Saturday, 22 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.02.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****

 सामाजिक परिवर्तन आणि व्यवस्थेमधील बदलांसाठी न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय न्यायिक संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कायदा हा सर्वोच्च असून देशातल्या नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर अतूट विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले. अयोध्येतल्या रामजन्मभूमी संदर्भात निर्णय येण्यापूर्वी  अनेक चर्चा झाल्या, मात्र उच्च न्यायालयाचाच निर्णय जनतेनं स्विकारला असं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. लोकशाहीत विरोध आणि लोकप्रियता दोन्हींचा स्विकार केला गेला पाहिजे असं कायदा आणि  न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. ’न्यायपालिका आणि बदलतं विश्व’ हा या संमेलनाचा विषय आहे.
****

 भारतात आता कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायांसदर्भात सर्व राज्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत हे स्पष्ट झालं असल्याचं  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये आढळलेल्या तीन रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. देशभरात सध्या कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण नसला तरी, सर्व राज्यांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.
****

 राज्यात लवकरच आठ हजार पोलिस आणि राज्य सुरक्षा महामंडळामार्फतही सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोली इथं बोलत होते. नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचे ड्रोन खरेदी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****

 शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात येत नसलेल्या शाळांमधल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी, शाळा, जिल्हा आणि विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटीही बसवली जाईल. या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिनाचं आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.
****

 उत्तर प्रदेशात भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागातर्फे सुरु असलेल्या उत्खनना दरम्यान तीन हजार टनांहून जास्त सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे. सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी परिसरात हा साठा सापडला. १९९२ - ९३ सालापासून या साठ्याच्या शोधासाठी उत्खनन सुरु झालं होतं.
****

 प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तुषार पुंडकर यांची अकोट इथं दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अकोट इथं पोलिस कॉलनीमध्ये काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ते पायी फिरत असताना त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर अकोला इथं उपचार सुरू असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत असून घटना स्थळी एक बंदूक आणि दोन रिकामी काडतुसं पोलिसांना आढळली आहेत.
****

 मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आज पहाटे एका मोटारीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. बार्शीहून मुंबईला जात असलेल्या या मोटारीच्या चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कठड्यावर आदळल्यानं हा अपघात झाला.
****

 पहिली आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया स्पर्धा आजपासून ओदिशात कटक इथल्या जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील. देशभरातल्या एकशे एकोणसाठ विद्यापीठांमधले तीन हजार चारशे खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सतरा क्रीडा प्रकाराचा समावेश आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांच्यासह क्रीडा जगतातले अनेक मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
****

 न्युझीलंडनं भारताविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर एक्कावन्न धावांची आघाडी घेतली आहे. बेसीन रिझर्व्ह इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पासष्ट धावांमध्ये बाद झाल्यानंतर न्युझीलंडनं आजचा खेळ थांबला तेंव्हा पाच बाद दोनशे सोळा धावा केल्या आहेत. इशांत शर्मानं तीन गडी बाद केले आहेत. भारतानं सकाळी पाच बाद एकशे बावीस धावसंख्येवर पुढं खेळायला सुरूवात केली. मात्र भारताचे उर्वरित पाच गडी फक्त त्रेचाळीस धावांची भर घालून तंबूत परतले. न्युझिलंडच्या टिम साऊदी आणि काईल जेमिन्सन यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. भारताकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक ४६ धावा केल्या.
*****
***

No comments: