Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २२ फेब्रुवारी २०२० सकाळी
७.१०
मि.
****
Ø विकासासाठी केंद्राचं महाराष्ट्राला कायम सहकार्य;
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पंतप्रधानांची ग्वाही
Ø सीएए हा नागरिकत्व काढून घेणारा कायदा नसल्यानं, भीतीचं कारण नाही- मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
Ø शाळांमधल्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचा राज्यसरकारचा निर्णय
Ø सातबारा कोरा करण्याचं आश्वासन पाळावं या आणि इतर मागण्यांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला
भाजपचं आंदोलन
आणि
Ø महाशिवरात्रीचा उत्सव काल सर्वत्र भक्तीभावानं साजरा
****
विकासाच्या बाबतीत केंद्राचं महाराष्ट्राला कायम सहकार्य राहिल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दिल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
ते काल दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत
होते. वस्तू आणि सेवा करातला राज्याचा महसुली वाटा, प्रधानमंत्री पिक विमा योजना, यासह
इतर विषयांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. राज्याला जीएसटी परतावा
जलदगतीने मिळावा तसंच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे केल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए बाबत आपण आपली भूमिका यापूर्वीच
स्पष्ट केली आहे. सीएए हा कोणाचंही नागरिकत्व काढून घेणारा कायदा
नसल्यानं, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही, या कायद्यापासून देशातल्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही, याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रीय लोकसंख्या
नोंदणी- एनपीआर हा जनगणनेसंदर्भातला कायदा असल्यानं, त्याबाबत आपल्याला काहीही हरकत नाही, राष्ट्रीय नागरिकत्व
नोंदणी - एनआरसी हा देशभरात लागू करण्याचा केंद्राचा विचार नसल्याचं,
संसदेत सरकारनं स्पष्ट केलं आहे, त्यामुळे त्याबाबतही
चिंता करण्याचं कारण नसल्याचं, ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री
अमित शहा, काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.
****
राज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरती करणार
केली जाणार असून, राज्य सुरक्षा
महामंडळ मार्फतही सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोली इथं बोलत होते.
नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे ड्रोन
खरेदी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न
येणाऱ्या शाळांमधल्या विविध तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारनं शाळा, जिल्हा आणि विभागीय स्तरावर तक्रार
निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी ही माहिती दिली. प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटीही बसवण्यात येणार
असून, या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी लोकशाही
दिनाच्या धर्तीवर, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी
शिक्षणदिनाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळा स्तरावर
मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती कार्यरत असेल.
****
सातबारा कोरा करण्याचं आश्वासन या राज्य सरकारनं
पाळावं या आणि इतर मागण्यांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्ष राज्यभरात
आंदोलन करणार आहे. भाजपचे
ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर
यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या आंदोलनाबाबत माहिती
देताना बागडे म्हणाले......
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अति वृष्टीमुळे जे नुकसान झालं
त्या नुकसानाची कोरडवाहूला एकरी पंचवीस हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी, बागायतीला
पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी अशी जाहिर मागणी केली होती. तेच सत्तेत आल्यावर
त्यांनी हा प्रयत्न पुढे नेलेला नाही. लोकपयोगी योजना होत्या, त्या सगळ्या योजना बंद
करण्याचा निर्णय केला. त्यासाठी निषेध म्हणून २५ तारखेला तहसील समोर आम्ही धरणे धरणार
आहोत. साऱ्या महाराष्ट्रभर.
या मागण्यांसाठी २५ फेब्रुवारीला औरंगाबाद जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर तर तालुक्यांच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार
असल्याचं बागडे यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या
सरकारनं राज्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केलेली जलसंवर्धनाची कामं हलक्यात
प्रतीची असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ते काल पुण्यात
वार्ताहरांशी बोलत होते. राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशानं भाजप सरकारनं या
योजनेला सुरुवात केली. मात्र, लोकांच्या मागणीमुळे जलयुक्त
शिवार योजनेची चौकशी होणं आवश्यक असल्याचं आपल्याला वाटतं, असं पाटील म्हणाले.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
महाशिवरात्रीचा उत्सव काल सर्वत्र भक्तीभावानं साजरा झाला. राज्यात त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर सह मराठवाड्यात परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि
औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी परराज्यातूनही हजारोंच्या
संख्येनं भाविक दाखल झाले होते. अनेक ठिकाणी सामुहिक पारायणासह
रुद्राभिषेक करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातल्या प्राचिनकालीन शिव मंदिरात
भाविकांनी महादेव दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. संत पाचलेगावकर मुक्तेश्वर आश्रमातही काल
महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, भजन, कीर्तन, व्याख्यान आदी धार्मिक
आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर
टाक धानोरकर यांनी ही माहिती दिली.
जालना इथं पंचमुखी महादेव, मुक्तेश्वर महादेव मंदिरासह भोलेश्वर
बरडी इथं भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
परभणी शहरातल्या बेलेश्वर, पारदेश्वर महादेव मंदिरांसह,
जिंतूर तालुक्यातल्या मैनापुरी माळावरील महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच
दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. परभणी शहरासह जिल्ह्यातल्या
महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथं दुपारी तीन वाजेपर्यंत
सुमारे एक लाख भाविकांनी नागनाथाचं दर्शन घेतल्याचं आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे.
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर
आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात सिद्धेश्वर महाशिवरात्री
यात्रा प्रसिद्ध असून यावर्षी ही यात्रा आठ मार्च पर्यंत चालणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या
यमगरवाडी इथं काल महाशिवरात्री निमित्त स्नेह मेळावा घेण्यात आला.
या स्नेहमेळाव्यात भटके विमुक्त समाजातल्या ३३ जाती उपजातींचे बांधव
सहभागी झाले.
****
औरंगाबाद इथं मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस
रेल्वेगाड्यांना थांबा देण्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली असल्याचं, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी
सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. दळणवळणाच्या सोयी सुविधांसंदर्भात करत असलेल्या कामाची त्यांनी
यावेळी माहिती दिली.
दरम्यान, एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचं
त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात येईल, असं खासदार
जलिल यांनी म्हटलं आहे. आपला पक्ष पठाण यांच्या
वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, वारिस पठाण यांनी केलेल्या
आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं भाजपच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचं दहन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल
औरंगाबाद इथं वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नांदेड इथं शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं जोडे मारून दहन केलं. पठाण
यांच्यावर कारवाईची मागणी या सर्वच आंदोलकांकडून करण्यात आली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया
सुळे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
त्यांनी काल पैठण इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष बांधणी आणि तालुक्यातल्या विविध योजना आणि विकास पश्नांवर त्यांनी यावेळी
चर्चा केली. मात्र, या दरम्यान,
विधानसभा निवडणूक तिकिट वाटप आणि पराभवाच्या मुद्यावरून
कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सहाय्यक लेखाधिकारी
बालासाहेब किशनराव मोरे सोनखेडकर यांचं काल दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ११ वाजता त्यांच्या सोनखेड या मूळ गांवी
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
लातूर जिल्हा रेशीम उत्पादक संघाची स्थापना करणार
असल्याचं औस्याचे आमदार अभिमन्यू
पवार यांनी सागितलं आहे. औसा इथं काल पहिल्या रेशीम
परिषदेत ते बोलत होते. कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारा
व्यवसाय, म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं,
औसा हे रेशीम उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जावं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
ऑस्ट्रेलियात कालपासून सुरू झालेल्या महिला विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला
प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं निर्धारीत २० षटकांत
चार बाद १३२ धावा केल्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १९ षटकं
आणि पाच चेंडूत ११५ धावांवर सर्वबाद झाला. भारताची पूनम यादव
सामन्यातली सर्वोत्तम खेळाडू ठरली.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वेलिंग्टन इथं सुरु असलेल्या
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचं शेवटचं वृत्त हाती
आलं तेव्हा न्यूझीलंडच्या १७ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १६५
धावांवर आटोपला.
*****
***
No comments:
Post a Comment