Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
राज्यातल्या
सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी या इयत्तेत
मराठी भाषा हा विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करण्यात येणार आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त यासंदर्भातील विधेयक उद्या विधानसभेत
मंजूरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातल्या
सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश
कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना
गायकवाड बोलत होत्या. प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्यानं या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची
घोषणाही शिक्षण मंत्री गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत केली. आधीच्या सरकारनं हे मंडळ
स्थापन केलं होतं. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ
तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. विरोधकांनी या मागणीला विरोध करत हे मंडळ रद्द न करता जर त्रुटी असल्यास त्या दूर करून आढावा घेण्याची मागणी
केली होती. शिक्षण मंत्र्यानी आढावा घेण्यासाठी अनुकूल असल्याची भूमिका घेतली, मात्र
तालिका सभापती दत्तात्रय सावंत यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर
शिक्षण मंत्र्यानी हे आंतराष्ट्रीय मंडळ बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
****
महिलांवरील अत्याचारांच्या
घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर राज्यात नवा कायदा तयार करण्यात येणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीतच हा कायदा बनवण्यासाठी
विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत
दिली. या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार,
अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले. या कायद्याचा अभ्यास आणि त्या अनुशंगानं
राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.
ही समिती आपला अहवाल येत्या शनिवारपर्यंत सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
येत्या तीन महिन्यांत राज्यभरातील अकराशे
पन्नास पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी आज सांगितलं. ज्वलनशील पदार्थांमुळे बळी पडलेल्यांना सरकार मदत करणार
असल्याचंही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्य सरकार शेती कर्ज माफीच्या लाभार्थ्यांची दुसरी
यादी येत्या शुक्रवारी जाहीर करणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधान
परिषदेमध्ये ही माहिती दिली. लाभार्थ्यांच्या
पहिल्या यादीत पंधरा हजार ३५८ लाभार्थ्यांचा समावेश होता. राज्यात एक कोटी पंचेचाळीस
लाख शेतकरी असल्याचं नमुद करत विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी मंगळवारी सरकारविरुद्ध
आंदोलन केलं होतं. शेतकरी- कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी कर्जमाफीची संपूर्ण
प्रक्रीया येत्या ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी
अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी यावेळी
केली. या योजनेसाठी राज्यातील चौतीस लाख त्र्याऐंशी हजार ९०८ शेतकऱ्यांच्या खात्यांना
नोंदवण्यात आलं असल्याचं मुख्य मंत्र्यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांचं
दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इशान्य दिल्लीतील
हिंसाचाराचा आढावा घेतला. सर्वांनी शांतता आणि संयम राखावं, असं आवाहन त्यांनी केलं
आहे. नागरिकत्व कायद्या विरोधात उसळलेल्या हिंसाचारात इथं बावीस जण मृत्यूमुखी पडल्याचं
जीटीबी रुग्णालयानं म्हटलं आहे.
****
शब्द हे परिवर्तनाचं सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचं
ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री ललिता गादगे यांनी म्हटलं आहे. त्या आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मराठी भाषा विभागात ‘मराठी भाषा’ दिनाच्या अनुशंगानं
आयोजित कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होत्या. साहित्यामुळे भाषा टिकून
राहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डॉ.शेख इक्बाल मिन्ने, बालाजी सुतार, विनायक
येवले, गणेश घुले, बालाजी फड, लक्ष्मण खेडकर या कवींनी या कवी संमेलनात कविता सादर
केल्या.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चोपन्नाव्या स्मृती
दिनानिमित्त रत्नागिरी इथं पतीत पावन मंदिर संस्थानतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात
आली. मुंबईत दादर इथंही अभिवादन यात्रा काढण्यात आली.
****
मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता
पक्षाच्या ज्योत्स्ना हसनाळे तर उप महापौरपदी भाजपचेच हसमुख गेहलोत यांची निवड झाली
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment