Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील
राज्यातलं सरकार येत्या एक मे पर्यंत एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीकपासून राज्याला
मुक्त करेल, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी
याची काल विधानपरिषदेत माहिती दिली. राज्यात २०१८ साली तत्कालीन सरकारनं एकवेळी उपयोगात
आणायच्या प्लॅस्टीक पिशव्या, चमचे, ताट आदींची निर्मीती आणि साठवणुकीवर बंदी घातली
होती. एकवेळा उपयोगात आणायच्या प्लॅस्टीक पिशव्या, स्ट्रॉ, कप आणि ताट आदींवर राज्यात
बंदी घालण्यात आली आहे पण अशा वस्तू अद्याप बाजारात दिसून येतात, अशी माहिती ठाकरे
यांनी काँग्रेसचे रामहरी रुपनवार यांनी विचारलेल्या प्रश्र्नाच्या उत्तरात दिली. आपण
अधिकाऱ्यांना राज्याला एक मे पर्यंत एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीकपासून मुक्त
करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली. शितपेयांसाठी
उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्लॅस्टीक बाटल्यांना तूर्त यातून वगळण्यात आलं असल्याची माहितीही
त्यांनी यावेळी दिली.
****
महिला अत्याचाराच्या प्रत्येक
तक्रारीची नोंद होणं आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं
आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं
आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची
कर्जमाफी टप्याटप्यानं केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यातील रस्त्यांची अतिशय
बिकट अवस्था झाली असून यासाठी लवकरच पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची
माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आशियाई विकास
बँकेच्या समन्वयानं रस्ते विकासकामांसाठी ही तरतूद करण्यात येईल, असंही त्यांनी विधानसभेत
एका पुरवणी प्रश्र्नाच्या उत्तरात सांगितलं. यासंदर्भात केंद्रीय रस्ता वाहतूक आणि
महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई
यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं
आहे. मोरारजी देसाई हे आयुष्यभर शिस्तप्रिय आणि राजकारणामधील आपल्या सिद्धांतांवर ठाम
राहिल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुढच्या वर्षीच्या मार्च पर्यंत
एक लाख ४० हजार रिक्त जागा भरल्या जातील, अशी माहिती कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष
ब्रज राज शर्मा यांनी काल दिली. त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटून
राजपत्रित आणि गैर राजपत्रित रिक्त पदांबद्दल त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत १४ हजार
६११ रिक्त पद भरल्याचं त्यांनी सांगितलं. या जूनच्या अखेरीस अतिरिक्त ८५ हजार पदं भरली
जातील, असंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्हा परिषद समाज
कल्याण विभागानं आज दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्यांचा मेळावा घेतला.
राज्याचे महसुल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन
झालं. आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात
बंदींसाठी आज कुटुंब भेटीचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद मध्य विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक
दिलीप झळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उदघाटन करण्यात आलं. बंदींसाठी वर्षातून दोन
वेळा असा उपक्रम आयोजित करण्यात येतो.
****
नांदेड जिल्ह्यात टमाटोच विक्रमी
उत्पादन झालं आहे. मात्र बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर टमाटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.तरी शासनानं
टमाटो शेतीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच रुपये किलो प्रमाणे अनुदान
देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्ध
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर बिनबाद त्रेसष्ट धावा केल्या आहेत.
ख्राईस्टचर्च इथं हँगले ओव्हल मैदानावर सुरू या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारताचा पहिला डाव २४२ धावांत बाद झाला आहे. यात हनुमा
विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा
केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड
एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
भारतीय संघानं आयसीसी महिला
टीट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम साखळी सामन्यात श्रीलंकेवर सात गडी
आणि ३२ चेंडू राखून विजय नोंदवला.
****
No comments:
Post a Comment