Tuesday, 25 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25.02.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२५ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** भारताची प्रगती आणि एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन
** राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ
** महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यातल्या नऊ गावांचा समावेश
आणि 
** औरंगाबाद इथले ज्येष्ठ कवी असलम मिर्जा यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
****
भारताची प्रगती आणि एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मोटेरा क्रीडा संकुलात झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात बोलत होते. अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहील, दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील, असंही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधातल्या भारताच्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही उपस्थित जनसुमदायाला यावेळी संबोधित केलं. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये हा नवा इतिहास रचला जात असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ट्रंप यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ झाले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसाच्या भारत भेटीवर असलेले ट्रम्प काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचले. आज सकाळी त्यांचं परंपरेनुसार राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत केलं जाईल. त्यानंतर राजघाटवर जाऊन ट्रम्प दांपत्य महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहतील. त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होईल. यावेळी संरक्षण, सुरक्षा आणि व्यापारासह विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यासोबत १२ सदस्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आलेलं आहे. दोन्ही देशादरम्यान पाच करार होण्याची शक्यता आहे. यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार, व्‍यापारी सुविधा आणि अंतर्गत सुरक्षासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढण्यास मदत होईल. सायंकाळी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांची ट्रम्प भेट घेतील.
****
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल २०१९- २०च्या अर्थसंकल्पातल्या पुरवणी मागण्या तसंच २०१४ ते २०१७ दरम्यानच्या अतिरिक्त खर्चाचा तपशील सभागृहात सादर केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात स्पष्टता नसून केवळ वीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्यानं यावर चर्चा व्हावी, असं फडणवीस म्हणाले. भाजप सदस्यांनी या मुद्दावर हौद्यात येऊन सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
विधान परिषदेतही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी कामकाज सुरू होताच, विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांसाठी संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली.

विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यात आणि महिलांविरुद्धचे गुन्हे रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि पिकाची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
****
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची नावं असून, त्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यादी जाहीर केल्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करुन कर्जमुक्ती देण्यात येत असल्याचं सांगितलं. परभणी जिल्ह्यातील पिंगळी आणि गिरगाव बुद्रुक इथले शेतकरी यावेळी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातल्या सोनखेड आणि कामठा बुद्रुक, लातूर जिल्ह्यात बाभळगाव आणि आष्टा,  जालना जिल्ह्यातल्या टेंभुर्णी आणि तीर्थपुरी तसंच बीड जिल्ह्यातल्या धारुर गावातल्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. 
****
शैक्षणिक शुल्कांचं नियमन करण्यासाठी राज्यात आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आणि एक पुनरीक्षण समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल केली. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना या समित्यांकडे तक्रार करता येईल. प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे या आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच कामकाजाला सुरूवात करतील. पुनरीक्षण समिती ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपाचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे. आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काल ते बोलत होते. गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांमधे समन्वय आणि सहकार्य राहिलं आहे, ते आणखी मजबूत करू या, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसंच काँग्रेस नेतृत्वाशी आपला सतत संपर्क असून, भाजपाच्या मतभेदाच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यातल्या सर्व तहसील कार्यालयांबाहेर आज धरणं आंदोलन करणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होईल. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती केली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
साहित्य अकादमीनं काल अनुवादासाठीचे पुरस्कार जाहीर केले. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातल्या २३ प्रादेशिक भाषांतल्या सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती आणि अनुवादकांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये प्रसिद्ध लेखिका दिग्दर्शक सई परांजपे तसंच औरंगाबाद इथले साहित्यिक असलम मिर्जा यांचा समावेश आहे. मराठी कवी प्रशांत असणारे यांच्या 'मीच माझा मोर' या मराठीतील कविता संग्रहाच्या मिर्झा यांनी उर्दूत अनुवाद केलेल्या"मोरपंख"या कविता
संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर परांजपे यांना अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या 'अँड देन वन डे' या आत्मचरित्राच्या 'आणि मग एक दिवस' या मराठी अनुवादासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचं ‘बेडा जंगम’ जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द ठरवलं आहे. तीन जणांनी त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार केली होती. त्यावर १५ फेब्रुवारीला सुनावणी पूर्ण झाली होती.
****
राज्यात १९ जिल्ह्यांतल्या दीड हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच- सदस्यपद सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २९ मार्चला मतदान आणि दुसऱ्या दिवशी तीस मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या शंभर तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी कालपासूनच आचारसंहिता लागू झाली
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथमधल्या नागनाथ महाविद्यालयात बारावीच्या परिक्षेदरम्यान नक्कल करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. त्यांच्याविरूद्ध पोलिसांच्या महिला भरारी पथकानं कारवाई केली.
परभणी इथं काल बारावीच्या परिक्षेत नक्कल करत असलेल्या ६८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. भौतिकशास्त्र विषयात नक्कल करतांना ३७ विद्याथ्यांना तर राज्यशास्‍त्र या विषयाची परिक्षा देतांना नक्कल करतांना ३१ विद्याथ्यांना पकडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडनं तुरीची खरेदी सुरु केली आहे. लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, हालसी, चाकूर, रेणापूर, हालकी लोणी तसंच देवणी या ठिकाणी ही खरेदी केंद्र सुरु झाली आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सर्जेराव मोरे तर उपाध्यक्ष म्हणून अनंतराव देशमुख यांची काल बिनविरोध निवड झाली. काल हा निकाल जाहीर करण्यात आला
****
दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेल्या मुदखेड ते परभणी दरम्यान ८१ किलोमीटर रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्या चालवायला दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. लिंबगाव-चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यानचं काम गेल्या १४ फेब्रुवारीला पूर्ण झालं होतं. त्यानंतर या मार्गावर सुरक्षा चाचणी घेण्यात आली.
****
नांदेड इथं आजपासून तीन दिवसीय १६व्या संगीत शंकर दरबार महोत्सवाला प्रारंभ होत आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाचं उदघाटन आज संध्याकाळी ५ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
****
महिलांच्या क्रिकेट टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, काल भारतानं बांगलादेशाचा १८ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या या सामन्यात, भारतानं प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित वीस षटकांत सहा बाद १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ वीस षटकांत आठ बाद १२४ धावाच करु शकला. भारताची शेफाली शर्मा सामनावीर ठरली.
****


No comments: