Thursday, 20 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
एअरसेल मॅक्सिसप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम या दोघांविरोधात तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाला चार मे पर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणी चार देशांना पुरावे देण्यासंदर्भातली पत्रं पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून उत्तर येणं बाकी असल्याचं, अंमलबजावणी संचालनालयानं न्यायालयाला सांगितलं. चिदंबरम यांनी अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या करारांना मंजुरी देऊन काही विशिष्ट व्यक्तींना लाभ मिळवून दिल्याचा आरोप सीबीआय तसंच ईडीकडून केला जात आहे.
****
येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. “ग्राहक संरक्षण कायदा २०१९” अंतर्गत या प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. ग्राहकांचे हक्क, अनुचित व्यापारव्यवहार, दिशाभूल करणा-या जाहिराती इत्यादींशी संबंधित प्रश्नांचा निपटारा करणं, तसंच बनावट किंवा भेसळीचे पदार्थ, उत्पादनं विकणा-यांना दंड करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल. त्यासाठीचे नियम येत्या एक ते दीड महिन्यात निश्चित केले जातील, असं पासवान यांनी सांगितलं
****
गेल्या ऑगस्ट महिन्यात सांगली जिल्ह्यात चार तालुक्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.  ५२ हजार हेक़्टर क्षेत्रातली पिकं या महापुरामुळं बाधित झाली होती. या पूरबाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सांगली जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात  ८० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
पूरबाधित शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्जमाफी आणि बिगर कर्जदारांना तिप्पट भरपाई जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार २८ हजार ४०४ शेतकऱ्यांना १८६ कोटींचा कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.
****
महाशिवरात्रीचा उत्सव उद्या साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आजपासून नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर साठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
****



No comments: