Wednesday, 26 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 26.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 26 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
हिला अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेशमधे असलेल्या दिशा कायद्यानुसार राज्यामध्येही कायदा असावा या मुद्दावर राज्य विधानपरिषदेत आज चर्चा झाली. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातील प्रश्र्न उपस्थित केला होता. 

िधानसभेमध्ये भाजपनं स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मांडलेला गौरव प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. यावर वादळी चर्चा झाली. हा गौरव प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

राज्य विधानसभेनं काल ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर केलं असून आता सरपंचांची निवड ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. दरम्यान, सरपंचाच्या निवडीचं विधेयक घाईघाईत मंजूर केलेलं असून ते घटनाबाह्य असल्यानं या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्य सरकारनं केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.
****
परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः सागरी आणि अवकाश विषयक माहितीची देवाण घेवाण करुन, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मनोदय दोन्ही नेत्यांनी काल संध्याकाळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केला आहे. ट्रंप यांची भारत भेट ऐतिहासिक ठरल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. ट्रंप काल रात्री आपला भारत दौरा आटोपून अमेरिकेला रवाना झाले.
****
भारतीय वायुसेनेनं बाकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी याच दिवशी हवाई दलानं पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा भागात बालकोट इथल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ले करुन ते उद्धवस्त केले होते. या हल्ल्यात जैश-ए- मोहम्मदचे दहशतवादी, प्रशिक्षक आणि काही म्होरके मारले गेले होते. दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या हल्ल्यात भारतीय वायुसेनेनं दाखवलेल्या अतुलनीय साहसाबद्दल वायुसेनेचा गौरव केला आहे.
****
निवृत्ती वेतनाचं अंशराशीकरण करण्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालयानं घेतला आहे. देशभरातल्या सहा लाख तीस हजार निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ होणार आहे.
****
माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माथाडी कामगारांनी आज पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा कोणताही परिणाम नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिसून आलेला नाही. फळ, भाजीपाला बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. सकाळी ५०० गाड्या भाज्यांची आवक झाली आहे. मात्र कांदा बटाटा बाजारा मधील सर्व व्यवहार बंद आहेत.
****
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील एक्काहत्तर कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे प्रवर्तक माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले आणि अन्य तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद सदस्य होते.
****

No comments: