आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ फेब्रुवारी
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधानपरिषदेत आज महिला अत्याचाराच्या मुद्दावर चर्चा सुरू
आहे. आंध्र प्रदेशमध्ये महिला अत्याचार रोखण्यासाठी असलेला दिशा कायदा या अधिवेशनात
आणणार काय, असा प्रश्र्न विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केल्यानंतर ही
चर्चा सुरू आहे.
****
सरपंचाच्या निवडीचं विधेयक घाईघाईत मंजूर केलेलं असून ते घटनाबाह्य
असल्यानं या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी असल्याची टीकाही फडणवीस
यांनी केली आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानात नव्यानं कोणतंही काम हाती घेतलं जाणार नसल्याचं
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. शेतकरी कामगार पक्षाचे
जयंत पाटील यांनी ही योजना बंद करण्यात आली आहे का, असा प्रश्न विचारला होता, या प्रश्नाला
उत्तर देताना गडाख बोलत होते.
****
राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या
संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे. आमदार रविंद्र वायकर
यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून केलेली नेमणूकही रद्द करण्यात
आली आहे. या दोघांनीही पद स्वीकारण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती.
****
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे सदस्य आमदार अमरनाथ
राजूरकर यांची काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
`एकरी एक क्विंटल` नियमामुळे संतप्त झालेल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी
सांगली जिल्ह्यातील जत इथं काल तुर खरेदी बंद पाडली. खरेदी केंद्रावर एकरी एक क्विंटल
तुर घेणार मग उर्वरित तुरीचं काय करायचं असा प्रश्र्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
तूर खरेदीची मर्यादा वाढवून ती किमान दहा क्विंटल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
ओडिशात आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ काल पाचव्या दिवशी चौदा पदकांसह अग्रस्थानी होतं. या चौदा पदकांमधे
सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. पंजाब विद्यापीठाची पदकसंख्या १८ असली
तरी सुवर्णपदकांची संख्या सहा असल्यानं ते दुसऱ्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment