Saturday, 29 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 तालुका पातळीवर जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी अकरा  वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घ्यावी, असे निर्देश शासनानं दिले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसंच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपुर्वी आठ  दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीला उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.
****

 राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होणाऱ्या भेसळीबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिले आहेत. दुधातील भेसळ थांबली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते सांगली इथं बोलत होते. राज्यात अडचणीत असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि यंत्र मागधारकांना मदत करण्यासाठी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मराठी शाळा टिकवण्याचं मोठं आव्हान आज राज्यासमोर असून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचं राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं.
****

 मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्री उपसमितीनं आज सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यावेळी उपस्थित होते. मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विधिज्ञ यांनी बैठकीत सहभाग घेतला. मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनं लागला पाहिजे यासाठी राज्यसरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ नेमल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. सरकार मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तेव्हा आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मराठा समाजानं मागं घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं.
****

 बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्यान होणाऱ्या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनान घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असलेले सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सिंह यांच्या बदलीन रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के. सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.
****

 आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यासाठी आणि उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकांना सुरूवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज संघटनात्मक आढावा घेतला. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचं नाव बदललंच पाहिजे अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलतांना मांडली. राष्ट्रवादी काँग्रस महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शहर आणि ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
****

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांच्या जागांसाठी संपूर्ण राज्यात आज मतदान झालं. या निवडणुकीसाठी राज्यातील सहा महसूल विभागांतलं एकूण सातशे दोन मतदान होतं. अमरावती विभागातील दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यासाठी वाशिम इथं मतदान करण्यात आलं.
****

 औरंगाबाद इथं राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या वतीनं आगामी सौर वर्ष १९४२ च्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचं आज विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सरोज देशपांडे, अभय मराठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****

 राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचं आज बीडमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते सत्तावन्न वर्षांचे होते. गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे ते रहिवासी होते.
*****
***

No comments: