Friday, 21 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.02.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००

****

राज्य मंत्रिमंडळातल्या सदस्यांसाठी मुंबईत मलबार हिल परिसरात अठरा मजली निवासी टॉवर उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. सुमारे अडीच हजार चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर ही इमारत उभारली जाणार असून, त्यातल्या प्रत्येक सदनिकेत एक भव्य दिवाणखाना, चार शयनकक्ष, स्वयंपाकघर, कार्यालय, अँटीचेंबर, अभ्यागत कक्ष, दोन कर्मचाऱ्यांची निवासकक्ष यासह इतर अनेक सुविधा असतील. या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

****

सातबारा कोरा करण्याचं आश्वासन या राज्य सरकारनं पाळलं नाही, या आणि इतर मागण्यांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्ष राज्यभरात आंदोलन करणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्जमाफी, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये आर्थिक मदत या घोषणा सरकारनं केल्या होत्या, मात्र ही मदत अद्याप मिळाली नाही, असं बागडे म्हणाले. या मागण्यांसाठी २५ फेब्रुवारीला औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर तालुक्यांच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं बागडे यांनी सांगितलं.

****

श्यामाप्रसाद मुखर्जी रुरर्बन मिशन अर्थात ग्राम शहरीकरण अभियानाला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाला प्रारंभ केला होता. चोहोबाजूने विकासाच्या वाटा खुल्या होतील अशा ग्रामसमूहांचा विकास करणं, देशातली गावं स्मार्ट बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येत्या तीन वर्षात हा उपक्रम देशभरातल्या एक हजार खेड्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सहाय्यक लेखाधिकारी बालासाहेब किशनराव मोरे सोनखेडकर यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या सोनखेड या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचं आज अल्पशा आजारानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. ते सलग दोन वेळा जनता दलाचे आमदार म्हणून निवडून आले होते. परखड वक्तृत्व आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख होती.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पैठण इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष बांधणी आणि तालुक्यातल्या विविध योजना आणि विकास पश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. मात्र, यादरम्यान विधानसभा निवडणूक पराभवाच्या मुद्यावरून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त आहे. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं आज महाशिवरात्री निमित्त स्नेह मेळावा घेण्यात आला. या स्नेहमेळाव्यात भटके विमुक्त समाजातल्या ३३ जाती उपजातींचे बांधव सहभागी झाले.

****

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी काल याबाबतची अधिकृत घोषणा केली.

****

महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र भक्तीभावानं साजरा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातल्या प्राचिनकालीन शिव मंदिरात भाविकांनी महादेव दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
जालना इथं पंचमुखी महादेव, मुक्तेश्वर महादेव मंदिरासह भोलेश्वर बरडी इथं भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.
परभणी शहरातल्या बेलेश्वर, पारदेश्वर महादेव मंदिरांसह, जिंतूर तालुक्यातल्या मैनापूरी माळावरील महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथं दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी नागनाथाचं दर्शन घेतल्याचं आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे.
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध असून यावर्षी ही यात्रा ८ मार्चपर्यंत चालणार आहे.

****

ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं निर्धारीत २० षटकांत चार बाद १३२ धावा केल्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या संघानं १९ षटकं आणि पाच चेंडुत ११५ धावात सर्वबाद झाला. भारताची पूनम यादव सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

****

No comments: