात २९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं होतं. आता ११० उमेदवारांमध्ये ही लढत होणार असून, यासाठी एकूण १५ हजार २४० मतदान केंद्रं तयार केली गेली आहेत. एक कोटी १९ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

होशंगाबाद मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राव उदय प्रतापसिंग यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभा घेतली होती, तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिवान शैलेंद्र सिंह यांच्यासाठी रेवा, टिकमगढ, दमोह इथं प्रचारफेऱ्या काढल्या होत्या.

****

केवळ वायू प्रदूषणामुळे भारतात २०१७ या वर्षात तब्बल १२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेनं नुकतीच आपल्या अहवालात जाहीर केली आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान खात्याचे मंत्री हर्षवर्धन  यांनी हा दावा फेटाळून लावत, अशा अभ्यासाचा उद्देश फक्त नागरिकांना घाबरवणे, हाच असल्याचं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाचा संदेश घेऊन चंद्रपूरच्या इको-प्रो या संस्थेचे २५ दुचाकीस्वार राज्यभर परिक्रमा करीत आहेत. आज ते औरंगाबाद शहरात येणार असून, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आइन्स्टाईन सभागृहात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ते शहरातील इतिहास, गडकिल्ले आणि वन-पर्यावरणप्रेमींशी संवाद साधणार आहेत.

****

कार्ल मार्क्सच्या २०० व्या जयंतीनिमित्त मार्क्स विचारांची प्रासंगिकता या विषयावर आज मुक्त संवाद आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. खोकडपुऱ्यातल्या भाकप - आयटक कार्यालयात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन प्रा.भारत शिरसाट, भिमराव बनसोड, साथी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे आदींनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातले कवी गणेश घुले यांच्या सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहाला कल्याण इथल्या काव्य किरण मंडळाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. या मंडळाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सायंकाळी कल्याण इथं ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक अंजली बापट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोषाल याचा सामना हॉँगकॉँगच्या लिओ ऊ चुन मिंग याच्याशी आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा हिचा सामना हॉँगकॉँगच्याच ॲनी ऊ हिच्याशी होणार आहे.

काल झालेल्या उपान्त्य सामन्यात ज्योत्स्नानं मलेशियाच्या सहाव्या मानांकित शिवसंगरी सुब्रमण्यमचा पराभव केला, तर घोषालनं मलेशियाच्या इयान यॉ एनजीचा पराभव केला होता.

//***********//


No comments: