Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 March 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २५ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
जीवनावश्यक वस्तू तसंच पशूखाद्याचा पुरेसा साठा राज्यात
उपलब्ध असल्याने, नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी बोलत होते. हातावर पोट असलेल्या
किमान कर्मचाऱ्यांचं वेतन उद्योजक तसंच व्यावसायिकांनी थांबवू नये, असं मुख्यमंत्र्यांनी
सूचित केलं. शेतीची कामं तसंच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानं बंद राहणार नाहीत,
मात्र नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी एकट्याने जावे, गर्दी करू नये,
या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी
सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाचा संकल्प करूया, असं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
केंद्रीय गृह मंत्रालयाने खासगी सुरक्षा रक्षकांच्या
संस्थांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन
कालावधीत सुरक्षा रक्षकांचे पगार कापू नये असे सांगितले आहे. दुकाने, मॉल आणि इतर आस्थापना
बंद पडल्यामुळे खासगी सुरक्षा संस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खासगी सुरक्षा
उद्योगाला मानवी दृष्टिकोनातून बघावे. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही याकडे
लक्ष द्यावे असंही त्यात म्हटलं आहे.
****
दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या
आता एकशे बारा झाली आहे. काल इस्लामपूर इथं पाच नवीन रूग्ण आढळले. पुण्यातल्या दोन
कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे आज सुटी देण्यात आल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या
अनेक गावांनी ग्रामपंचायतीमध्ये गावबंदीचा निर्णय घेतला आहे. गावाच्या वेशीवरच रस्ता
बंद करण्यात आला असून गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार
नाही याची दक्षता घेतली जात आहे . दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा
वैयक्तिक आपत्कालीन आवश्यकतेसाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना
केली आहे. अपरिहार्य कारणास्तव स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅ
पवर पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली
आहे.
****
सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजाशी सुरक्षित अंतर राखण्याचा
नियम आज बहुतांश ठिकाणी काटेकोरपणे पाळला जात असल्याचं दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये
दैनंदिन गरजेचं वाणसामान तसंच भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना दुकानदारांनी
दुकानासमोर आखून दिलेल्या वर्तुळांमध्ये उभं राहून खरेदी करावी लागली.
औरंगाबाद शहरात अनेक छोट्या दुकानांसमोरही ग्राहकांसाठी
वर्तुळं आखून ठेवली आहेत. सोयगाव तालुक्यातल्या फर्दापूर इथं पोलिसांनी संचारबंदीच्या
पार्श्वभूमीवर किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी वाढू नये म्हणून दुकांनाबाहेर
विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखून नियोजन आहे.
सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं भरलेला आठवडी बाजार
पोलिसांनी बंद केला. नांदेड शहरात भाजीविक्रेत्यांनीही अशाच प्रकारे आखून दिलेल्या
चौकटीत उभं राहून ग्राहकांनी भाजीपाला खरेदी केला. परभणी इथं भाजीपाला तसंच गुढीपाडव्यानिमित्त
आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी तुरळक गर्दी केली होती.
लातूर इथं किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मांस, आदी
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी ग्राहकांना घरपोहोच सेवा देण्याचं आवाहन लातूरचे
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. यासाठी दुकानदारांना ओळखपत्र दिलं जाईल,
तसंच त्यांच्या वाहनांना वाहतुकीची विशेष परवानगी दिली जाईल, असं महापौरांनी सांगितलं
आहे.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटणकर यांनी केलं आहे.
****
सांगली जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही
विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला होता. मात्र यानंतर जिल्ह्यातल्या
नागरिकांनी शिस्तीचं पालन करत रांगेत उभं राहून भाजी खरेदी केली आहे. सांगली महापालिकेच्या
क्षेत्रात सोळा भाजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र
साजरा होतो आहे. हिंदू कालगणनेनुसार आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नागरिकांनी
आज आपल्या घरावर गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं. कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी
लागू असल्याने, साधेपणानं सण साजरा होत आहे.
****
गुढीपाडव्यानिमित्त धुळ्यातल्या ग्रामदैवत श्री एकवीरा
देवी माता मंदिरात पारंपारिक रितीरिवाजानुसार देवीचे पूजन आणि इतर धार्मिक विधी पुजाऱ्यांकडून
करून घेण्यात आले. तसंच गुढी उभारून मंदिरावर नवीन ध्वजही चढवण्यात आला. कोरोना प्रतिबंधक
उपायांमुळे लॉक डाऊन सुरू असल्यानं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment