Sunday, 5 May 2019

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 05.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

०५ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातल्या पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात उद्या सोमवारी मतदान होणार आहे. दोन जिल्ह्यांमधल्या सहा विधानसभा मतदारसंघांतले सुमारे पाच लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ६९५ मतदान केंद्रं स्थापन करण्यात आली असून, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे गुलाम अहमद मीर आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे मेहबूबा मुफ्ती यांच्या नॅशनल कॉन्फरन्सचे हसनन मसूदी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. तसंच १० अपक्ष उमेदवारांसह १५ अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

देशभरात आज वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा होणार आहे. ओडिशामध्ये मात्र फोनी वादळाच्या तडाख्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून, या राज्याचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल, असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं कळवलं आहे.

****

परभणी शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून, महानगर पालिकेच्या वतीनं टंचाईग्रस्त भागामध्ये तसंच जलवाहिनीची सुविधा नसलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या सोबतच नागरीकांना विविध कार्यक्रम, समारंभांसाठी नाममात्र शुल्क आकारून आवश्यकतेनुसार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सार्वजनिक स्थळं, धार्मिक स्थळं, तसंच धार्मिक कार्यक्रमांसाठी पूर्वी प्रमाणेच टॅंकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी काल दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा गावात सुमारे २५ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्यानं संतप्त महिलांनी काल अजिंठा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. पंचायतीमधल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढत या महिलांनी खुर्च्यांची तोडफोड केली.

****

लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन-प्रशासन यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मात्र दुष्काळमुक्तीचा उपक्रम हा केवळ शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही. तर यामध्ये लोकसहभाग तितकाच आवश्यक आहे, असं मत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यानी व्यक्त केलं आहे.

निलंगा तालुक्यातल्या नणंद इथं ग्रामस्थांच्या वतीनं ४२ एकरातल्या जमिनीवर समतल चर खोदण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार घनमीटरचं काम श्रमदानातून, तर २४ हजार घनमीटरचं काम यंत्राच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे. काल या गावात पालकमंत्री निलंगेकर यांनी श्रमदानात ग्रामस्थांसोबत सहभाग घेतला.

****

लातूर शहरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक जनजागृती मोहिमेची काल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि आयुक्त एम. डी. सिंह यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या अंबेजोगाई रस्त्यावरच्या चार दुकानांविरूद्ध कारवाई करुन ती बंद करण्यात आली.


****

सांगली  जिल्ह्यात  लोकसभा निवडणुक  झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ही निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीकडे जाणार आहे, तर राष्ट्रवादीकडे असलेला जत विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला दिला जाणार आहे. जत, मिरज,  सांगली, कडेगांव-पलुस मतदार संघ काँग्रेसकडे राहणार आहेत. तर वाळवा, शिराळा, तासगांव, खानापूर-आटपाडी हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहेत.

या दोन्ही पक्षांनी संयुक्त आघाडी केली असल्यानं एकमेकांचे निवडणूक चिन्ह वापरण्याची उमेदवारांना मोकळीक देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आयपीएल क्रिकेटच्या दिल्ली इथं झालेल्या सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघानं सन रायजर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव केला. तसंच काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅप्टिल्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुपारी चार वाजता चेन्नई इथं, तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोलकाता इथं आठ वाजता सामना सुरु होणार आहे.

//***********//

No comments: