Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
भारताच्या दौऱ्यावर असलेले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे सध्या आग्रा इथं `प्रेमाचं प्रतिक` असलेल्या ताजमहालला भेट देत आहेत.
त्यांची पत्नी मेलानिया आणि परिवार त्यांच्या सोबत उपस्थित आहेत.
****
भारत आणि अमेरिकेच्या
संबंधांमध्ये नवा इतिहास रचला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं आज दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी अहमदाबादमध्ये
आगमन झालं, त्या निमित्त मोटेरा क्रीडा संकुलामध्ये आयोजित `नमस्ते ट्रंप` कार्यक्रमामध्ये
ते बोलत होते. ट्रंप यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले, अशी
भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र
राहील, भारतानं केलेल्या भव्य स्वागतानं आपण भारावून गेलो आहोत, असं ट्रम्प यावेळी
म्हणाले. भारताची प्रगती आणि भारताची एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून, अमेरिकेला
भारताचा आदर वाटत असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे
काम करतील, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. यावेळी त्यांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई
पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं.
****
राज्य विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चर्चेची मागणी केली. शिवसेना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सरकार स्थापन करण्यापूर्वी, शेतकऱ्यांना
वर्षाला २५ हजार रुपये मिळावेत आणि पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टर एक लाख
रुपये इतकी मदत मिळावी, अशी मागणी केली होती, असं फडणवीस म्हणाले. या वेळी झालेल्या गदारोळात, २०१९-२० साठीच्या पुरवणी
मागण्या आणि २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या जास्तीच्या खर्चा संदर्भातली माहिती
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केली. पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत या माजी विधानसभा
सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहामधे शोक प्रस्ताव मांडण्यात आला.
****
शेतकऱ्यांना आर्थिक मदत
आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विधानपरिषदेतही आज पहिल्याच
दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच
दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या दोन्ही प्रश्नांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक
निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले. विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी
केली, या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्रं सभागृहासमोर ठेवण्यात
आली. गोपिकीशन बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे
यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली. त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच,
विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड - करण्यात आली.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली.
****
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव
फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना
आधार प्रमाणिकरण करुन कर्जमुक्ती देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
म्हटलं आहे. ते आज परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधत
होते. शेतकऱ्यांचं आयुष्य सहज कसं होईल यासाठी
शासन प्रयत्न करत आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले. परभणी जिल्ह्यातील पिंगळी आणि गिरगाव
बुद्रुक इथले शेतकरी तसंच जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर तसंच अन्य अधिकारी यावेळी उपस्थित
होते.
****
जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी
आणि तीर्थपुरी इथं महात्मा ज्योतीराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण या योजनेचा
शुभारंभ करण्यात आला. जालना जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या २८ किंवा २९
फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी
सांगितलं.
****
मुदखेड
ते परभणी दरम्यान ८१ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. लिंबगाव-चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यानचं काम गेल्या १४ फेब्रुवारीला पूर्ण झालं होतं. दक्षिण मध्य रेल्वे सुरक्षा
आयुक्तांनी या नवीन मार्गावर प्रवासी गाड्या चालवायला परवानगी दिली
असल्याचं अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment