आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० मार्च २०२० सकाळी ११.००
वाजता
****
केंद्र
सरकारने लागू केलेल्या एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची कोणतीही योजना नसल्याचं
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन वाढवलं जणार असल्याबाबत
सामाजिक संपर्क माध्यमांमधल्या वृत्ताचं केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी खंडन केलं
आहे. सामाजिक संपर्क माध्यमांमधून पसरवल्या जात असलेल्या या चर्चा निराधार असून, अशा
अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सरकारनं
केलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित एकूण रुग्णांची संख्या २१५ झाली
आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नवीन १२ रूग्ण आढळले, यापैकी पाच पुण्यात, तीन
मुंबई, दोन नागपूर तर कोल्हापूर आणि नाशिक इथं प्रत्येकी एक रूग्ण सापडला आहे. मुंबईतल्या के. ई. एम रुग्णालयात कोरोनाबाधित ४० वर्षीय महिलेचा आणि बुलडाणा इथं ४५ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्यामुळे
राज्यात आतापर्यंत या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान काल ३५ कोरोनाबाधित
रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यानं, रुग्णालयातून सुटीही देण्यात आली.
****
कोल्हापूर
शहरात कोरोना सकारात्मक रूग्णाच्या कुटुंबातल्या एकतीस सदस्यांची तपासणी केली असता
एका महिलेचा तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे बाकी सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.
चार दिवसातच एकाच कुटुंबातले दोन रुग्ण कोरोना सकारात्मक आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा
आणि प्रशासनानं संपूर्ण परिसर बंद केला आहे.
****
यवतमाळ
जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यात गुजरी इथं काल रात्री वीज पडून एकाच कुटूंबातल्या
सहा जणांचा मृत्यू झाला. हे कुटुंब गायी चारण्यासाठी याठिकाणी मुक्कामी होते.
****
ठाणे
- भिवंडी सह विविध भागातून उत्तर भारत आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे पाचशे परप्रांतीयांना
नाशिक शहराजवळ अंबड इथं पोलिसांनी पकडलं. रोजगारासाठी विविध भागात आलेले मजूर आणि कष्टकरी
आपापल्या भागात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आज सकाळी भिवंडी परिसरातील काही मजूर
इमर्जन्सी सर्विस असे लिहिलेल्या कंटेनरमधून उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये जात असल्याचे
आढळले. पोलिसांनी तीन ट्रक आणि कंटेनर जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं
काम सुरू झालं आहे.
****
No comments:
Post a Comment