Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यात विधानसभेच्या २८८,
तर हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. याचबरोबर राज्यातल्या
सातारा आणि बिहारमधल्या समस्तीपूर या दोन लोकसभा आणि १७ राज्यांतल्या ५१ विधानसभा मतदारसंघांसाठी
पोटनिवडणुका होत आहेत. या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार असून, मतमोजणी २४ ऑक्टोबरला
होणार आहे. राज्यात एकूण ३ हजार २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात २३५
महिलांचा समावेश आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी
कॉंग्रेस महाआघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा सर्वच
पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे.
हरियाणामधे भाजपा आणि काँग्रसमधेच
मुख्य लढत दिसत असून, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया पार्टी, बसपा सारख्या पक्षांचे
उमेदवार काही ठिकाणी उभे आहेत. एकूण एक हजार १६९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १०५ महिला
उमेदवारांचा समावेश आहे.
****
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता
लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्तीकर विभागाच्या तपास पथकानं मुंबईतून २९ कोटी रुपयांची
बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. मुंबईतल्या ३६ संवदेनशील मतदार संघांत शीघ्र कृती दलाच्या
तुकड्या प्राप्तीकर विभागानं तैनात केल्या आहेत. दरम्यान, अमरावती जिल्हयात विविध ठिकाणी
भरारी पथकानं काल रात्री २० हजारांच्या मुद्देमालासह, १४ लाख रूपये जप्त केल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड-हिंगोली मार्गावर हिवरा
पाटी इथं आचारसंहिता तपसाणी पथकानं दोन लाख ३३ हजार १५९ रुपये किमतीचा मद्याचा साठा
काल जप्त केला. मद्याची ही १०० खोकी, नांदेडहून माहूर इथं नेली जात असल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
राज्यात कालपासून परतीच्या
पावसानं सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, सांगली, अमरावतीसह मराठवाड्यातल्या
औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड, हिंगगोली, परभणी, उस्मानाबाद या ठिकाणी पावसानं शेतकऱ्यांचं
मोठं नुकसान केलं आहे. मराठवाड्यात एकूण २१ मंडळांत अतिवृष्टी झाल्याचं विभागीय आयुक्त
कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात
काल दुपारपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी आज पहाटे पावसाची तीव्रता वाढली
असून, गोदावरीसह गिरीजा, शिवना, दुधना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बहुतांश
गावांत वेचणीअभावी राहिलेला कापूस परतीच्या पावसात भिजला आहे. गंगापूर तालुक्यातल्या
गोदावरी काठच्या गावांतल्या पिकांना पुराचा फटका बसला आहे. पैठण तालुक्यातही जायकवाडी
परीसरात ढगाळ वातावरण कायम असून पावसाची शक्यता आहे. गंगापूरसह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड,
सोयगाव, फुलंब्री परिसरात शहरात पावसाचा जोर कायम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून
जोरदार पाऊस होत आहे. देगलूरनंतर काल रात्री नांदेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या
पावसामुळे वसरणी मंडळात ८९ मिलीमीटर व तुप्पा मंडळात ८७ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीची
नोंद झाली. या पावसामुळे कापणी केलेल्या, तसंच कापणीला आलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात
नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
इथला विष्णुपुरी प्रकल्प आज
सकाळी साडेसात वाजता पूर्ण क्षमतेनं भरला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या
पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक पाहून बंधाऱ्याचा
एक दरवाजा सकाळी उघडण्यात आला आहे.
बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस
असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना प्रशासनानं सावधगिरीच्या सूचना दिल्याचं विष्णुपुरी
प्रकल्पाच्या शाखा अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटेपासून
कुठं मध्यम, तर कुठं रिमझिम पाऊस सुरू आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत
शहरासह तालुक्यातील अनेक गावांत पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीनसह झेंडूच्या फुलांचं
नुकसान झालं आहे. काही गावांत रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर शेतात उभ्या
असलेल्या सोयाबीनच्या पिकांत पावसाचं पाणी जमा झाल्यानं पिकाचं नुकसान झालं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून
जोरदार पाऊस सुरू असून, आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सेलू शहर मंडळात १५७,
तर देऊळगाव मंडळात १६५ मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुधना
आणि थुना या नद्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर कुपटा, वालूर, चिकलठाणा, पाथरी, हादगाव
आणि कातनेश्वर या मंडळांतही अतिवृष्टी झाली आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांसंदर्भात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन, तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी काल नवी दिल्लीत संवाद
साधला. कलावंतांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग देशउभारणीच्या कार्यासाठी करावा, असं आवाहन
मोदी यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित
चार माहितीपटांचं प्रकाशनही मोदी यांनी केलं.
****
दक्षिण अफ्रिकेविरूध्द झारखंडमधल्या
रांची शहरात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या पाच गडी बाद ३७७ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या सत्रात रोहित
शर्मा द्विशतक केल्यानंतर बाद झाला. अजिंक्य रहाणेनं ११५ धावा करत त्याला चांगली साथ
दिली.
****
No comments:
Post a Comment