Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 February
2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २१ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
औरंगाबाद
इथं मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्यासंदर्भात रेल्वे
अधिकाऱ्यांकडे मागणी केली असल्याचं, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं
आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद शहरात शिवाजी नगर रेल्वे
क्रॉसिंग इथं भुयारी मार्गासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असल्याचं
खासदार इम्तियाज जलिल यांनी सांगितलं. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरएम यांनी
पाहणी करण्याचं आश्वासन दिल्याचं खासदारांनी सांगितलं.
औरंगाबाद
शिर्डी जलद गती महामार्गा संदर्भात कालच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचं त्यांनी
सांगितलं. औरंगाबाद इथं पूर्णवेळ पारपत्र कार्यालया सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून,
सर्व सुविधा देणारं पारपत्र कार्यालय औरंगाबाद इथं सुरू व्हावं, नागरिकांना मुंबई किंवा
नाशिकला जाण्याची गरज पडू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या डॉ. आंबेडकर
इंटरनॅशनल सेंटर इथं होणार आहे. सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या संमेलनाचं उद्धघाटन भारतीय जनता
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा करणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. सावरकरांचे विचार आजच्या संदर्भात... हे
संमेलनाचे सूत्र असून देशभरातून संमेलनाला एक हजार प्रतिनिधी येणार असल्याची माहिती
आयोजकांनी दिली आहे.
****
२०१९ - २० या हंगामासाठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार
तूर खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत येत्या १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी ही मुदत १५ फेब्रुवारी
होती. शेतकऱ्यांनी अधिकाधिक
संख्येनं नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
मुंबईत दादर इथल्या एका स्टुडीओला आज पहाटे
लागलेल्या आगीत संगणक, लाकडी सामान आणि फाईल्स जळून खाक झाल्या. सुमारे दोन तासांच्या
प्रयत्नांनी अग्नीशामक दलाच्या ८ बंबांना ही आग शमवण्यात यश मिळालं. सुदैवानं
या दुर्घटनेत कुठलीही मनुष्यहानी
झाली नाही, मात्र या आगीचं
नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
****
पंडित नाथ नेरळकर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं औरंगाबादमधल्या कलश मंगल कार्यालयात आज आणि उद्या
गानमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या महोत्सवात स्नेहल ठोसर, कोलकात्याचे
पंडित सम्राट पंडित, हेमा उपासनी, रवींद्र
खोमणे, मुनव्वर अली यांचं गायन होणार आहे. नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्राध्यापक त्र्यंबक महाजन तर संगीत क्षेत्रातल्या
योगदानासाठी श्रीपाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात येणार आहे.
****
मजलिस ए इत्तेहादऊल मुसलमीन एमआयएमचे माजी आमदार वारिस
पठाण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं भाजपच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी
वारिस पठाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
****
महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र भक्तीभावानं साजरा केलं
जात आहे. नांदेड इथं महाशिवरात्र पहाट या भक्ती गीतांचा संगीत कार्यक्रम घेण्यात आला
होता. जिल्ह्यातील प्राचिनकालीन शिव मंदिरात भाविकांनी महादेव दर्शनासाठी रांगा लावल्या
आहेत. नांदेड तालुक्यातील मरळक इथल्या इमलेश्वर मंदिर, देगलूर तालुक्यातील होट्टल इथल्या
निळकंठेश्वर मंदिरात तसच हिमायतनगर इथल्या परमेश्वर मंदिरात शिवभक्तांनी मोठी गर्दी
केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
क्रिकेटपटू प्रग्यान
ओझा यानं आतंरराष्ट्रीय तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डावखुरा फिरकी
गोलंदाज असलेल्या प्रग्यान ओझानं २४ कसोटी मालिका आणि १८ एकदिवसीय सामने तसंच ६ टी
ट्वेन्टी सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगून त्यांनी भारतीयांचे आभार मानले आहेत.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वेलिंग्टन इथं सुरू असलेल्या
पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे थांबवावा लागला.
न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ १६,
मयांक अग्रवाल ३४, चेतेश्वर पुजारा ११, हनुमा विहारी ७ तर कर्णधार विराट कोहली दोन
धावा काढून तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पंचावन्न षटकांत पाच बाद
१२२ धावा झाल्या होत्या. अजिंक्य रहाणे ३८ तर ऋषभ पंत दहा धावांवर खेळत होते.
****
No comments:
Post a Comment