Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय
अधिवेशन उद्यापासून सुरू
होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते.
दरम्यान अधिवेशनाच्या
पूर्वसंध्येला आज होणाऱ्या शासनाच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
घेतल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. हे सरकार दिशाहीन आणि घूमजाव
करणारं असल्याचं सांगत, या कार्यक्रमात आपल्याला रस नसल्याचं फडणवीस म्हणाले.
****
शिवसेनेचा सीएएला विरोध
नाही. मात्र, एनआरसीमध्ये नंतर घातलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत, असं शिवसेनेचे नेते,
माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ म्हणाले. बुलडाणा इथं आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत
होते.
दरम्यान, भाजपशी त्यावेळी जुळवून घेणं अत्यंत अवघड झालं होतं. त्यामुळे
राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना भाजपपासून दूर गेल्याचं ते म्हणाले.
****
थोर समाजसुधारक, राष्ट्र्संत
गाडगे बाबा यांची जयंती आज राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी, गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
अमरावतीच्या संत गाडगे
बाबा विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना केंद्रानं
आज फेरी काढून गरजूंना कपड्यांचं वाटप केलं. यावेळी जिल्ह्यातली १७५ गावं विद्यापीठानं
दत्तक घेतली असून, विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न विद्यापीठ
करत आहे, अशी माहिती कुलगुरु डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी यावेळी दिली.
बीड इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात आज संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं.
यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही संत
गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी
गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. लातूर शहर महानगर
पालिकेतही गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. महानगरपालिकेचे सदस्य व्यंकट
वाघमारे आणि उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांच्या
प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा
एनसीआर हा देशाचे तुकडे करण्यासाठीच आणण्यात आल्याची टीका भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर
आझाद यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जाहीर सभेत
बोलत होते. हा कायदा देशातला बंधुभाव संपवणारा, तसंच संविधानाच्या कलम १४, १५ च्या
विरोधात असल्याचं ते म्हणाले.
सीएए एनआरसीच्या माध्यमातून
अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, सर्व मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या मतदानाचा अधिकार
संपविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राष्ट्रीय नागरिकता
नोंदणी एनपीआरला राज्य सरकार स्थगिती देऊ शकते. एनपीआरसाठी माहिती गोळा करण्यासाठी
येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती न देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र शासनानं पारित
केलेल्या सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ शहरातून आज सकाळी तिरंगा सन्मान रॅली
काढण्यात आली. या रॅलीत बाराशे फुट लांबीच्या तिरंगा ध्वजानं शहरवासीयांचं लक्ष वेधलं.
आम्ही माजलगावकर या समूहानं ही तिरंगा सन्मान यात्रा काढली होती.
****
कृषी संस्कृती ही जैविकता
आणि श्रमप्रतिष्ठेची जोपासना करत, आत्मसन्मानानं जगण्याची उर्जा देते, असं मत ज्येष्ठ
साहित्यिक फ. म. शहाजिंदे यांनी व्यक्त केलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेनं
एकुरगा इथं घेतलेल्या दुसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आज ते बोलत
होते.
वारकरी ग्रंथदिडी आणि
कवी नरसिंग इंगळे यांच्या पोवाड्यानं सकाळी या शिवार साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला.
यावेळी उदघाटक डॉ. नागोराव कुंभार, स्वागताध्यक्ष उद्योजक निलेश ठक्कर, माजी संमेलनाध्यक्ष
डॉ.सूर्यनारायण रणसुभे, जेष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, मराठवाडा साहित्य परिषदेचे
शाखाध्यक्ष डॉ.जयद्रथ जाधव आदींसह साहित्यरसिक उपस्थित होते.
*****
***
No comments:
Post a Comment