Tuesday, 25 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 25 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये दिल्लीतील हैदराबाद भवन इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, दहशतवाद, ऊर्जा आदी विषयांवर ही चर्चा होत आहे.

ट्रंप यांनी तत्पुर्वी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली. त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. त्यांनी त्या आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतली. `गार्ड ऑफ ऑनर`, एकवीस तोफांच्या सलामीद्वारे यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप याचं भारताच्या दौऱ्यावर आल्याबद्दल आभार मानलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. दरम्यान, ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया यांनी दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संध्याकाळी मेजवानीचं आयोजन केलं आहे.  
****
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभेमध्ये आज ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलं. तत्पुर्वी, विधानसभेचं कामकाज विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळानंतर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी तसंच महिला सुरक्षेवर तातडीनं चर्चा व्हावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी यावेळी केली. या मुद्दांवर आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्दांवर निदर्शनं केली. सरकारची शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. विधान परिषदेचं कामकाजही विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळानंतर अर्धा तास तहकूब करण्यात आलं.
****
शैक्षणिक शुल्कांचं नियमन करण्यासाठी राज्यात आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आणि एक पुनर्निरीक्षण समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल केली. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना या समित्यांकडे तक्रार करता येईल. प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे या आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच कामकाजाला सुरूवात करतील, अशी माहितीही शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.
****
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे. आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काल ते बोलत होते. गेल्या तीन महिन्यांत तिनही पक्षांमधे समन्वय आणि सहकार्य राहिलं आहे, ते आणखी मजबूत करू या, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसंच काँग्रेस नेतृत्वाशी आपला सतत संपर्क असल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
****
शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रूपये तसंच सरसकट कर्जमाफीची मागणी तसंच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. अकोला इथंही भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.
****
गोंदिया इथल्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि आमगाव तालुक्यातील कट्टीपार इथं महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील २९ हजार ५३ तात्पुरत्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून अंतिम यादी २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार आहे.

सांगली जिल्ह्यातही ९० हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा फायदा मिळणार आहे. दोन लाखापर्यंत पिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे दिलासा मिळणार असुन या योजनेमुळे ५२८ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याची माहीती जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिली आहे
****
नाशिक इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक गजानन यशवंत तथा बाळासाहेब दिक्षित यांचं आज पहाटे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. १९९२ मध्ये लातूर इथं झालेल्या भूकंपानंतर किल्लारी इथल्या पुनर्वसन कार्यात त्यांचा सहभाग होता.
****

No comments: