Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
** नोकर भरतीसाठी असलेलं महापोर्टल संकेतस्थळ
बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** मराठवाड्यातला पाण्याचा अनुशेष भरून
काढण्यासाठी निधी मिळणं आवश्यक - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश
टोपे
आणि
** महाशिवरात्रीच्या उत्सवाला पहाटेपासून प्रारंभ
****
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री
पद स्वीकारल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. शिवसेना
नेते संजय राऊत यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. या
दौऱ्यात मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही सदिच्छा भेट घेणार
आहेत.
****
नोकर भरतीसाठी असलेलं महापोर्टल हे संकेतस्थळ
बंद करण्यात आलं आहे. महापोर्टलद्वारे पदभरतीत मोठ्या
प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून
यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकत्र परिक्षा घेण्यास
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं सरकारनं हे पोर्टल बंद करण्याचा
निर्णय घेतला. सरकारी पदभरती परिक्षा घेण्यासाठी आता वेगवेगळ्या
कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
****
श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन ग्राम शहरीकरण
अभियान दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी २०१६ला
या अभियानाचा शुभारंभ केला होता. विकासाच्या दिशेनं पुढे जाणाऱ्या
ग्रमीण भागांना शहरांसारखी सुविधा उपलब्ध करुन देणं, हे या अभियानाचं उद्दीष्ट आहे. या अभियानाचं यश पाहता,
पुढच्या तीन वर्षात ते एक हजार गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं
निती आयोगानं म्हटलं आहे.
****
मराठवाड्यातला पाण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी
निधी मिळणं आवश्यक असून, पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भात काल औरंगाबाद इथं पीक पाणी परिषदेचं
उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
समन्यायी पाणी वाटप होऊन, आपल्याला हक्काचं पाणी
मिळावं, पाणी साठवणुकीसह पाण्याचं वितरणही योग्य पद्धतीनं व्हावं,
असं ते म्हणाले. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
यांच्या उपस्थितीत या पीक पाणी परिषदेचा समारोप झाला. माजी मंत्री
अर्जुन खोतकर, यांच्यासह जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, प्रदीप देशमुख, उदय देवळाणकर, शंकरराव
नागरे आणि विजय अण्णा बोराडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
मराठवाडा गोदावरी पाटबंधारे मंडळानं ऊर्ध्व वैतरणा
धरणातून प्रवाही पद्धतीने ११ दशलक्ष घनमीटर पाणी मुकणे धरणामार्गे गोदावरी धरणात वळवावं, कृष्णा भीमा खोऱ्यातील ४० दशलक्ष घनमीटर
पाणी उपलब्ध करून द्यावं यासह अन्य मागण्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे
करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
****
निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी
माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात
दाखल प्रकरणात नागपूर न्यायालयानं काल त्यांना १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन
मंजूर केला. दरम्यान,
यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस यांनी, हे दोन्ही
खटले नागपुरातली एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भातल्या आंदोलनाशी निगडित असल्याचं सांगितलं.
आपल्यावर कोणताही वैयक्तिक खटला नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी पुढची सुनावणी तीस मार्च रोजी होणार आहे.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
यांनी काल मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांची भेट घेतली. गेल्या चोवीस दिवसांपासून हे आंदोलन
सुरू आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन असून,
मागच्या सरकारनं घेतलेल्या अनेक लोकहिताच्या निर्णयांना हे सरकार स्थगिती
देत असल्याची टीका दरेकर यांनी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन
प्रसारित होणाऱ्या “मन की
बात” या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रम मालिकेचा हा ६२वा भाग असेल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
महाशिवरात्रीच्या उत्सवाला आज पहाटेपासूनच प्रारंभ
झाला आहे. राज्यात ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी
गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ, औरंगाबाद
जिल्ह्यात घृष्णेश्वर तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या ज्योर्तिलिंगाच्या
दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत.
****
परभणी इथं शेतकऱ्यांचा पिकविमा, कर्जमाफी, दुष्काळी अनुदान यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शासनानं घोषित केल्याप्रमाणे
हेक्टरी २५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी,
अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सुरू करण्यासाठी शासनस्तरावर गती आली असून, यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण
मंत्री अमित देशमुख यांनी, आयुष विभागाच्या संचालकांना दिले आहेत.
यासंदर्भात काल लातूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, तसंच कर्मचाऱ्यांच्या क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं काल
पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते उद्धाटन झालं. २२ तारखेपर्यंत
या स्पर्धा चालणार आहेत.
****
परभणी शहरात ज्या भागात ६० टक्के नळजोडणी पूर्ण
झाली, त्या भागाला पाणी देण्यास
सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली आहे.
ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. पाणी
पुरवठा योजना पूर्ण झाली असून, नागरिकांनी स्वतः नळजोडणी करावी,
असं ते म्हणाले. अनाधिकृत नळ घेतलेल्या नागरिकांनी
येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे नळ कनेक्शन नियमानुसार करून घ्यावे, असंही आयुक्त पवार यावेळी म्हणाले.
****
शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
काल औरंगाबाद इथं डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या सिडको एन सात इथल्या कॉम्रेड
व्ही.डी देशपांडे सभागृहात प्राध्यापक उमेश बगाडे यांचं
‘समाजक्रांतीचे समकालीन संदर्भ’ या विषयावर व्याख्यान
झालं.
***
परभणी इथं ग्रेडर कृष्णकुमार सातपुते आणि सहाय्यक उद्धव शिंदे यांना काल
दोन हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. शेतमालाची प्रतवारी करून माल खरेदी करून घेण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली
होती.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथल्या सार्वजनिक
शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं दिला जाणारा " राजा शिवछत्रपती राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार २०२०
हा डॉ. ऋतुराज जाधव यांना जाहीर झाला आहे.
समितीच्या वतीनं काल ही घोषणा करण्यात आली. आज
हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं प्रधानमंत्री रमाई
घरकूल योजनेच्या बांधकामासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या
वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमास
शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद
मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात दोन लाख माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे जमिनींचा पोत सुधारण्यास मदत झाल्याचं खामगाव तालुक्यातले
शेतकरी प्रवीण देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले…….
कृषी विभागातील मृदू आरोग्य
पत्रिका अभियान जे आहे त्या अंतर्गत माझ्या शेतात मातीचे परीक्षण करण्यात आलं. आणि
त्यातून माझ्या शेतीमध्ये नेमके काय घटक कमी आहेत, कोणती पिके घ्यायची आहेत आणि कोणत्या
पिकासाठी कोणत्या खतांची आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे, याची मला माहिती मिळाली.
आणि यातून माझं उत्पन्न वाढवण्यासाठी भरपूर मदत झाली.
****
एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत नवी
मुंबईतल्या वाशी इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात काल एक विशेष कार्यक्रम
घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र
राज्य आणि ओडिशा राज्यामधल्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी,
या उद्देशानं विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी
ओडिशा भाषेतल्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र
आणि ओडिशा राज्यात असणारी एकत्र कुटुंब पद्धती, परंपरा यांच्याविषयी
माहिती यावेळी देण्यात आली.
****
पंडित नाथ नेरळकर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं
औरंगाबादमधल्या कलश मंगल कार्यालयात आज आणि उद्या गानमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर संगीत
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात स्नेहल ठोसर,
कोलकात्याचे पंडित सम्राट पंडित, हेमा उपासनी,
रवींद्र खोमणे, मुनव्वर अली यांचं गायन होणार आहे.
नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्राध्यापक त्र्यंबक महाजन तर संगीत
क्षेत्रातल्या योगदानासाठी श्रीपाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात
येणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दोन कसोटी क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना वेलिंग्टन इथं सुरु आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा
निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३३
षटकांत ३ बाद ८६ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल
३४ तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर खेळत आहे.
****
महिलांचा टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला
आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरूवात होत आहे. भारतीय महिला संघाचा सामना विद्यमान
जगज्जेता यजमान ऑस्ट्रेलिया संघाशी आज होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल.
****
नांदेड इथं झालेल्या सातवी राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२०’ क्रिकेट स्पर्धेत
मुंबई विद्यापीठ संघ विजेता ठरला आहे. तर यजमान स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठम नांदेडचा संघ द्वितीय, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संघानं
तृतीय क्रमांक मिळवला. कुलगुरू डॉ. उध्दव
भोसले यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment