Saturday, 22 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.02.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००

****

सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय बदलण्यासाठी राज्य सरकार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक मांडणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या संदर्भातील अध्यादेश काढण्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सोमवारी सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडायला राज्यपालांनी सांगितलं आहे. यानुसार आपलं सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडून संमत करून घेईल, अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. यापूर्वीच्या भाजपच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सरपंचांची थेट निवड करण्याला मान्यता दिली होती. १९५८च्या राज्य ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदींमध्ये दुरुस्ती करून सरपंचांची निवड थेट गावातल्या लोकांमधून करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं तीन जुलै २०१७ रोजी घेतला होता.

****

राज्यात कोरोना विषाणुच्या संशयित सत्त्याहत्तर रुग्णांपैकी ७३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. चार जण निरीक्षणाखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजपर्यंत राज्यात बाधीत भागातून २७९ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. या ७७ जणांचे रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यावेळी यापैकी कुणालाही लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या मुंबईत २ आणि पुण्यात दोन संशयित निरी्क्षणाखाली आहेत.

****

येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसनं अजून उमेदवार निश्चित केलेले नाहीत. राज्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात राज्यसभा सदस्यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपत आहे. त्यामुळे या सात जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

****

येत्या सात मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एका संदेशाद्वारे दिली आहे. सात मार्चला अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेतील, त्यानंतर ते संध्याकाळी शरयू आरतीला उपस्थित राहणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. नवीन प्रभाग रचनेबाबत कॉंग्रेस समाधानी नाही आणि यात हस्तक्षेपाच्या मागणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र देईल, असंही हुसैन यांनी सांगितलं. महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा तयार केला जात असून त्यामध्ये ई कचरा, कर संकलन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा या मुद्यांचा समावेश केला जाईल असं मुजफ्फर हुसैन यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद कार्यकारणीमधल्या काही पदाधिकाऱ्यांना पक्ष विरोधी वर्तनामुळे आज काढून टाकण्यात आलं आहे. शहर जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, अनुसूचीत जाती मोर्चा अध्यक्ष उत्तम अंभोरे, शहर चिटणीस रंगनाथ राठोड आणि संतोष सुरे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचं भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पक्षाचे आमदार अतुल सावे यांची औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

एखादा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होणार असेल तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचं भूमीपूजन करतात, त्यामुळे मनमाड-मालेगांव-धुळे-इंदूर हा पंतप्र्धानांनी भूमिपूजन केलेला रेल्वेमार्ग पूर्ण होणारच अशी ग्वाही खासदार सुभाष भामरे यांनी दिली आहे. ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या रेल्वेमार्गासाठी जमिनी अधीग्रहीत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी काही शेतकऱ्यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात फक्त एक हजार रुपयांची तरतूद असून पंतप्रधान आणि भाजपचे अन्य नेते जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता, त्या पार्श्वभूमीवर भामरे यांनी आज ही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...