Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February
2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २७
फेब्रुवारी
२०२० दुपारी १.०० वा.
****
भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची आज
गरज असल्याचं, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी म्हटलं आहे. त्या आज विधानभवनात
झालेल्या इये मराठीचीये नगरी या कार्यक्रमात बोलत होत्या. मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या
संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती
देण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं
उद्घाटन झालं. यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक
निंबाळकर, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा ही संस्करातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता,
आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मराठी भाषा दिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
साजरा होत आहे. विविध शाळा महाविद्यालयांमधून मराठी गौरव गीत, तसंच पोवाडे गायनासह
अनेकविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिन्ट यांचं आज राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वागत केलं. मिन्ट हे काल भारताच्या चार दिवसांच्या
दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार असून,
या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध द्वी-पक्षीय मुद्यांवर चर्चा होईल, त्यानंतर काही
करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
****
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस
पक्षाच्या एका शिष्टमंडळानं आज पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांत दिल्लीत झालेल्या घटनांकडे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं लक्ष वेधून, त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिल्याचं
गांधी यांनी सांगितलं. या घटना रोखण्यात केंद्र तसंच राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, अशी
टीकाही गांधी यांनी केली. या प्रकरणी राजधर्माचं पालन व्हावं, यासाठी राष्ट्रपतींनी
आपल्या अधिकारांचा वापर करावा, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांनी केलं.
****
भारतीय वायूसेनेनं चीनमधल्या वुहान इथून आणखी ७६ भारतीयांना
भारतात परत आणलं आहे. या भारतीयांसह बांगलादेश, म्यानमार, मालदीव, दक्षिण आफ्रिका,
अमेरिका तसंच मेडागास्कर या देशांच्या ३६ नागरिकांनाही वुहानमधून परत आणण्यात आलं आहे.
वुहान इथं काल गेलेल्या या विमानासोबत कोरोना आजारावरच्या उपचारासाठी आवश्यक उपकरणं
पाठवण्यात आली, चीन सरकारच्या विनंतीवरून ही उपकरणं पाठवण्यात आल्याचं, परराष्ट्र मंत्री
एस जयशंकर यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जपानमध्ये
थांबवून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर अडकून पडलेल्या ११९ भारतीयांना एअर
इंडियाच्या विमानानं आज सकाळी दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं. त्यांच्यासोबत श्रीलंका,
नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरु या देशांच्या पाच नागरिकांनाही परत आणलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मीरज इथला खाजगी सावकार संतोष कोळी याला
आज पहाटे पोलिसांनी अटक केली, त्याच्या सराफी पेढीतून पोलिसांनी पंधरा लाख रुपयांचं
सोनं जप्त केलं. कोळी याच्यासह सचिन गायकवाड यालाही आज अटक करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment