Wednesday, 26 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 26.02.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२६ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** भारताबरोबचे संबंध अधिक वृद्धींगत करण्याची इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यक्त
** ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर
** जलयुक्त शिवार अभियानात नव्यानं कोणतंही काम नाही - जलसंधारणमंत्र्यांकडून स्पष्ट
** राज्यसरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर भाजपतर्फे काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
आणि 
** चांगल्या वृत्तीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहून नवनिर्मितीचा प्रयत्न करावा- नाट्यलेखक  दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांचं आवाहन
****
भारताबरोबचे संबंध अधिक वृद्धींगत करण्याची इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा आदी विषयांवर ही चर्चा झाली. मानसिक आरोग्य आणि औषधनिर्माण सुरक्षेसह अनेक सामंजस्य करार यावेळी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीनंतर बोलताना, इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध असल्याचं म्हटलं. भारताबरोबर तीनशे दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार आहेत, असं सांगितलं.
दरम्यान, ट्रम्प आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मेलानिया यांचं काल राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ दिलेल्या रात्रीभोज कार्यक्रमाला ट्रम्प दाम्पत्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ट्रम्प यांनी काल राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली. त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. रात्री उशीरा ट्रम्प आपला भारत दौरा आटोपून अमेरिकेला परतले.
****
राज्य विधानसभेनं काल ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर केलं. त्यानुसार आता सरपंचांची निवड ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. सरकारनं नुकताच यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार देत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधेयक विधीमंडळात मांडण्यास सांगितलं होतं.

सरपंचाच्या निवडीचं विधेयक घाईघाईत मंजूर केलेलं असून ते घटनाबाह्य आहे, या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावं असं, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्य सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानात नव्यानं कोणतंही काम हाती घेतलं जाणार नसल्याचं जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ न देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गडाख बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारनं ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचं नाव बदलून या योजनेची कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनानं दिलेले नाहीत, असं गडाख यांनी स्पष्ट केलं.
****
राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे. आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून केलेली नेमणूकही रद्द करण्यात आली आहे. या दोघांनीही पद स्वीकारण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयात मात्र नेमणूक रद्द करण्याचं कुठलंही कारण दिलेलं नाही.
****
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर यांची काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे काल याबाबतचं पत्र दिलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यसरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर काल भाजपतर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रूपये मदत, सरसकट कर्जमाफीची मागणी आणि राज्यात महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध या मुद्यांवर हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद तसंच जालना इथं वीज भारनियमन रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. नांदेड इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. लातूर इथं या आंदोलनाचं नेतृत्व खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं आंदोलनादरम्यान, कृष्णा खोऱ्याचं पहिल्या टप्प्यातील सात दशलक्ष घनफूट पाणी दिलं जावं तसंच `वॉटर ग्रीड` योजनेला मंजूरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
****
चांगल्या वृत्तीच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहून नवनिर्मितीचा प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन प्रसिध्द नाट्यलेखक आणि दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या ‘चित्रपट आणि स्त्रीवाद’ या विषयावर आयोजित पाचदिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन काल तांगडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक अंजली माँन्टेरो यांनी आपल्या बीजभाषणात, एखादा संवेदनशील विषय ज्यावेळेस चित्रपटात हाताळला जातो तेव्हा तो बघण्याची समज देखील विकसित होणं गरजेचं असल्याचं सांगितलं.
****
 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना काल नवी दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवी गुलज़ार यांच्या उपस्थितीत अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते अनुराधा पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथल्या मुकुंद चौधरी या तरूण शेतकऱ्यानं गुळ उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरूणांना रोजगार निर्माण करून दिला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर .....

चौधरी यांनी पाथरी नजीक स्वतःच्या शेतात उत्तर प्रदेशातून मजूर आणून कोणतेही केमिकल न टाकता उत्पादनास सुरवात केली यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला  ऊसाचा पाक, गुळ २५ तरूण घरोघर जाऊन विकतात यामुळे ग्राहकांना गुळ स्वस्तात मिळतो आणि तरुणांना रोजगार या वसतीत तर जागेवर गुळा­ विक्री मोठ्या प्रमाणात झाली. शासनाने गुळाचा उतारा पाहून अनुदान द्यावे तर या व्यवसायाला आणि ग्रामीण तरुणांना भविष्य आहे.

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि औषधी तपासणी विभागानं काल आष्टी इथल्या वीस दूध केंद्रांवर छापे मारले. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
****
परभणी इथं प्लास्टिकची, विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्यांवर येत्या एक मार्चपासून महिला बचत गटांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. परभणी महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
****
नांदे़ड इथं डॉ शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण पुण्यतिथी निमित्तानं आयोजित संगीत शंकर दरबार या तीन दिवसीय महोत्सवाचं काल उदघाटन झालं. आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात आज आणि उद्या सुंद्री वादन, व्हायोलिन वादन, शास्त्रीय गायन, वीणा वादन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संगीत शंकर दरबार आयोजनाचं हे १६ वं वर्षे आहे.
****
लातूर शहर महापालिकेनं महावितरण कंपनीचे १२ कोटी रुपये वीज देयक न भरल्यामुळे कंपनीने पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद केला होता. यापैकी महापालिकेने धनेगाव इथल्या पंपाचे एक महिन्याचे आणि हरंगुळ इथल्या पंपाचे दोन महिन्याचे असे ६९ लाख रुपये भरल्या नंतर काल सायंकाळी दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत केला. त्यामुळे गेल्या १७ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा कालपासून सुरू झाला.
****
अहमदनगर-परळी-बीड रेल्वेप्रमाणे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निधी देण्याची मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या ८० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी ९५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, यापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारने रेल्वे मंडळास उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.
****
तुळजापूर तालुक्यात माळुंबा इथल्या महावितरणच्या उपकेंद्रातला कामगार विजयानंद डोरनाळीकर याला अडीच हजार रूपये लाच घेतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या शेतात वीजपुरवठा देण्यासाठी त्याने ३० हजार रुपये लाच मागितली होती.
****
औरंगाबाद इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी इथला लिपिक सतीश मुळे याला काल लाच घेताना अटक करण्यात आली. आपल्या कार्यालयातल्या सहकाऱ्याचा बदलीचा अर्ज वरिष्ठांपुढे सादर करण्यासाठी मुळे यानं पंचवीस हजार रूपये लाच मागितली होती.

****

No comments: