Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २३ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
कला आणि शिल्पकलेबरोबरच आपल्या देशात खाद्यपदार्थांचीही विविधता
आहे. भारताच्या प्रत्येक भागामध्ये भरवल्या जाणाऱ्या मेळावे, जत्रा, प्रदर्शनांमधून
भारत नेमका कसा आहे, हे अनुभवण्याची आपल्याला संधी मिळते, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरवर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून भारतामध्ये
जवळपास पाचशेपेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी येतात. याविषयी,
तसंच मेघालयात जीवशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या माशाच्या एका नवीन प्रजातीबद्दलही पंतप्रधानांनी कुतूहल व्यक्त
केलं.
श्रीहरिकोटा इथून होणारं रॉकेटचं लॉचिंग त्या केंद्रावर
अगदी समोर बसून पाहण्याची सुविधा आता
सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांना तिथं घेऊन जात आहेत, याबद्दल त्यांनी समाधान
व्यक्त केलं. तसंच इस्रोच्या युविका उपक्रमाबद्दलही त्यांनी माहिती दिली.
लडाखच्या लेह इथल्या जगातल्या सर्वाधिक उंचीवरच्या विमानतळावरून
भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ विमानानं ३१ जानेवारीला
उड्डाण केलं, या विमानामध्ये झाडांच्या अखाद्य तेलापासून बनवण्यात आलेलं दहा टक्के
बायो-जेट इंधनाचं मिश्रण वापरण्यात आलं होतं. या प्रयोगामुळे कार्बन उत्सर्जन कमी
होण्याबरोबरच, इतर देशांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल, असंही नरेंद्र मोदी
म्हणाले.
अवघ्या बारा वर्ष वयात दक्षिण
अमेरिकेतल्या सर्वात उंच माउंट अंकागुआ शिखरावर तिरंगा
फडकावणाऱ्या काम्या कार्तिकेयन हिचा प्रत्येक
भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
केरळमधल्या कोल्लममध्ये राहणाऱ्या १०५वर्षांच्या
भागीरथी अम्मा यांची, तसंच मुरादाबादच्या हमीरपूर या गावामध्ये राहणाऱ्या दिव्यांग सलमानची यशोगाथाही
पंतप्रधानांनी ऐकवली.
आगामी होळी, गुढी-पाडवा, चैत्री नवरात्र आणि राम-नवमी बरोबरच चैत्र
शुक्ल- प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या भारतीय नववर्षाच्याही
त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
****
भारताची आरोग्यविषयक देखरेख व्यवस्था सक्षम असल्यानंच, भारत कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहिला
आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं
आहे. याआधीही भारतातल्या वैद्यकीय तज्ञांनी इबोला, निपाह या विषाणूंवर, तसंच स्वाइन फ्ल्यू या आजारांवर नियंत्रण
मिळवलं होतं, याचीही हर्षवर्धन यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्रात, मुंबई इथं आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान
संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतीचा शिलान्यासही काल हर्षवर्धन यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
****
प्रश्न जाणून घेण्याच्या
पद्धतीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नसून, माझे विचार अजूनही तरुणच आहेत, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई
इथं आज पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांसाठी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर
या कार्यक्रमात चर्चासत्र घेण्यात येत आहे.
****
औरंगाबाद शहरात आज भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद
यांच्या उपस्थितीत सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात फेरी काढण्यात आली आहे. शहरातल्या
सुभेदारी विश्रामगृहापासून या रॅलीला सुरूवात झाली. भडकल दरवाजा जवळच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण
करून ही रॅली मिल कॉर्नर, औरंगपुरा, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे विभागीय
आयुक्त कार्यालयासमोर पोहोचली.
****
लातूर जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये महाशिवरात्रीला भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार सममोर आला होता.
मौजे याकतपूर, हसेगाववाडी, नागरसोगा, जवळगा, वानवडा या गावातील कांही लोकांना मळमळ, उलट्या,
चक्कर येणं अशी लक्षणं आढळून आल्यानं त्यांना औसा इथल्या ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. रुग्णांनी खरेदी केलेल्या भगरीचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन विभागानं प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. भगर खरेदी करताना आणि खाताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कथित वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतर, आज त्यांच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यातल्या
अकोले इथं कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment