Thursday, 27 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.02.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद­
प्रादेशिक बातम्या
दिनांक२७ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य
** महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची राज्य सरकारची घोषणा
** सरोगसी विधेयकाशी संबंधित राज्यसभेच्या प्रवर समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या
** मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि 
** शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस विधीज्ञ शरद गव्हाणे यांचं निधन
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी या इयत्तेसाठी मराठी भाषा विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करण्यात येणार आहे. काल विधान परिषदेत हे विधेयक सर्वसंमतीनं मंजूर झालं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर एक लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे. यासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेत, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आज मराठी भाषा दिनी हे विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना गायकवाड बोलत होत्या. प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्यानं मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणाही शिक्षण मंत्री गायकवाड यांनी काल विधानपरिषदेत केली. आधीच्या सरकारनं हे मंडळ स्थापन केलं होतं. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. विरोधकांनी या मागणीला विरोध करत हे मंडळ रद्द न करता त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करून आढावा घेण्याची मागणी केली होती. शिक्षण मंत्र्यानी आढावा घेण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली, मात्र तालिका सभापती दत्तात्रय सावंत यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी हे आंतराष्ट्रीय मंडळ बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
****
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर राज्यात नवा कायदा करण्यासाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधेयक मांडण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही माहिती दिली. या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचार, सामुहिक लैंगिक अत्याचार, तसंच अल्पवयीन बालकांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. या कायद्याचा अभ्यास आणि त्या अनुषंगानं राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल येत्या शनिवारपर्यंत सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
****
स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल विधानसभेमध्ये भाजपनं मांडलेला गौरव प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळून लावला. यावर काल सदनात वादळी चर्चा झाली. हा गौरव प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
****
सरोगसी विधेयकाशी संबंधित राज्यसभेच्या प्रवर समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. पूर्वीच्या विधेयकानुसार फक्त जवळच्या नातेवाईक स्त्री लाच सरोगेट आई होता येत होतं, मात्र समितीनं केलेल्या शिफारसीनुसार, जी स्त्री  सरोगेट आई होऊ इच्छीते त्या प्रत्येकीला तशी परवानगी देता येणार आहे. सरोगसी तंत्राद्वारे अपत्यप्राप्तीसाठी विवाहानंतर पाच वर्षांपर्यंत गर्भधारणा न होण्याचा निर्णयही शिथील करण्यात आला आहे. राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान, उद्योग आणि व्यवस्थापन विधेयक २०१९ मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरानजिकची सातारा-देवळाई नगर परिषद, औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर तिथल्या विकासकामांवर भर देण्यात येत आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. सातारा- देवळाई  विविध ४३ विकासकामं करण्यात आली असून त्यासाठी एक कोटी ९८ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या १६व्या पुण्यतिथी निमित्त काल  नांदेड इथं त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेडच्या जलसंपदा विभागानंही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंचनदिन साजरा केला. यावेळी शंकरराव चव्हाण यांचे सिंचन क्षेत्रातील योगदान, भविष्यातील सिंचन विषयक आव्हान, सिंचन लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. अर्धापूर इथल्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली. नांदेड शहरात सुरू असलेल्या संगीत शंकर दरबारच्या कालच्या सत्राचं उदघाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात काल डॉक्टर जयंती कुमारेषन यांचं वीणा वादन आणि कपिल जाधव आणि त्यांच्या संचानं सुंद्री वादनाचा कार्यक्रम सादर केला. यासमारंभात संगीत क्षेत्रात कार्यरत परभणी इथल्या नलिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांची जयंती २७ फेब्रुवारी हा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं औरंगाबाद इथं शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. आज साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा दिनाच्या अनुषंगानं राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत पुरस्कार, डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज वितरण केलं जाणार आहे.
****
शब्द हे परिवर्तनाचं सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचं ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री ललिता गादगे यांनी म्हटलं आहे. आजच्या ‘मराठी भाषा’ दिनाच्या अनुषंगानं काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागात घेण्यात आलेल्या कविसंमेलनात, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होत्या. या कविसंमेलनात डॉ.शेख इक्बाल मिन्ने, बालाजी सुतार, विनायक येवले, गणेश घुले, बालाजी फड, आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
****
शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस विधीज्ञ शरद गव्हाणे यांचं काल रात्री औरंगाबाद इथं खाजगी रूग्णालयात निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी औरंगाबाद विधानसभेची निवडणूक लढवली होती. औरंगाबादमधल्या खोकडपुरा भागातल्या शिवाजी हायस्कूलच्या शालेय समितीचे ते अध्यक्ष होते. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
जमानत करून देण्यासाठी तसंच इतर गुन्ह्यांमध्ये आरोपीची नोंद होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक पोलिस स्थानकात कार्यरत असणारे पोलिस जमादार रमेशलाल जैस्वाल आणि पोलिस हवालदार गोपाल सोनवणे या दोघांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं १५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक केली.
तक्रारदार जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ इथला रहिवासी आहे.
एका अन्य प्रकरणात, बदलीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवून देण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या मृद आणि जलसंधारण विभाग जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था- वाल्मी इथं कार्यरत असणारे वरिष्ठ लिपिक सतीश मुळे यांना काल औरंगाबादच्या विशेष सत्र न्यायालयानं उद्या पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड इथं होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षरोदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी हिंगोली इथल्या प्रसिद्ध कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी यांची निवड करण्यात आली आहे. संध्या रंगारी यांचे पाच कविता संग्रह, एक ललित गद्य, लोकसाहित्याचं संपादन आणि हिंदी भाषेतला अनुवादीत कविता संग्रह प्रकाशित आहे. येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनी नांदेड इथं हे साहित्य संमेलन होणार आहे.
****
औरंगाबाद तालुक्यातल्या सुंदरवाडी इथल्या शिवछत्रपती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर काल बारावीच्या रसायन शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर आढळल्यानं केंद्र संचालक गजानन किसन पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला.
****
लातूर शहरात मालमत्ता करात दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन, नागरिकांनी करभरणा करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिकेची कराची थकबाकी ८७ कोटी रुपये आहे. करदात्यांना थकबाकी भरताना जवळपास २० टक्के माफी मिळणार आहे. मात्र मंगल कार्यालय, उद्योग, बॅंका यांच्याकडची थकबाकी वसूल करण्यासाठी कडक कारवाई करणार असल्याचंही जी श्रीकांत यांनी सांगितलं.
****
अंबाजोगाई इथलं ज्ञान प्रबोधिनी विस्तार केंद्र आणि खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं येत्या एक मार्चला अभिव्यक्ती बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव या संमेलनाचं अध्यक्षपद भुषवणार आहेत. या बालकुमार साहित्य संमेलनात आनंददायी कृतीसत्र असणार आहेत, अशी माहिती ज्ञान प्रबोधिनीचे प्रतिनिधी अभिजीत जोंधळे यांनी दिली.
****





No comments: