Sunday, 29 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत बेघर मजूर आणि स्थलांतरित नागरिकांना विशेष बाब म्हणून आजपासून पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक इथं आज पत्रकार परिषदेत  दिली.

 शिवभोजन थाळीचा शहराबरोबरच ग्रामीण भागातही तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत थाळी उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्रामीण भागात तात्काळ शिवभोजन केंद्रं सुरू करावीत, असे आदेशही तहसीलदारांना देण्यात आल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले.
****

 कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या सध्या १५५ असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात उपचार घेऊन बरे होत असलेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजपर्यंत १९६ सकारात्मक रूग्ण सापडले होते. त्यापैकी ३४ रूग्ण बरे झाले असल्याचं टोपे यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
****

 राज्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई आणि ठाणे परिसरात १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर , रत्नागिरी , औरंगाबाद , यवतमाळ , सांगली २५, सातारा , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , जळगाव १, तर बुलडाण्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी मुंबईतल्या १४, पुणे १५, नागपूर , औरंगाबाद , तर यवतमाळ मधल्या ३ अश्या एकूण ३४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
****

 काल, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केल्याच्या तासाभरात मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग होता. नागपूर इथल्या प्रयोगशाळेचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे. मरण पावलेल्या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. तो अधिक वाढल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. बुलडाणा शहरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
****

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनानं उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना दिला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यातल्या रांजणीच्या नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, गौरगाव इथली इडलर्स बायो एनर्जी लिमिटेड आणि लोहारा तालुक्यातल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
****

 वनविभागात कार्यरत राज्यातले सर्व वनाधिकारी, वनकर्मचारी, वनमजूर आदी सर्वच कमचारी आपल एक दिवसाच वेतन कोरोना संसर्गामुळे ओढवलेल्या आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करणार आहेत. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज ही माहिती दिली. यवतमाळ इथं आज ते बोलत होते. कोरोनाविरुद्धचं युद्ध आपण जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच वनविभागाप्रमाणेच अन्य विभागातले अधिकारी, कर्मचारी, शिवाय जनताही सरकारला सहकार्य करेल, असा विश्वास यावेळी राठोड यांनी व्यक्त केला.
****

 लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व प्रवासी रेल्वे सेवा १४ एप्रिल पर्यंत बंद आहेत. मात्र त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, खते-बियाणे, कोळसा, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेच्या मालगाड्यांतून केली जात आहे. यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवरचं आणि नियंत्रण कार्यालयांतलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे.
       
 कोरोना विषाणूचा संसर्ग सेवेवर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना होऊ नये, म्हणून नांदेडच्या रेल्वे खात्याच्या डॉक्टरांनी विभागीय रेल्वे दवाखान्यात सॅनिटायजर, तसंच मास्क बनवून कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. नांदेड विभागीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच थर्मल स्कँनिंगही केल जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****

 मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे सहा हजार नागरिकांना जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे इगतपुरी इथं थांबावं लागलं आहे. स्थलांतरितांना या ठिकाणी थांबवण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे.
****

 सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने ते अडकून पडले आहेत.
*****
***

No comments: