Sunday, 29 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29.03.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२९ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची स्थापना; जनतेनं मदत करण्याचं आवाहन
** राज्यातही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचं मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांचं आवाहन
** राज्यात कोरोना बाधितांची संख्या १८१, नवे २८ रुग्ण आढळले. दोन जणांचा मृत्यू
** मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार
** औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात कोरोना आजाराच्या स्वॅब नमुने चाचणीला सुरूवात
आणि
** संचारबंदी भंग करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांची कारवाई
****
पंतप्रधान रेंद्र मोदी यांनी पीएम-केअर्स, अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची, काल घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोवि-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी, हा राष्ट्रीय निधी वापरता येईल. यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून, पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन, या संकेतस्थळाला भेट देऊन, पीएम-केअर्स निधीत योगदान देता येईल. पीएम-केअर्सचा खाते क्रमांक, ‘दोन एक दोन एक पी एम दोन शून्य दोन शून्य दोन’ असून, ‘एस बी आय एन शून्य शून्य शून्य शून्य सहा नऊ एक’, हा याचा आय एफ एस कोड आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या संघटनेनं, या निधीला २१ कोटी रुपये आणि प्रत्येकी एक दिवसाचं वेतन असं योगदान दिलं आहे. अभिनेता अक्षयकुमारने २५ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. भाजपाच्या सर्व खासदारांनी, आपल्या निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपये, कोरोना प्रसार रोखण्याच्या कामासाठी द्यावेत, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. याशिवाय पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार, आपलं एक महिन्याचं वेतनही पीएम- केअर्स निधीला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय टाटा ट्रस्टनं ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
****
राज्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदत करण्यासाठी, मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड- नाईन्टि,न हे स्वतंत्र बँक खातं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलं आहे. त्याचा बचत खाते क्रमांक, तीन नऊ दोन तीन नऊ पाच नऊ एक सात दोन शून्य, हा असून, या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छिणाऱ्यांनी, या खात्याच्या माध्यमातून मदत करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
****
राज्यातले प्राथमिक शिक्षक मुख्यमंत्री सहायता निधीला, एक दिवसाचं वेतन देणार आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातले सुमारे २२ हजार ग्रामसेवक, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपलं एक दिवसाचं वेतन देणार आहेत. राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी, काल अहमदनगर इथं ही माहिती दिली. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संघटनेच्या वतीनं पत्र देण्यात आलं आहे.
****
कोरोना चाचणी आणि उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणं खरेदीसाठी, राज्यातल्या सर्व आमदारांना पन्नास लाख रुपये निधी दिला जाणार आहे. आमदारांची मान्यता, तसंच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपा आयुक्तांना या निधीतून, आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करता येणार आहे.
****
भारत लवकरच कोविड-१९ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेनं सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख, डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली. सद्यस्थितीत विविध संशोधकांचे सुमारे तीस गट, कोरोना विषाणूविरोधात उपचार विकसित करण्यासाठी, संशोधन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्यानं, भारत या संशोधनात सहभागी झाला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. यासोबतच व्यक्तिगत पातळीवर तपासणी करता येतील ,अशी उपकरणं विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही ते म्हणाले.

****
कोरोनाबाधित देशांमधून आलेले प्रवासी अथवा पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कात आलेल्यांमध्येच, हा आजार प्राथमिक स्वरूपात आढळून येतो, त्यामुळे संसर्गाची शक्यता नसलेल्या नागरिकांनी, या आजाराची चाचणी करून घेणं आवश्यक नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. कोणत्या प्रकारच्या रुग्णांनी चाचणी करणं आवश्यक आहे, याबाबत आरोग्य मंत्रालयानं यादी जाहीर केली आहे. गेल्या पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले, तसंच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर, प्राथमिक लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे. आरोग्य सेवेतल्या व्यक्तींची, तसंच श्वसनाचे तीव्र विकार आणि न्युमोनियाची लागण झालेल्यांनी, ही चाचणी करणं आवश्यक आहे. अतिधोकादायक तसंच आजाराची लक्षण आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींनी, पाचव्या आणि चौदाव्या दिवशी चाचणी करणं आवश्यक असल्याचं, मंत्रालयानं सांगितलं आहे. आजार निश्चित झालेल्या रुग्णांसोबत राहणाऱ्या व्यक्तींनीही, चाचण्या करून घ्याव्यात, असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे.  
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी, उत्तर रेल्वेनं एका रेल्वेचं रुपांतर आयसोलेशन कोच म्हणून केलं आहे. यातला पहिला कोच तयार झाला असून, प्रत्येक कोच मध्ये १० विलगीकरण कक्ष असतील. याबाबत अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर, प्रत्येक विभागात दहा रेल्वेचं रुपांतर, आयसोलेशन कक्षांमध्ये केलं जाणार असल्याचं, रेल्वे मंडळानं सांगितलं आहे.
दरम्यान, २१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान रेल्वेची तिकीटं आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना, तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय, रेल्वे मंडळानं घेतला आहे. २७ मार्च पूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांना, येत्या २१ जून पर्यंत तिकीट रद्द करण्याची मुदत देण्यात आली आहे. ई तिकीट रद्द केल्यानंतर त्याचे पैसे, संबंधितांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत.
****
राज्यात कोरोना बाधितांची संख्या १८१ झाली आहे. काल नवीन २८ रुग्ण आढळले. काल दोन रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला असून, राज्यात कोरोना विषाणूनं आतयापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. मात्र यामध्ये सामाजिक संसर्गाचा प्रमाण नसल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले...

१६७ हे पॉझिटिव्ह पेशंट आहेत हे सगळे ट्रॅव्हल हिस्टरी आणि क्लोज फॅमिली कॉन्टॅक्ट अशा दृष्टिकोनातून वाढता आहेत यामध्ये संसर्गजन्य कमिटी ट्रान्समिशन हा विषय बिलकुल कुठल्याही परिस्थितीत नाही हे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो त्याचबरोबर जवळजवळ २९लोक आत्तापर्यंत डिस्चार्ज आपण केलेल्या आहेत डिस्चार्ज प्रमाण सुद्धा निश्चित प्रकारे आहे त्यामुळे आपल्याला एक आशादायक समाधानकारक आहे
****
यवतमाळ मधल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. या तिघांनाही काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, त्यांना पुढचे १४ दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह, विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता यवतमाळमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातून स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते असतील तिथेच थांबवण्याचे निर्देश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. राज्यपालांनी काल राज्यातल्या सर्व सहा विभागीय आयुक्तांशी, दूरध्वनीवरून चर्चा केली आणि प्रत्येक विभागात कोरोना संसंर्ग, तसंच लोकांचं स्थलांतर याबाबत माहिती घेतली. कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी लोकांचं स्थलांतर थांबवणं आवश्यक आहे, यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली. सर्व मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून, स्थलांतर करत असलेल्या लोकांना थांबण्यास सांगावं, आणि त्यांच्या निवास तसंच भोजनाची व्यवस्था करण्यासाठी, सरकार तसंच स्यवयंसेवी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना माहिती द्यावी, असं राज्यपालांनी सांगितलं आहे. 
****
अहमदनगर मतदारसंघांमधून विविध कारणानिमित्त, इतर राज्यात गेलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा, आणि ते जिथे आहेत तिथेच त्यांची व्यवस्थित सोय व्हावी, या हेतूने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी, अहमदनगर मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यासाठी, दोन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून, इतर राज्यात अडकलेल्या आपल्या आप्तस्वकीयांबाबत माहिती कळवल्यास, संबंधित राज्यातल्या खासदारांमार्फत त्यांची योग्य व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान, अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे झालेले पंचनामे तूर्तास करता येत नसतील, तरीसुद्धा नजीकच्या काळामध्ये सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूली यंत्रणेमार्फत करून घ्यावेत, अशी  सूचनाही विखे-पाटील यांनी, जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा दहावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागात, कालपासून कोरोना आजाराच्या रूग्णांच्या स्वॅब नमुने चाचणीला सुरूवात झाली. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्यथेकडून आर टी पी सी आर किटस् वापरण्यासाठी, घाटी रुग्णालयाला मान्यता मिळाली. त्यामुळे आता स्वॅब नमुने चाचणी करण्याला सुरूवात केल्याचं, अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी सांगितलं. याचा फायदा संपूर्ण मराठवाड्यातल्या रुग्णांच्या चाचण्या करण्यास होणार असल्याचं, त्या म्हणाल्या.
दरम्यान, या विभागात काल ११२ जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात सध्या आठ कोरोना संशयित रुग्ण असून, ३७ जणांना घरात विलगीकरण करुन ठेवलं असल्याचं, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस व्ही कुलकर्णी यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हा रुग्णालयात काल १४१ जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ११४ जणांना घरात विलगीकरण करुन ठेवलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसून, सदूसष्ठ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. पाच जणांना शासकीय दवाखान्यात विलगीकरण कक्षात वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राज  गलांडे यांनी सांगितलं.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात काल दोन रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यात चार रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल ३९२ जणांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत ५५ व्यक्तींचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी ५० जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, तर पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ४० जणांना घरातच विलगीकरण करुन ठेवलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या, २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी, शेतकऱ्यांचे गट स्थापन करत असल्याचं, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला फळफळावळ उपलब्ध आहे, मात्र लॉकडाऊनमुळे तो ग्राहकांपर्यंत पोचवण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून उत्पादक आणि ग्राहकांची, थेट विक्री यंत्रणा निर्माण करत असल्याचं, कृषी विभागानं सांगितलं. यासाठी तीन आणि पाच किलोग्रॅम वजनाची भाजीपाल्याची पाकिटं तयार करत असून, ही पाकिटं संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून, ग्राहकांपर्यंत पोचवली जाणार असल्याचं, या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हा पातळीवर कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, ही योजना राबवली जाणार आहे.
*****
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधली गर्दी कमी करण्यासाठी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला आणि फळं पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण संस्थांना दररोज किती भाजीपाला लागेल याची माहिती घेऊन, शेतकरी गट हा भाजीपाला संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांना पैसे घेऊन सुपूर्द करणार आहेत.
****
कोरोना प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्यांचे, तसंच घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे या काळात हाल होत आहेत. अशा लोकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावतीनं काल औरंगाबाद इथं अशा विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविधि भागात जेवणाची पाकिटं वाटप करण्यात आली. संकटाच्या काळात गरजूंना मदत करणं गरजेचं असून, सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपण ही मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शहराच्या विविध भागातल्या ७०० गरजूंना काल अन्नाची पाकिटं वितरीत करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या कम्युनिटी किचन या अभियानाअंतर्गत परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावतीनं शहरातल्या बेघर ४० कुटुंबांना पुढचे २० दिवस पुरेल अशी धान्याची रसद पुरवण्यात आली. परभणी शहरातल्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातून आलेले तसंच राज्यातल्या अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेले हे ४० कुटुंब वास्तव्यास आहेत.
****
राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी, हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी मदतीचं आवाहन केलं आहे. सरकारकडून या नागरिकांसाठी मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे, मात्र ही मदत पोहोचेपर्यंत समाजानं या गरजूंना मदत करावी, असं आवाहन सत्तार यांनी केलं आहे. ते म्हणाले....

सरकारची मदत येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागेल या दोन तीन दिवसांमध्ये आपल्याला संधी आहे की आपण खारीचा वाटा का होईना आपापल्या पद्धतीने अन्नधान्याची वाटप करताना कुठे कुठे गर्दी होणार नाही चार पेक्षा जास्त या सर्वांची दक्षता घ्यावी



****
औरंगाबाद इथं शिवसेनेच्या वतीनंही गरजुंना अन्नाचं वाटप करण्यात आलं, त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या अपघात विभागात सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या दोन हजार मजुर आणि गरीब जनतेला माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीनं प्रत्येकी पाच किलो गहू, तांदुळ, तसंच एक किलो तेलाचं वाटप करण्यात आलं. 
****
राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू असून विनाकारण घरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत असून, गुन्हे दाखल होत आहेत.

औरंगाबाद इथं गेल्या तीन दिवसात ७२८ जणांवर संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद पोलिसांतर्फे काल जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.
बीड शहरात खासगी वाहनचालकाला पेट्रोल दिल्यामुळे शिवाजी महाराज चौकातल्या भारत पेट्रोलियमच्या फारोळी एजन्सीच्या पेट्रोल पंपाला सील लावण्यात आलं. तहसिलदार किरण अंबेकर यांनी ही कारवाई केली.

नांदेडमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला, तर ५०हून अधिक जणांना दंड आकारण्यात आला.

नाशिक मध्ये काल अशा २५१ नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. या शिवाय दाट वस्ती, गावठाण आणि झोपडपट्टी भागात लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन चा वापर सुरू करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात संचारबंदी आदेशाचा भंग करून रस्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहेत. या नव्या इशाऱ्यामुळे आता अकारण रस्त्यावर दुचाकीवर फिरणाऱ्यांना आळा बसणार आहे.
****
संचारबंदीचा आदेश डावलून सातारा शहरात फिरणाऱ्या नागरिकांची दुचाकी वाहनं जप्त करण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला आहे. काल साताऱ्यात १०पेक्षा अधिक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
****
सांगलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभार मुंबई इथल्या जे जे रुग्णालयाच्या प्रमुख अधिष्ठाता डॉ. पल्लवी साफळे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ साफळे यांच्यासह तीन डॉक्टरांचं हे पथक काल सांगलीत दाखल झालं.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी काल सांगली इथं कोरोनाबाधितांवरच्या उपचाराचा आढावा घेतला. सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन असून, दर तासाला आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

सांगली जिल्ह्यातील २४ पेशंट पॉझिटिव्ह आहे सगळ्यांचे प्रकृती स्थिर आहे  एकाच कुटुंबातील ही सगळे आहेत त्या ठिकाणी कुटुंब राहत होते त्या परिसराचा सुद्धा आपण त्याला क्वारनटाईन केलेला आहे आणि निश्चितपणे तिथे सुरळीत सुरु आहे  सगळे डॉक्टर उपलब्ध आहे  परिस्थितीचा आढावा आपण तासातासाला घ्यायचा प्रयत्न करतो
****
संचारबंदीसाठी नियमांचं उल्लंघन करून, ९७ लोकांची एकत्रित वाहतूक करणारा ट्रक अमरावती जिल्ह्यात शिरखेड पोलिसांनी काल ताब्यात घेतला. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित ट्रक चालकावर शिरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद इथं तोंडावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या सात जणांवर, तसंच दुकानात ग्राहकांची गर्दी नियंत्रित न केल्याबद्दल दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पानटपरी व्यवसायिक आणि एका मद्य विक्रेत्यावर आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 
****
बीड जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आता सकाळी सात ते साडे नऊ या वेळेत सुरू राहणार आहेत. पूर्वी ही वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन अशी होती, मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सकाळी ९ वाजेनंतर दुकानं सुरू ठेवता येणार नाहीत, या आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात येणार आहे.
****
नांदेड शहरात संचारबंदीच्या काळात घरपोहोच किराणा सामान पुरवठा करण्यासाठी महानगर पालिकेनं नियोजन केलं आहे. शहरातल्या सहा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण १२६ किराणा दुकानदारांचे संपर्क क्रमांक सामाजिक माध्यमावर जाहीर करण्यात आले आहेत. नागरीकांनी सामान खरेदीसाठी घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कसगी इथं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तेलंगणा राज्यातले जवळपास ३०० नागरिक अडकडे आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरु असून, अद्याप काहीही निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, कसगी ग्रामपंचायातीनं काल या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
****
नांदेड इथं पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर ठिकाणाहून आलेले जवळपास तीन हजारावर भाविक अडकले असून, राज्य शासनानं विशेष व्यवस्था करुन या भाविकांना त्यांच्या घरी पाठवण्याची मागणी पत्रकार रवीद्र सिंघ मोदी यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं आश्वासन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. 
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर इथं काल समर्पण परिवाराच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबीरास भोकरच्या नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून, सामाजिक आंतर राखत दोनशे तेरा नागरिकांनी रक्तदान केलं.
उस्मानाबाद इथं भागीरथी परिवाराच्या वतीनं सह्याद्री रक्तपेढी इथं २५ जणांनी रक्तदान केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ शहरात आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन कोरोना विषाणू आजाराचे सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. चार दिवस ही मोहिम राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्हा रुग्णालयातही काल निर्जंतुकीकरण करण्यात आलं. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रुग्णालयाची पाहणी करुन विगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
****
नांदेड तालुक्यातल्या सोमेश्वर इथं काल ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. नागरिकांना प्रशासनास सहाकार्य करण्याचं आवाहन सरपंचांनी केलं आहे. 
****
जालना जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचे पंचनामे करणं आणि नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्याचं पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, टोपे यांनी काल जालना जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
****
लातूर शहर पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात महापालिकेनं बदल केला आहे. आता सर्व वसाहतींना सात दिवसाआड सुमारे दीड तास पाणी पुरवठा केला जाईल. दोन एप्रिलपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
राज्यात अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला. हिंगोली इथं मेघगर्जनेसह पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचाही अंदाज आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सातवर्षांपेक्षा कमी शिक्षा भोगत असलेल्या ८७ कैद्यांना काल अंतरिम जामीनावर सोडण्यात आलं. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर झाल्याची माहिती जिल्हा कारागृह अधिक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.
****


No comments: