Friday, 18 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.10.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळेच महायुतीला जनाधार- पंतप्रधानांना विश्वास
** सरकारच्या निष्काळजीपणामुळे अर्थव्यवस्था कमकुवत -माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
** निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस; पदयात्रा आणि कोपरा बैठकांतून प्रचार शीगेला
आणि
** आशियाई कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेत औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकर हिला रौप्य पदक
****
गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळेच आज महायुतीला जनाधार मिळत असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी ते काल परळी इथं जाहीर सभेत बोलत होते. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन तसंच गोपीनाथ मुंडे यांचं पंतप्रधानांनी स्मरण करत, पंतप्रधानांनी बीड जिल्हा आणि भाजपचं पूर्वीपासूनचं प्रगाढ नातं असल्याचं सांगितलं. 
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या मुद्यावर बोलताना, पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. प्रत्येक घरात शुद्ध पेयजलाच्या पुरवठ्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यासंदर्भात तांत्रिक त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचण येत आहे, त्यांना सध्या रोख मदत केली जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
सातारा आणि पुण्यातही काल पंतप्रधानांनी सभा घेतली. एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची शक्ती भाजपला शिवाजी महाराजांच्या संस्कारातून मिळाली असून, भाजपकडे शिवाजी महाराजांचा संपूर्ण परिवारही आला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होण्यासाठी सरकारचा निष्काळजीपणा आणि असमर्थता कारणीभूत असल्याचं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आर्थिक मंदीचा फटका अनेक राज्यांना विशेषत: महाराष्ट्राला बसत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक तरुणांना कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागत असल्याची टीका त्यांनी केली. रोजगार निर्मिती करायची असेल तर सरकारनं अर्थव्यवस्था बळकट करून, व्यवसाय आणि उद्योगांना प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं मत मनमोहन सिंग यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नांदेड, लातूर तसंच सोलापूर इथं प्रचार सभा घेतल्या. मुदखेड तालुक्यात बारड इथं उपस्थित जनसमुदायाला मराठीतून संबोधित करताना, शिंदे यांनी, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात धरणं बांधली, या धरणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाकायापालट झाला असं शिंदे यांनी नमूद केलं. लातूर इथल्या प्रचार सभेत बोलताना शिंदे यांनी, राज्याच्या विविध भागात उद्योग बंद पडत असल्यानं महाराष्ट्र हे राज्य बेरोजगाराचं केंद्र झालं असल्याची टीका केली.
****
गेल्या पाच वर्षात महायुती सरकारनं महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे, त्यामुळे विकास हवा असेल तर भाजपला पर्याय नाही, असं भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या सभेत ते बोलत होते. भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. 
****
राज्यात काँग्रेस आघाडी सरकारनं पंधरा वर्षात केलेल्या कामापेक्षा जास्त काम भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते. राज्यात पुढच्या पाच वर्षात एक कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. नाशिक इथंही काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकसह जिल्ह्यातल्या सटाणा आणि पिंपळगाव इथं काल प्रचार सभा घेतली. कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी केली. ईडी किंवा अन्य सरकारी यंत्रणांचा भाजपा सरकार करत आहे इतका दुरूपयोग यापूर्वी कधीच झाला नव्हता अशी टीका त्यांनी केली. 

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रचार सभेला संबोधित केलं. भाजप सरकारनं कृषी कर्ज माफी चुकीच्या पध्दतीनं केलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत प्रभादेवी इथं सभा घेतली. शेतकरी आत्महत्या, रस्त्यांची अवस्था, विमुद्रीकरण आदी मुद्यावंरुन त्यांनी सरकारवर टीका केली.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल धुळ्यात प्रचारसभा घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना पंधरा वर्ष राज्याचं मोठं नुकसान केलं असल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथं सभा घेतली. भाजप सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही, असं ते म्हणाले.
****
अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारांना राजकारणात संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ काल विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी सभेला संबोधित केला. सध्या भडकलेली नकारात्मक राजकारणाची आग विझवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदयात्रा काढली होती. तर फुलंब्री मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी काल चिकलठाणा परिसरात प्रचारफेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
 ****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या सायंकाळी प्रचार थंडावेल, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार तसंच अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी काल सेलू शहरासह ग्रामीण भागात फिरून मतदारांशी संवाद साधला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातले अपक्ष उमेदवार डॉ. डी आर देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी काल पंढरपूर, वळदगाव इथं प्रचार रॅली काढली होती. दरम्यान, नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांची आज नांदेड इथं सभा होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदार संघातले महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांना निवडणूक विभागानं नोटीस बजावली आहे. प्रचार सभेत केलेल्या भाषणात पैसे वाटपाच्या वक्तव्यावरून लोणीकर यांना नोटीस बजावल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीसाठी राज्यभरात स्वीप मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. हिंगोली इथं काल मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी सायकल फेरी काढण्यात आली. यावेळी पोवाड्याच्या माध्यमातून तसंच विविध फलक झळकावत मतदारांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात आलं. नागरिक मोठ्या संख्येनं सायकल फेरीत सहभागी झाले.

जालना जिल्ह्यातल्या एक हजार ६५३ ठिकाणी स्थापन चुनाव पाठशालांमधून अडीच हजार शाळांमधले दीड लाख विद्यार्थी ग्रामीण भागात प्रभात फेरी काढून मतदारांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.

नंदुरबार इथं बारा शाळांच्या सात हजार विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या चिन्हाची मानवी साखळींद्वारे प्रतिकृती तयार केली होती.
****
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्वयंस्फूर्तीनं घराबाहेर पडून लोकशाही प्रक्रियेतलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजेच मतदान करावं, असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अप्पर महासंचालक रंजना देव शर्मा यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल फिरत्या मतदार जनजागृती रथाचं उदघाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. 
****
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातली १०६ मतदान केंद्रं दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक आठ मतदान केंद्रं ही लातूर शहर मतदारसंघातली असून, त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात सहा मतदान केंद्रं दिव्यांगांकडून चालवण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिले आहेत
****
संयुक्त अरब अमिरातीतल्या फुजैराह इथं झालेल्या आशियाई कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेत औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकर हिनं रौप्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी शर्वरी ही मराठवाड्यातली पहिली खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकं पटकावली.
****
हिंगोली इथले लोखंडाचे व्यापारी सुरेश निलावार यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं पुणे इथं निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज हिंगोली इथल्या कयाधु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...