आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांची
जयंती २७ फेब्रुवारी हा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईत
विधानभवनात यानिमित्तानं ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन, तसंच १२ बलुतेदारांच्या चित्रप्रदर्शनाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर
जीवन गौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत पुरस्कार, डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक
पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज वितरण केलं जाणार आहे.
औरंगाबाद इथं शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये
पहिली ते दहावी या इयत्तेसाठी मराठी भाषा विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य
करण्यात येणार आहे. काल विधान परिषदेत हे विधेयक सर्वसंमतीनं मंजूर झालं. या नियमाचं
उल्लंघन करणाऱ्या शाळांवर एक लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.
आज मराठी भाषा दिनी हे विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी
मांडण्यात येणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्यानं या निर्णयाची
अंमलबजावणी करण्यात येईल.
****
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली ९ गावं आणि
७७ वाड्यावस्त्यांवर आजही मराठी शाळा नसल्याचं समोर आलं आहे. या भागात कर्नाटक सरकार
फक्त कन्नड शाळासाठी मदत करत आहे. जत तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे.
मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना सरकारनं या भागातल्या मराठी शाळांकडे लक्ष देण्याची
मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
****
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या
सुविद्य पत्नी सुशीला नेरळकर यांचं आज सकाळी ६ वाजता अल्पशा आजारानं औरंगाबाद इथं निधन
झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या औरंगाबाद इथं रुग्णालयात उपचार सुरु होते,
त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment