Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
सैन्यदल लैंगिक समानतेचा आदर
करत असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सैन्यात महिलांसाठी कायमस्वरूपी कमिशन
देण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला असल्याचं, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सैन्यदलात धर्म जात किंवा लैंगिक
भेदभाव केला जात नाही, असं सांगतानाच, सैन्य दलानं अनेक स्तरांवर महिलांची भर्ती करण्याबाबत
पुढाकार घेतला होता, असं जनरल नरवणे यांनी नमूद केलं.
****
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी
युवकांना मोठ्या संखयेनं राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. आज नवी दिल्ली इथं भारतीय
विद्यार्थी संसदेच उद्धाटन नायडू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनसेवा आणि आवश्यक सामाजिक आर्थिक
बदल परिवर्तन होण्यासाठी राजकारण हे एक सशक्त माध्यम असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, मातृभाषेला प्रोत्साहन देणं
गरजेचं असल्याचं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाच्या
निमित्तानं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच
द्यायला हवं असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या “मन की बात” या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६२
वा भाग असेल.
****
एक भारत श्रेष्ठ भारत
या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात
आज एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि ओडिशा राज्यामधील
सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने विविध कार्यक्रम
घेण्यात आले. यावेळी ओडिशा भाषेतील पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात असणारी एकत्र कुटुंब
पद्धती, परंपरा यांच्याविषयीची यावेळी देण्यात आली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं आज नागरिकता
संशोधन कायदा - सीएएच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयावर तिरंगा फेरी काढण्यात आली. या
समर्थन मोर्चात साडेतीनशे फूट लांबीचा तिरंगा घेऊन जाणारे नागरिक लक्ष वेधून घेत होते.
कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर यांना नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ निवेदन
देण्यात आलं. या निवेदनावर एक हजार नागरीकांनी या कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी
केली आहे.
****
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे इथं
केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार आरक्षण संपवण्याचा प्रयत्न
करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, धुळे जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांबाबतचं
एक निवेदनही देण्यात आलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पाच लाख
75 हजार शेतकऱ्यांना माती परीक्षण आरोग्य पत्रिका देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात
झालेल्या माती परीक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यात मातीमधील नत्राचे प्रमाण कमी झाल्याचं
दिसून आलं तर स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण अधिक असल्याचे निष्कर्ष हाती आले आहेत.
शिरोळ तालुक्यात जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढलं. यातून शिरोळ तालुक्यात दहा हजार एकर
जमीन क्षारपड झाली हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. क्षार जमिनीत सुधारणा करण्याची
मोहीम काही संस्थांनी हाती घेतली आहे. यातून 500 हेक्टर जमिनीमध्ये सुधारणा झाल्याचं
दिसून आलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज दिवसभर चाललेल्या पीक पाणी परिषदेचा,
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या हक्काचं
168 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी 'पायथा ते माथा' धरणे भरण्यात यावीत, यासाठी लोकप्रतिनिधींनी
विधिमंडळात आग्रही राहावं, असं मत व्यक्त केलं. मराठवाडा गोदावरी पाटबंधारे मंडळानं
ऊर्ध्व वैतरणा धरणातून प्रवाही पद्धतीने ११ टीएमसी पाणी मुकणे धरणामार्गे गोदावरी धरणात
वळवावं, कृष्णा भीमा खोऱ्यातील ४० टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावं यासह अन्य मागण्या
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोर सादर करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
या परिषदेत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, प्रदिप देशमुख, उदय देवळाणकर शंकरराव नागरे, विजय
अण्णा बोराडे यांनी मार्गदर्शन केलं.
****
उद्या साजऱ्या होत असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. उद्यापासून तीन दिवस
इथं पारंपारिक उत्सच साजरा केला जाणार असून आज मध्यरात्रीपासूनच भाविकांना दर्शनासाठी
मंदिर खुलं करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर इथंही मोठ्या
संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात, मंदीर व्यवस्थापनानं या भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांसह
सुरक्षा यंत्रणाही चोख ठेवली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment