Saturday, 22 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.02.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 विकासाच्या बाबतीत केंद्राचं राज्याला कायम सहकार्य राहिल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. वस्तू आणि सेवा करातला राज्याचा महसुली वाटा, प्रधानमंत्री पिक विमा योजना, यासह इतर विषयांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याला जीएसटी परतावा जलदगतीनं मिळावा तसंच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे केल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
****

 जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे संरक्षण दलानं दोन दहशतवाद्यांना ठार केलं. लष्कर ए तय्यबाचे हे दहशतवादी आहेत. संगम बिजबेहरा परिसरात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर उडालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण दलानं दिली आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशामधील कटक इथं सुरू होत असलेल्या देशातल्या पहिल्या खेलो इंडिया या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उदघाटन करणार आहेत. कटक इथल्या जवाहरलाल नेहरु मैदानावर येत्या एक मार्च पर्यंत सतरा प्रकारांमधील या स्पर्धा होणार आहेत. देशभरातून एकशे एकोणसाठ विद्यापीठांचे सुमारे साडे तीन हजार खेळाडू या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.
****

 न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात, पहिल्या डावात भारताचा संघ अवघ्या १६५ धावा काढून तंबूत परतला. बेसीन रिझर्व्ह इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं आज, दुसऱ्या दिवशी पाच बाद एकशे बावीस धावसंख्येवर पुढं खेळायला सुरूवात केली. मात्र भारताचे उर्वरित पाच गडी फक्त त्रेचाळीस धावांची भर घालून तंबूत परतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा न्युझीलंडनं पहिल्या डावात तीन बाद १८० धावा केल्या होत्या.
*****
***

No comments: