Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
मराठी भाषा दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
साजरा करण्यात आला. औरंगाबाद
इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात शासकीय
विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं. माहिती आणि
जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, मराठी भाषेचा प्रत्येकानं वापर वाढवला पाहिजे, याची सुरूवात स्वत:पासून करावी, असं आवाहन केलं. पंजाबी बांधवांनी त्यांच्या ग्रंथात संत नामदेवाचं अभंग सहज स्वीकारले, तसंच मराठीनेही
अन्य भाषेतील शब्द संपदेबाबत सर्व समावेशक पद्धतीनं
विचार करून अधिक समृद्ध होण्याची गरज रामदासी यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद इथल्या सरस्वती
भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आज प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं.
पुणे इथल्या अक्षर वाङमय प्रकाशन संस्थेनं यावर्षीपासून
उत्कृष्ट वाचक पुरस्कार सुरू केला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले सेवानिवृत्त
मुख्याध्यापक भास्कर गायकवाड यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गायकवाड हे या पुरस्काराचे
पहिले मानकरी ठरले आहेत.
जालना जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत
पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे यांनी यावेळी
व्यक्त केली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून आज
मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध
उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात आज भूकंपाचे सौम्य
धक्के बसले. कळमनुरी तालुक्यात बोधी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव या परिसरात आज पहाटे
दोन सौम्य धक्के जाणवले असून, भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण निर्माण झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवानं या ठिकाणी
कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी
इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या
विरोधात रेणापूर परिसरातल्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाज्यासमोर काल दुपारपासून
सुरू केलेलं धरणं आंदोलन आजही सुरू आहे. पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय
आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी
चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे.
रेणापूर शहरातलेही बहुतांश
व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिशा समितीची
बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या त्रेचाळीस योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना
खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या. कयाधू नदी काठावरील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट
तातडीने लावावी, प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी, पिक विमा योजनेची
व्याप्ती वाढवावी, आदी सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या.
****
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीला नेरळकर यांचं आज
सकाळी अल्पशा आजारानं औरंगाबाद इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर
औरंगाबाद इथं रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद शहराच्या उल्कानगरी भागात खिंवसरा पार्क इथं असलेल्या एका इमारतीत तळमजल्यावरच्या गोदामाला आज पहाटे साडे ५ वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत संस्कार श्यामसुंदर
जाधव या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसून गोदामात ठेवण्यात आलेल्या विजेच्या साहित्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत
परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथले ६२८ तसंच सेलू तालुक्यातल्या गिरगाव इथल्या ९६ शेतकऱ्यांच्या
कर्ज माफीच्या याद्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या यादीतल्या शेतकऱ्यांचे
आधार प्रमाणीकरण देखील सुरु झालेले आहे. दुसरी यादी उद्या २८ फेब्रुवारीपासून पोर्टलवर
प्रसिद्ध होणार आहे
*****
***
No comments:
Post a Comment