Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२०
सकाळी ७.१० मि.
****
** मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा
ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर
** भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षण आंदोलनातले
काही गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी
बंदी घालण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
आणि
** महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत
केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी शिफारस करणारा ठरावही विधीमंडळाच्या दोन्ही
सभागृहात काल एकमतानं मंजुर झाला. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी तो सभागृहात
मांडला. २०१३मध्ये साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालच्या समितिनं तयार केलेला
५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला, मात्र त्यानंतर याबाबत फारसे काही घडले
नसल्याचं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. यासंदर्भात पाठपुरावा
करण्यासाठी, साहित्यिक आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी
केली. पाठपुराव्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाण्याची मागणीही
सदस्यांनी केली. सर्व निकष पूर्ण करत असतांनादेखील मराठीला राजभाषेच्या दर्जा दिला
जात नसल्याबद्दल, सदस्यांनी नाराजीची भावना यावेळी व्यक्त केली. सध्या तामिळ, तेलगु,
संस्कृत, कन्नड, मल्याळम् आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे
मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं विधेयक काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकातली
सवलत देण्याची तरतूद या कायद्याला मारक असून ती रद्द करावी, अशी सूचना विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर ही सुरुवात असून, कायद्यात सवलत मिळणार नाही,
याची काळजी घेऊ, आणि वेळोवेळी सभागृहात याबाबतची माहिती देऊ, असं मराठी भाषा मंत्री
सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे.
****
भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची
आज गरज असल्याचं, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी म्हटलं आहे. त्या काल विधानभवनात
झालेल्या 'इये मराठीचीये नगरी' या कार्यक्रमात बोलत होत्या. मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या
संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती
देण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं
उद्घाटन झालं. यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक
निंबाळकर, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा ही संस्कारातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता,
आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
राज्य सरकारच्या वतीनं मराठी साहित्य क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवन
गौरव पुरस्कार’ काल ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत
काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पुरस्कार प्रदान केले.
मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन
संस्थेला ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा
अभ्यासक पुरस्कार आर. विवेकांनद गोपाळ यांना, तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक
पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला.
****
दरम्यान, मराठी भाषा दिवस काल सर्वत्र विविध
कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. औरंगाबाद इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात
काल प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं. शहरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधून मराठी
गौरव गीत, पोवाडा गायन, आदी कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून
काल मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध
उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अत्याधुनिक
रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून हा दिन साजरा केला.
जालना जिल्हा ग्रंथालयात काल मराठी भाषा
गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या
पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे
यांनी यावेळी व्यक्त केली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा
करण्यात आला.
****
कोरेगाव- भीमा, मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनात गुन्हे
दाखल झालेल्या तरूणांना राज्य शासनानं मोठा दिलासा दिला आहे. कोरेगाव भीमा आंदोलनातल्या
६४९ पैकी ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातले
५८४ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याची
माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानपरिषदेत दिली. दरम्यान, गेल्या पाच वर्षात राज्यात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात
शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातले गुन्हेही मागे घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं. विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न
विचारला होता.
****
राज्यात विविध उत्सवादरम्यान तयार होत असलेल्या
देवी देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिस - पीओपीच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात
यावी असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. त्यासोबतच राज्य
सरकारनं पर्यावरण रक्षणबाबत संवेदनशील असावं, अशी अपेक्षाही न्यायालयानं व्यक्त केली
आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं, पीओपीच्या मूर्तींची
योग्य विल्हेवाट लाऊ शकत नसल्यानं याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरता येणार नाही,
असं सांगितलं. त्याशिवाय पीओपीची मूर्ती तयार करण्यावरच बंदी घालावी, अशा मूर्ती तयार
करण्यावर दंडात्मक कारवाई करावी, या मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट व्हावी, असा
आदेश दिला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात काल भुकंपाचे
सौम्य धक्के बसले. कळमनुरी तालुक्यात बोधी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव या परिसरात
काल पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले असून, भूगर्भातून विचित्र आवाज
येत असल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
निर्माण झालं आहे. सुदैवानं या भागात कोणतीही
जीवित हानी झाली नाही.
****
बळीराजा चेतना
अभियानाअंतर्गत प्रस्तावित सहा कोटी २५ लाख रुपयांच्या पुस्तक
खरेदी प्रकरणाची संपूर्ण
चौकशी करण्यात यावी अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना याबाबत एक सविस्तर निवेदन त्यांनी दिलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमातर्गंत शेतकऱ्यांना
ही पुस्तके वाटप करायची होती.
****
लातूर जिल्ह्यात
रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या विरोधात
रेणापूर परिसरातल्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाज्यासमोर परवा दुपारपासून सुरू केलेलं
धरणं आंदोलन कालही सुरू होतं. पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय
आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी
दिलं आहे. रेणापूर शहरातलेही बहुतांश व्यवहारही काल बंद ठेवण्यात
आले होते.
****
हिंगोली जिल्हाधिकारी
कार्यालयात काल दिशा समितीची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या त्रेचाळीस
योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या.
कयाधू नदी काठावरील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावावी,
प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी, पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवावी, आदी सूचना यावेळी
खासदार पाटील यांनी केल्या.
****
लातूर शहराला
पाणी पुरवठा होत असलेल्या मांजरा धरणात ३६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा असून दर दहादिवसा आड पाणी
देण्याचं नियोजन केलं तर आक्टोबर महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवणार नाही असं लातूरचे जिल्हाधिकारी जी
श्रीकांत यांनी सांगितलं. देवणी आणि लातूर
तालुक्यात टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाई आराखडा
तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. रेणापूर मध्यम प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलंच फक्त पाणी सोडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी
स्पष्ट केलं.
*****
उस्मानाबाद
जिल्ह्यातले
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासह कळंब तालुक्यातले चाळीस गावामधले सरपंच, तसंच चार शिवसेना विभाग प्रमुखांनीही काल
मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थितीत होते.
****
ऑस्ट्रेलियात
सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं काल
न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. न्यूझीलंड
संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, भारतीय
संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं निर्धारित षटकांत
आठ बाद १३३ धावा केल्या, मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा
संघ निर्धारित वीस षटकांत १२९ धावाच करू शकला. भारताची सलामीची
फलंदाज शेफाली वर्मा हिनं सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
****
औरंगाबाद शहराच्या उल्कानगरी भागात खिंवसरा पार्क इथं असलेल्या एका इमारतीत
तळमजल्यावरच्या गोदामाला काल पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत संस्कार श्यामसुंदर जाधव
या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment