Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे
कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही, त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणीही
घाबरण्याचं कारण नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज सिंधुदूर्ग
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एपीआर हा जनगणनेचा एक
भाग असल्यानं, राज्य सरकारला त्याच्या अंमलबजावणीबाबत काहीही हरकत नसल्याचं, मुख्यमंत्री
म्हणाले. राष्ट्रीय नागरिक नोंदणी - एनआरसी कायदा संपूर्ण देशभरात राबवण्याचा प्रस्ताव
नसल्याचं, केंद्र सरकारनं पूर्वीच स्पष्ट केलं असल्यानं, त्याबाबतही चिंतेचं कारण नाही,
असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे तीनही वेगवेगळे
विषय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सिंधुदूर्ग
जिल्ह्यातलं चिपी विमानतळ येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी
केली. आज चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर, अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीनंतर
त्यांनी ही घोषणा केली.
****
केंद्र सरकारी कर्मचारी
आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना - एनपीएस ऐवजी जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
स्वीकारू शकणार आहेत. एक जानेवारी २००४ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय
लागू असेल. या निर्णयाचा केंद्र सरकारच्या अनेक कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. ही जुनी
योजना लागू करण्यासाठी अनेक कर्मचारी न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती करत होते.
येत्या ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांना दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
****
बारावी परीक्षेच्या पहिल्याच
दिवशी आज काही केंद्रांवर समन्वयाचा अभाव दिसून आला. हिंगोली जिल्ह्यात वसमत इथे एका
परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी दिल्याने ऐनवेळी परीक्षा केंद्र
बदलावं लागलं, त्यामुळे परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची तारांबळ उडाली.
बीड इथंही काही परिक्षा
केंद्रावर बैठक व्यवस्थेत गोंधळ उडाला तर काही परिक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना
जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली.
दरम्यान बीड इथं सहा परीक्षार्थ्यांवर कॉपी करत असल्याप्रकरणी
कारवाई करण्यात आली. इंग्रजी विषयाच्या आजच्या परीक्षेत जिल्ह्यात ९७ केंद्रांवर ३९
हजार ६५१ परीक्षार्थी बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी इथे चार पथकं तैनात
करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात कॉपी
करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातल्या ७९ परीक्षा केंद्रावर
३० हजार ८१४ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परिक्षेसाठी भरारी पथकांबरोबरच
केंद्रावर बैठ पथक तैनात करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या
आज झालेल्या सर्वसाधरण सभेत शहराच्या संभाजीनगर नामकरणावरून गदारोळ झाला. या सभेत भारतीय
जनता पक्षाचे गटनेता प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात यावा
यासंबंधीचे स्मरणपत्र महापौरांना सादर केलं. नगरसेवक राजू शिेंदे आणि राजगौरव वानखेडे
यांनी हा मुद्दा लावून धरला, मात्र एमआयएम च्या नगरसेवकांनी याला विरोध केल्यामुळे
गदारोळ झाला.
****
धुळे महापालिकेच्या २०१८
मध्ये झालेल्या निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे १६४ उमेदवारांना पुढील
तीन वर्षं मनपाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त
राजाराम माने यांनी ही कारवाई केली. या १६४ जणांमध्ये विद्यमान आमदार फारुख शाह आणि
स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
****
महात्मा जोतिराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांशी
सोप्या भाषेत संवाद साधून, आधार प्रमाणीकरण करावं असं आवाहन लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ. अनंत गव्हाणे यांनी केलं आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठीच्या प्रशिक्षण
कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा
लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
****
मराठवाड्याच्या पाणी
प्रश्नावर विचार मंथन करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं औरंगाबाद इथं परवा २० फेब्रुवारीला
मंथन आणि दिशा पीक पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेतल्या चर्चेचा अहवाल
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment