Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
भारताबरोबचे संबंध आपण
अधिक वृद्धींगत करू इच्छितो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं
आहे. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी
सकारात्मक चर्चा झाली, भारतातील आपले दोन दिवस खुप छान होते, खूप चांगली चर्चा झाली,
अशी प्रशंसाही त्यांनी यावेळी केली.
****
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प
यांच्यात आज नवी दिल्ली इथं व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, दहशतवाद, ऊर्जा आदी
विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. मानसिक आरोग्य आणि औषध सुरक्षेसह एकून तीन सामंजस्य
करार यावेळी झाले. भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री, लोकांच्या इच्छेनुसार आणि लोकांना
केंद्रस्थानी ठेवून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नैसर्गिक वायू,
अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार आहेत.
अमेरिकेबरोबर महत्वाच्या आणि मोठ्या व्यापारी करारासंबंधी बोलणी सुरु आहेत, असं मोदी
यांनी सांगितलं. इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी भारत आणि
अमेरिका कटीबद्ध् असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. भारताबरोबर तीन बिलीयन डॉलरचा
संरक्षण करार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. महिला सक्षमीकरण अमली पदार्थांच्या वापराचं
उच्चाटन याबाबतही दोन्ही देशात सहकार्य राहणार असल्याचं ट्रंप यांनी यावेळी स्पष्ट
केलं.
****
राज्य विधी मंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये ग्राम पंचायत सुधारणा विधेयक
आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलं.
****
शेतकऱ्यांना देण्यात
आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत आज विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ
केल्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सभागृहाचं कामकाज एक वाजेपर्यंत दोनदा
स्थगित करावं लागलं. विधानपरिषदेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
यांनी शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचं सांगत सरकारचा निषेध केला. मात्र सत्ताधारी बाकावरून
दरेकर यांच्या वक्तव्याला विरोध झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून गोंधळ सुरु केला.
या गदारोळातच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरं पुकारली. त्यानंतरही
गोंधळ सुरुच राहिल्यानं कामकाज पहिल्यांदा तीस मिनिटांसाठी आणि नंतर पुन्हा एकदा एक
वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
दिल्लीच्या इशान्य भागात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या गटांमधे झालेल्या संघर्षात मृत्यूमुखी
पडलेल्यांची संख्या नऊ झाली आहे. जीटीबी रुग्णालयातर्फे या संदर्भात देण्यात आलेल्या
माहितीनुसार पस्तीस जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली.
****
शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस
हजार रूपये तसंच सरसकट कर्जमाफीची मागणी आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ
भाजपतर्फे आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं तसचं जालना जिल्ह्यात
या आंदोलनावेळी विजेचं भारनियमन बंद करा आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर
करण्यात आलं.
हिंगोली तसंच सातारा, अकोला, अहमदनगर, धुळे
जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
धरणं आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं केंद्रीय
मंत्री रावसाहेब दानवे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. जिल्ह्यातल्या हिमायतनगर आणि
लोहा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथंही आंदोलन करण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृष्णा खोऱ्याचं पहिल्या टप्प्यातील सात दशलक्ष घनफूट पाणी दिलं जावं तसंच `वॉटर ग्रीड` योजनेला मंजुरी देऊन
अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी आदी मागण्या आंदोलकांनी
केल्या.
****
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद असल्यानं हे सरकार फार काळ टिकणार नसल्यानं मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांनी सत्ता सोडून भाजप सोबत यावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लीकन पक्षाचे नेते
रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज
इथं दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उदघाटन
प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
औरंगाबाद इथं जल आणि भुमी व्यवस्थापन संस्था, वाल्मीच्या
लिपिकाला आज लाच घेताना अटक करण्यात आली. आपल्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या बदलीचा
अर्ज वरिष्ठांपुढे सादर करण्यासाठी लिपिक सतीश मुळे यानं पंचवीस हजार रूपयांची लाच
मागितली होती..
*****
***
No comments:
Post a Comment