Monday, 24 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.02.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२४ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन; शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार
** अमेरिकेचे ध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज
** राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करील- खासदार शरद पवार
** आणि
** पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर दहा गडी राखून विजय
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य सरकार ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजनेंतर्गत’  शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करणार असल्याचं सांगितलं. पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावातील पात्र  शेतकऱ्यांची यात नावं आहेत.येत्या २८ फेब्रुवारीला दुसरी यादी जाहीर होणार असून, तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं, ते म्हणाले. एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आपण दिला नसून, केंद्रानं तो घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपलं समर्थन असल्याचा मात्र राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी- एनपीआरमध्ये जनतेच्या दृष्टीनं अडचणीच्या तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या जेष्ठ मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितलं. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी राज्य शासन कडक पावलं उचलत असून  आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कठोर कायदा करण्यात येणार असल्याचं  ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया राज्य शासन पूर्ण ताकदीनं लढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे सरकार दिशाहीन आणि घूमजाव करणारं असल्याचं सांगत आम्हाला चहापानाच्या कार्यक्रमात रस नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
या अधिवेशनात   पटलावर ६ अध्यादेश ठेवण्यात येतील. तर १३ विधेयकं अधिवेशनात प्रस्तावित करण्यात आली आहेत.
****
अमेरिकेचे ध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज सकाळी साडे अकरा वाजता भारतात पोहोचत आहेत. काल सायंकाळी भारत भेटीसाठी ते अमेरिकेतून निघाले आहेत. ट्रम्प यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळदेखील आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानं त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर ते आग्र्याला जातील आणि सायंकाळी नवी दिल्लीत त्यांचं आगमन होईल. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काल ट्विट संदेशाद्वारे सांगितलं.
दरम्यान, ट्रम्प यांच्या भारतभेटीदरम्यान आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
भारताची विशालता आणि विविधता देशातल्या नागरिकांसाठी प्रेरणा स्रोत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आाहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कला आणि शिल्पकलेबरोबरच आपल्या देशात खाद्यपदार्थांचीही विविधता असून, भारताच्या प्रत्येक भागामध्ये भरवल्या जाणाऱ्या मेळावे, जत्रा, प्रदर्शनांमधून भारत नेमका कसा आहे, हे अनुभवण्याची संधी मिळते, असं ते म्हणाले. दरवर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून भारतामध्ये जवळपास पाचशेपेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी येतात. पुढचे तीन वर्ष भारत प्रवासी पक्ष्यांवरच्या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या भारताची महिला समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याऱ्या आव्हानांचा स्वीकार करत असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी महिला सशक्तिकरणाचे काही दाखले दिले. आगामी होळी, गुढी-पाडवा, चैत्री नवरात्र आणि राम-नवमी बरोबरच चैत्र शुक्ल- प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या भारतीय नववर्षाच्याही पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत मुंबईकाल पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांसाठी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांना सोबत घेऊन जाणारी व्यक्ती असून ते योग्य दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं पवार म्हणाले. आघाडीतल्या मतभेदांसंदर्भात बोलतांना पवार यांनी हे आघाडी सरकार आहे, आघाडीची स्थापना करताना सर्व घटक पक्षांनी काही अटींवर एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या तरतुदींच्या आधारावरच राज्यघटनेत आतापर्यंत शंभरावर दुरुस्त्या झाल्या असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं, जनुभाऊ रानडे स्मृतिदिनानिमित्तसंविधान बचाव.. पण कोणापासूनया विषयावर बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

ही घटना काळानुसार यात तुम्हाला बदल करावे लागतील हे ओळखून बाबासाहेबांनी घटनेत दुरुस्तीची तरतुदीं बाबासाहेबांनी ठेवलेली आहे. त्यांना बाबासाहेब कळले नाही, त्यांना घटना कळली नाही, ते कालांतराने म्हणतात संविधान बचाव.

विविध देशातल्या निर्वासितांना भारतीय नागरिकता देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यात आतापर्यंत सहा वेळा सुधारणा करण्यात आल्याचं तोरसेकर यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात काल भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात फेरी काढण्यात आली. सुभेदारी विश्रामगृहापासून विभागीय आयुक्तालयापर्यंत ही फेरी काढण्यात आली. परभणी  इथही काल भीम आर्मी संघटनेतर्फे, संविधान विरोधी अधिनियम मागे घेण्याची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे  देण्यात आलं.
***
हिंगोली इथं जिल्हा पोलीस दलातर्फे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर काल घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन इन डायव्हर्सिटी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवणं, हा उद्देश असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटातून अंकिता गव्हाणे तर पुरुष गटातून ओम कव्हेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
****
थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी, गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड, आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच लातूरमध्ये महानगरपालिकेचे सदस्य व्यंकट वाघमारे आणि उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
वेलिंग्टन इथल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहाटे यजमान न्यूझीलंडनं दहा गडी राखून भारतावर विजय मिळवला.  सामन्यात, आजच्या चौथ्या दिवशी, दूसऱ्या डावात भारतानं चार बाद १४४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र,१९१ धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला. पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी केवळ ९ धावाचं आव्हानं मिळालं. प्रत्त्युत्तरात न्युझीलंडनं एकही गडी न गमावता विजयासाठी आवश्यक नऊ धावांचं लक्ष्य पार केलं. दोन सामन्यांच्या मालिकेत न्युझीलंडनं एक शून्यनं आघाडी घेतली असून पुढील  सामना येत्या २८ फेब्रुवारीला क्राईस्टचर्च इथं खेळला जाईल.
***
नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत काल, जितेंद्र कुमारनं ७४ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं आणि ऑलिपिंक पात्रता संघातही स्थान पक्क केलं. पुण्याचा राहुल आवरेनं, ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवलं. त्यानं इराणच्या माजीद दस्तानला ५-२ असं पराभूत केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये महाशिवरात्रीला भगरीतून विषबाधा झालेल्या नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. मौजे याकतपूर, हसेगाववाडी, नागरसोगा, जवळगा, वानवडा या गावातल्या कांही लोकांना मळमळ, उलट्या, चक्कर येणं अशी लक्षणं आढळून आल्यानं, त्यांना औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णांनी खरेदी केलेल्या भगरीचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन विभागानं प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
****
कृषी संस्कृती, जैविकतेची जोपासना करत श्रमप्रतिष्ठेला कवेत घेऊन आत्मसन्मानाने जगण्याची उर्जा देते, असं मत फ. . शहाजिंदे यांनी व्यक्त केलं. लातूरच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेनं एकुरगा इथं काल घेतलेल्या दुसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. संमेलनं मिरवण्याचा भाग न बनता समाजाला मूल्यदृष्टी देत निरोगी, व्यापक आणि डोळसता निर्माण करणारी असावीत, असं मत उद्घाटक डॉ.नागोराव कुंभार यांनी व्यक्त केलं. वारकरी ग्रंथ दिंडी आणि कवी नरसिंग इंगळे यांच्या बहारदार पोवाड्यानं या शिवार साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या एका कंपनीतून व्यापारी विशाल दाड यांची पाच लाख ८० हजारांची रोख रक्कम लुटणाऱ्या चार संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकानं काल ताब्यात घेतलं. कंपनीतल्या एका नोकरानं दिलेल्या माहितीवरून पोलीस रेकॉर्डवरील संशयितांनी ही रक्कम लुटल्याचं तपासात समोर आलं आहे.
****

No comments: