Tuesday, 31 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 कोरोनाचा प्रतिबंध आणि उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तसंच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग तसंच संस्थानी मदत देणं सुरु केले आहे.

 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी अकरा लाख रुपये मदत दिली आहे.

 भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मदत निधीत शंभर कोटी रुपये जमा केले आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीशकुमार यांनी ही माहिती दिली.
****

 कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक तसंच आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपातीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात आली आहे. आणि वर्ग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के, तर  वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
****

 गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २२७ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार दोनशे ५१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशभरात २१ हजार तात्पुरती निवासी शिबीरं उभारण्यात आली असून,  त्यामधून सहा लाख ६६ हजार नागरिकांच्या निवासाची तसंच २३ लाख नागरिकांच्या भोजनाची सुविधा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचं शंभर टक्के पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****

 अहमदनगर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. हे तिघे जामखेड इथल्या दोन कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. अहमदनगर जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ८ झाली असून यापैकी एकाला उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
****

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या नांदेड शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर शासनानं कडक कारवाई करावी तसंच शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी नांदेड शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे.

 दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसंदर्भात ३१ मार्चपर्यंत घालण्यात आलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यात गरजूंना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना तसंच नागरिक पुढे येत आहेत
****

  जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं गरजू तसचं मजुरी करणाऱ्या कुटुंबांना श्रीगणपती नागरी सहकारी पतसंस्था आणि राजाभाऊ देशमुख मंडळाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंच्या २ हजार ५०० कीटचं वाटप करण्यात येत आहे. धान्यासह इतर आवश्यक वस्तुंचा या कीटमध्ये समावेश आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं आठवडी बाजार बंद असतांनाही ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

 दरम्यान हिंगोलीत कोरोनाचा दुसरा संशयित आढळला असून, त्याच्या घशातल्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथं तपासणीलना पाठवण्यात आले आहेत.
****

 परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राला आज सकाळी आग लागली. दीड ते दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आलं. या आगीमध्ये महत्त्वाची अनेक कागदपत्रं तसंच संगणक आदी साहित्याचं मोठं नुकसान झालं. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
****

 जालना शहरासह परिसरातल्या अनेक गावात आज दुपारी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकांसह फळबागांच्या नुकसानाची भीती वर्तवली जात आहे.

 परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालं
*****
***

No comments: