Thursday, 26 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 26.03.2020 TIME – 11.05 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी सामाजिक दायित्व निधीतून गरीबांना मदत करण्याचं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. हातावर पोट असणारे, असंघटित कामगार, गोर-गरीब झोपडपट्टीवासीय आणि रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे. दोन महिन्यांचे शिधा अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपल्यानंतरच साजरी करावी असंही आवाहन आठवले यांनी केलं आहे.
दरम्यान देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडे सहाशेपर्यंत पोहोचली असून, यापैकी तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.
****
चंद्रपूर शहरातल्या एका मदरशातून अकरा विदेशी व्यक्तींसह चौदा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अकरा जण तुर्कस्थानातले तर दिल्ली, ओडिशा आणि केरळमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या सर्वांना शहरात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या सर्वांचा ट्रॅव्हल व्हिसा ताब्यात घेण्यात आला असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे
****
हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या १० जणांना होम क्वॉरनटाईन करण्यात आलं आहे. त्यात फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, सौदी अरब, जर्मनी, आणि मालदिव इथून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांना होम क्वॉरंनटाईन  करण्यात आले आहे. या नागरिकांच्या हातावर होम क्वॉरनटाईनचा शिक्का मारुन त्यांना १४ दिवस घरातच थांबण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शीघ्र कृती दलामार्फत त्यांची दररोज चौकशी करण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त टेंभुर्णी इथल्या गावकऱ्यांनी गावातून येण्याजाण्यास बंदी घातली आहे, गाव करोना मुक्त ठेवण्याचा निर्णय सरपंच प्रल्हाद पाटील आणि सर्व गावकऱ्यांनी घेतला आहे. या सूचनेचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा फलक गाव वेशीवर लावला आहे.
****
रुग्णवाहिकेतून अवैधरित्या प्रवास करणाऱ्या दहा जणांना वाशिम जिल्हा पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. हे सर्वजण औरंगाबाद हून यवतमाळ इथं जात होते.
****
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वसमत तालुक्यात गिरगाव इथं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे.
****


No comments: