Sunday, 23 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.02.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांकफेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** सामाजिक परिवर्तन आणि व्यवस्थेमधल्या बदलांसाठी न्यायव्यवस्था आवश्यक -पंतप्रधान नरेंद्र मोदी
** शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं वितरण तसंच खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेतल्या विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
** औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी - प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन 
आणि
** वेलिंग्टन क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडची भारतावर १७२ धावांनी आघाडी
****
****
सामाजिक परिवर्तन आणि व्यवस्थेमधल्या बदलांसाठी न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल सर्वोच्च न्यायालयाद्वारे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय न्यायिक संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कायदा हा सर्वोच्च असून देशातल्या नागरिकांचा न्याय व्यवस्थेवर अतूट विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले. अयोध्येतल्या रामजन्मभूमी संदर्भात निर्णय येण्यापूर्वी अनेक चर्चा झाल्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय जनतेनं स्वीकारला असं पंतप्रधानांनी नमूद केलं. लोकशाहीत विरोध आणि लोकप्रियता दोन्हींचा स्वीकार केला गेला पाहिजे असं कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्य सरकार खेळांना प्रोत्साहन देत असून, युवकांनी परिश्रम करुन अधिकाधिक पुरस्कार मिळवावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत काल शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आणि खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेतल्या विजेत्यांच्या सत्कार संमारंभात मुख्यमंत्री बोलत होते. सध्या युवा पिढी समाज माध्यमात गुरफटत चालली आहे, यासाठी मैदानी खेळांना प्राधान्य देवून राज्यातल्या युवकांना शारिरीक आणि मानसिकदृष्टया मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी एकूण ६३ जणांना क्रिडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
गो गर्ल गो या अभिनव योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. मुलींना शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी तसंच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेण्यासाठी एक कोटी चार लाख मुलींना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
****
सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय बदलण्यासाठी राज्य सरकार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक मांडणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळानं यासंदर्भात एक अध्यादेश मंजूर करून, तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवला होता. राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करायला नकार देत, उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्याची सूचना केली होती. या पूर्वीच्या भाजपप्रणीत सरकारनं सरपंचांची थेट निवड करण्याला मान्यता दिली होती.
दरम्यान, उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
अवैध लॉटरीवर निर्बंधांसाठी पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याकरता पोलिस तसंच वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोलकात्याला पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मुंबईत पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. लॉटरीच्या महसुलात होणारी वाढ पोलिस दलाच्या गृहनिर्माणासाठी वापरण्यात येईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सात मार्चला शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेतील, त्यानंतर ते संध्याकाळी शरयू आरतीला उपस्थित राहणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद कार्यकारणीमधल्या काही पदाधिकाऱ्यांना पक्ष विरोधी वर्तनामुळे पक्षातून निष्कासित करण्यात आलं आहे. भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी काल ही माहिती दिली. शहर जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष उत्तम अंभोरे, शहर चिटणीस रंगनाथ राठोड आणि संतोष सुरे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचं केणेकर यांनी सांगितलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांच्या गाडीची तोडफोड करण्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षातून सांगण्यात आलं.
दरम्यान, पक्षाचे आमदार अतुल सावे यांची औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपतर्फे कळवण्यात आलं आहे. 
****
औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील, तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नवीन प्रभाग रचनेबाबत कॉंग्रेस समाधानी नाही आणि यात हस्तक्षेपाच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याचं, हुसैन म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा तयार केला जात असून, त्यामध्ये ई-कचरा, कर संकलन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा या मुद्दांचा समावेश केला जाईल असं ते म्हणाले.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर इथल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या पेपरसाठी नकला पुरवणाऱ्या आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हिंदी विषयाची परीक्षा सुरू होताच, एका शिक्षकानं मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून परीक्षा केंद्राबाहेर येऊन उत्तरे लिहिली, या उत्तरांच्या छायाप्रती काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या. हा प्रकार लक्षात आल्यावरर पोलीस पथकानं छापा टाकून संशयितांची धरपकड सुरू केली. या प्रकरणात शिक्षक दिनेश तेलगडसह  एक पर्यवेक्षक आणि अन्य सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
लातूर महापालिकेच्या करात समाविष्ट असलेला शैक्षणिक आणि रोजगार हमी कर माफ करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचं, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात पालकमंत्री अमित देशमुख यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून, दोन्ही कर माफीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी उद्यापासूनच कराच्या सवलतीचा फायदा घेऊन कर भरण्यास सुरुवात करण्याचं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
भाजप प्रणीत सरकारनं सुरु केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकार स्थगिती देत असल्याच्या विरोधात भाजपतर्फे २५ तारखेला राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वत्र हे आंदोलन होणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचं कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, यासाठीची कामं तत्काळ सुरू करण्याच्या मागण्याही यावेळी केल्या जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवळे कसबे इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४१ साली घेतलेल्या पहिल्या महार मांग वतन परिषद वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्मृतीसाहित्य समेलनाचं काल उद्घाटन झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या रेल्वे स्थानकावर उतरुन तडवळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत आले होते, तिथपर्यंत यात्रा काढून या संमेलनाला सुरुवात झाली. आज या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद, कथाकथन आदी कार्यक्रमांसह समारोप सत्र होणार आहे.
****
लातूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्या प्रकरणी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मनपा कार्यालयासमोर कोरडी आंघोळ करून निषेध केला. पाणी पुरवठा केंद्रांचं वीजदेयकाची साडे बारा कोटी रुपये थकबाकी असल्यानं, या केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही थकबाकी त्वरित भरणा करून लातूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पालिकेच्या निष्क्रीयेतेमुळेच पाणी पुरवठा बंद झाला असून तो तातडीने सुरु केला नाही तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा लातूरचे भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक गुरुनाथ मगे यांनी दिला आहे.
****
हिंगोली इथं जिल्हा पोलीस दलातर्फे सध्या संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. अठरा वर्षावरील महिला तसंच पुरुषांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवणं हा उद्देश असल्याचं, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी सांगितलं.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वेलिंग्टन इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावानंतर न्यूझीलंडनं १७२ धावांची आघाडी मिळवली आहे. आजचा खेळ सुरु झाल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव ३४८ धावांवर संपुष्टात आला. इशांत शर्मानं पाच, रविचंद्रन अश्विननं तीन, तर जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बिनबाद  ११  धावा झाल्या होत्या.    
****

No comments: