Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** कोरोना विषाणू
प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लोकांना घराबाहेर पडण्यास २१ दिवस बंदी; मात्र
जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
** राज्यात कृषी
आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतुकीवर बंदी नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** संचारबंदीमुळे
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी
** आयकर विवरणपत्र
भरण्याच्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ
** आणि
** जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक
ना. वि. देशपांडे यांचं निधन
****
आमच्या सर्व
श्रोत्यांना मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या तसंच दीर्घ आयुच्या हार्दिक शुभेच्छा
****
कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लोकांना घराबाहेर पडण्यास
बंदी अर्थात - लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित
करताना ही घोषणा केली. २१ दिवसांचा हा लॉकडाऊनचा कालावधी राहणार असून, या काळात कोणालाही
घराबाहेर पडता येणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
पूरे देश मे रात १२ बजे से पुरा लॉकडाऊन होणे सारे हिंदुस्तान को बचाने के लिए
हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए आपको बचाने के लिए आपके परिवार को बचाने के
लिए घरोसे से बहार निकलने वर पुरी तरह पाबंदी लगाई जा रही है देश के हर राज्य को हर
केंद्रशासित प्रदेश को हर जिले हर गाँव हर गली हर कसबे को लॉकडाऊनचा किया जा रहा है
कोरोना महामारी के खिलाफ निर्णायक लढाई के लिये यह कदम अब आवश्यक है
नागरिकांनी संयम
पाळावा, कायदा आणि नियमांचं पालन करावं. विलगीकरण हाच कोरोना विषाणूला पसरण्यापासून
रोखण्याचा मुख्य उपाय असून, कोरोना विषाणूची साखळी तोडण्याची गरज त्यांनी पंतप्रधानांनी
यावेळी बोलतांना व्यक्त केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम कायदा लागू केला असून, या कायद्याचं उल्लंघन केल्यास दोन वर्ष शिक्षेची तरतुद
केली आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशात लॉकडाऊनच्या काळात सुरु राहणाऱ्या आवश्यक
वस्तू आणि सेवांची यादी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात केंद्र, राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांचे कार्यालयं, स्वायत्त कार्यालयं, वाणिज्यिक आणि खासगी संस्था बंद राहणार
आहेत. मात्र बँका, एटीएम, पेट्रोल पंप, मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, माहिती तंत्रज्ञान
सेवा, उपाहारगृहांमधून घरपोच सेवा, पशुखाद्य, शेतमालाची आयात निर्यात, रुग्णालय, चष्म्याची
दुकानं, टँकरद्वारे पाणीपुरवठा या काळात सुरु राहणार आहे. या सर्व सुविधा लोकांच्या
वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी असून, वस्तुंच्या दळणवळणावर निर्बंध घालण्यासाठी नसल्याचं
मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था
तसंच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा, असं ठळकपणे स्टिकर
लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं
गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधानांनी
घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून आणि गोंधळून जाण्याचं कारण नाही, असं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य, औषधी, वैद्यकीय उपकरणे,
दुध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा व्यवस्थित पुरवठा होत राहील, असं त्यांनी
स्पष्ट केलं आहे. कृषी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही, या वाहतुकीत
अडथळे आले तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.
यासंदर्भात राज्यातल्या जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकरी शेतमजूर आहे त्यांना
शेतावर येणं जाणं हे आपण बंद करत नाही कृषी संबंधित अन्नधान्याची वाहतूक यंत्रणा हे
आपण थांबले नाहीये शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तू ने – आन करणारी वाहतूक आपण थांबत नाही
आहोत पण ज्या कंपन्या उत्पादन निर्माण करतात त्यांचे कारखाने चालू ठेवण्यासाठी किंवा
ऑफिस चालू ठेवण्यासाठी आपल्या वाहनांवरती कंपनीचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित ते
आपल्या कर्मचाऱ्यांना किंबहुना जे अधिकारी असतील सहाजिकच त्यांच्याकडे आपल्या कंपनीचे
ओळखपत्र असेल पोलिसांनाही सांगतोय शेवटी आपण आपले जगणे नाही थांबले आधी जगण्यासाठी
थोडीशी आपली शैली जी आहे ती बदलेली आहे.
****
दरम्यान, महाराष्ट्रातल्या
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता एकशे सात झाली आहे. काल मुंबईत पाच तर अहमदनगर जिल्ह्यात
एक रुग्ण आढळला. दरम्यान, मुंबईतले बारा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना लवकरच
रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे.
कोरोनाचे रुग्ण
बरे होत आहेत ही बाब समाधानकारक असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी दोन रुग्ण अतिदक्षता कक्षात असून, इतरांची प्रकृती
स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुणे मुंबईसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडे
संशयाने पाहू नका, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे, ते म्हणाले
भाजीपाल्याचे आणि शॉप मध्ये
खूप गर्दी झाली त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स इन चा जो महत्त्वाचा मंत्र तो पाळल्या जात
नाहीये मला वाटतं की पाळला जावा असा आव्हान करेल असं विनंती करेल ग्रामीण भागातून खूप
मोठ्या संख्येने मध्यून फोन येतायेत आमच्या गावा पुण्याचे-मुंबईचे–नागपूरचे लोक आले
मी यानिमित्ताने तुम्हाला एवढेच सांगेन की ते लोक आलेत त्याचा अर्थ असा नाही की बाधित देशातून कुठून आली तरी त्यांना आता १००%
पॉझिटिव आहेत अशा स्वरूप आणि त्यांच्याकडे माणुसकीला धरून नक्कीच नाही.
****
कोरोना संक्रमणाला
प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या कालच्या दुसऱ्या
दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मंड्यांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये
सामान्य नागरिकांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातल्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर
पोलिसांनी बळाचा वापर करून कारवाई केली. औरंगाबाद शहरात अनेक वाहनचालक तसंच उडाणटप्पू
युवकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. लातूर तसंच परभणी इथंही अनेक वाहनचालकांवर कारवाई
करण्यात आली. हिंगोली शहरात काल बावीस वाहनं
जप्त करण्यात आली. लातूरच्या नागरिकांनी संचार बंदीला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या प्रत्येक घरात
जाऊन आशाताई आणि इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपूस करत आहेत. लातूर शहरातली
सर्व औषधी दुकानं सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. लातूर जिल्हा
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं काल हा निर्णय घेतला.
जालना जिल्ह्यात
नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं, कोणतीही अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क
साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे. जिल्ह्याच्या सर्व
सीमा बंद केल्या असून २९ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्याच्याही
सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात काल शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी
१८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
****
परभणी महापालिकेकडून
सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मनपा आरोग्य विभागाची पथकं शहराच्या
विविध भागात फवारणी करत आहेत. जालना इथं नगरपालिकेच्यावतीनं आठही प्रभागात औषधं फवारणी
करण्यात येत आहे
****
बीड शहरात सकाळी
अकरा ते तीन या वेळेत संचारबंदी शिथील केल्यावर काही भागात दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर
रेषा आखून ग्राहकांना रांगेत उभे करून सामानाची विक्री केली.
****
संचारबंदीच्या
काळात जनतेनं प्रशासनाला सहकार्य करावं असं
आवाहन हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. आगामी काही दिवस हे अत्यंत
संवेदनशील असल्याचं त्या म्हणाल्या.
मराठवाडा- विदर्भ
सिमेवर कन्हेरगाव नाका इथं बाहेरच्या राज्यातून आणि जिल्ह्यातून आलेले जवळपास शंभर
ट्रक उभे आहेत. राज्यात जिल्हाबंदी लागू झाल्यामुळे या ट्रकला हिंगोली जिल्ह्यात प्रवेश
नाकारण्यात आला आहे. पैनगंगा नदी पलिकडे वाशिम जिल्ह्याच्या सरहद्दीमध्येही वाहनांच्या
रांगा लागल्या आहेत.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या
हिमायतनगर तालुक्यात सरसम इथं पुणे, मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद इथून गावाकडे परतलेल्या
सत्त्याण्णव जणांची तपासणी करून त्यांच्या हातावर "होम क्वारंटाईन" हा शिक्का
मारण्यात आला आहे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळताच प्रशासनास कळवावं,
असं आवाहन ग्रामसेवक अच्युत जोशी, सरपंच शशिकला नगराळे यांनी केलं आहे.
****
हिंगोली इथं
आजपासून भाजीपाला आणि किराणा सामान एक दिवसाआड मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी सांगितलं. अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदीकरता लोक
दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. सकाळी दहा ते दुपारी
एक वाजेपर्यंतच हे सामान मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्हा
रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात एकूण ५० रुग्ण दाखल होते, त्यापैकी २६ रुग्णांचं अहवाल
नकारात्मक आले आहेत. २४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
आपातकालीन परिस्थितीत
कोरोना बाधित रूग्णाला योग्य त्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या
वतीनं काल दोन रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली.
****
कोरोना विषाणूच्या
संसर्गासंदर्भात लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जिल्हाबंदी यासारख्या अनेक उपाययोजना
सरकार करत आहे. मात्र उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली गावात बाहेरगावच्या लोकांना
प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी मुख्य रस्ता काट्याचं कुंपण घालून बंद केला
आहे. तपासणी झाल्याशिवाय बाहेरगावातून येणारी कोणत्याही व्यक्तीला गावात दिला जात नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या
एका गावानं अशीच गावबंदी केली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर …
गावात चाळीस जणांची कोरोना
मुक्ती समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून गाव सुरक्षित राहावा
यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे गावात येणाऱ्या मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांचा प्रमाण
लक्षात घेऊन यापुढे गावात एकही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना सर्व
ग्रामस्थांना करण्यात आले आहेत अशीही गाव बंदी अमलात आणून परशुराम गावांना वेगळाच आदर्श
निर्माण केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी
****
औरंगाबाद शहरात
काल 'सारी' सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स या आजारानं एका व्यक्तीचं खासगी
रूग्णालयात निधन झालं आहे. सारी आजाराचे आणखी पाच रुग्ण खाजगी दवाखान्यात असल्याची
माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे. सारी आणि करोना या
रोगाची लक्षण सारखीच असल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी डॉक्टरांना या आजारासंबंधी रूग्ण
आढळ्यास तात्काळ माहिती देण्याचं परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
दिल्लीच्या शाहिनबाग
आंदोलन स्थगित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर
गेल्या ७७ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनीही आपलं आंदोलन स्थगित
केलं आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय समितीच्या
सदस्यांनी घेतला असल्याची माहिती संयोजक अहेमद जलीस यांनी दिली आहे.
****
आयकर विवरणपत्र
भरण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मार्च ते मे
या तिमाहीसाठी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विवरणपत्र, विवाद से विश्वास योजनेत सहभाग,
तसंच आधार आणि कायम खातेक्रमांक पॅन संलग्नीकरणालाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. बँक खात्यात किमान शिल्लक नसल्यास पुढचे तीन महिने कोणतेही शुल्क आकारलं जाणार
नाही. याशिवाय पुढचे तीन महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही पैसे काढले तरी
शुल्क लागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
गुढीपाडव्याचा
सण आज सर्वत्र साजरा होत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी असल्यानं, कोणत्याही
खरेदीशिवाय हा सण साधेपणाने साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी यांनी राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करण्याचं
आवाहन त्यांनी केलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामातले
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष, ग्रंथमित्र
नागोराव विठ्ठलराव उर्फ ना. वि. देशपांडे यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास औरंगाबाद
इथं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मूळ जालना जिल्ह्यातल्या परतूरचे असलेले देशपांडे
यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात रझाकारांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभाग नोंदवला.
स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सत्याग्रह
केले. हैदराबादमधील स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियलचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
संशोधन केंद्राचे संस्थापक सचिव आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचेही ते संस्थापक सचिव
होते. ग्रंथपाल सोसायटी आणि आणि खादी ग्रामोद्योग समितीत ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.
आज सकाळी साडे अकरा वाजता बेगमपुरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
राज्याच्या अनेक
भागात काल अवकाळी पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्याच्या
हिमायतनगर तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पीकांच नुकसान
झालं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात
काल ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि
वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या जिल्हा
कृषी विज्ञान केंद्रानं वर्तवला आहे.
****
वीज पुरवठा खंडित
झाल्यास किंवा आपतकालीन परिस्थितीत महावितरणच्या नियंत्रण कक्षातल्या क्रमांकावर संपर्क
साधण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. यामध्ये औरंगाबाद शहर साठी सत्तर सहासष्ठ शून्य चार चोवीस दहा, औरंगाबाद ग्रामीण
मंडळ नियंत्रण कक्ष क्रमांक अठॅहॅत्तर पंचॅहत्तर पंचॅहत्तर सहासष्ठ बावन्न, जालना
- अठॅहत्तर पंचॅहत्तर शहॅत्तर एक्केचाळीस चव्वेचाळीस, लातूर - अठॅहत्तर पंचॅहत्तर शहॅत्तर
वीस एकविस, बीड - अठॅहत्तर पंचॅहत्तर सतरा चौंसष्ठ चौंसष्ठ, उस्मानाबाद - अठॅहत्तर
पंचॅहत्तर एकवीस सोळा पंधरा, नांदेड - अठॅहत्तर पंचॅहत्तर सत्तेचाळ एकोणचाळीस ऐंशी,
परभणी - अठॅहत्तर पंचॅहत्तर सत्तेचाळ त्रेसष्ठ सव्वीस, आणि हिंगोली नियंत्रण कक्ष क्रमांक
अठॅहत्तर पंचॅहत्तर चव्वेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस असून, नागरिकांनी संपर्क करण्याचं
आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment