Friday, 28 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.02.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००

****

महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेनं आज संमत केलं. शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदनात हे विधेयक मांडलं. या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे. आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत, यामुळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय असल्याचं, दरेकर म्हणाले. मतदानानंतर हे विधेयक बहुमतानं संमत झालं.

****

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत केली. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक प्रवेश सुरू होण्यापूर्वी सुरू केली जाईल असं मलिक यांनी सांगितलं. यासंदर्भात सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं सांगत मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

****

विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आता ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असं नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. नोव्हेंबर २०१६ पासून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय तसंच जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर केलं जाईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

****

औरंगाबाद महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. आज औरंगाबाद इथं महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कार्यकर्ते घरोघरी जावून एक प्रश्नावली भरून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत महाआघाडी होण्याचे संकेतही त्यांनी दिले, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार, डॉ. अरुण शिंदे, रमाकांत देशपांडे आणि निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि  पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी आज नांदेड इथं ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या पंधरा मार्चला नांदेड इथं एका विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

परभणी इथल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेलं कापूस खरेदी केंद्र उद्यापासून ते येत्या ३ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. बाजार समितीचे सचिव एस.बी.काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्रावर कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे, कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काऴे यांनी या पत्रकात नमूद केलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि अधिनियम २०१४च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...