Sunday, 22 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22.03.2020 TIME – 11.00 AM



आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता अन्य सर्व वाहतूक बंद असल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आवाहन करत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सामाजिक विलगीकरणाच्या माध्यमातून योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. रात्री नऊ वाजेपर्यंतच्या या चौदा तासांत घरात थांबण्याबरोबरच, जे लोक कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दोन हात करत आहेत, त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरातच विलगीकरण करुन राहण्याच्या सूचना दिलेल्या नागरिकांनी स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. राज्य शासनानं महसूल आणि पोलिस विभागाला काल याबाबतचे आदेश दिले. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला किंवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत, अशांना घरातच विलगीकरण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातल्या कारखाना विभागातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या कर्मचाऱ्यांसाठी २३७ मास्क तयार करुन दिले आहेत. भारतीय स्टेट बँकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० मास्क आणि पोलिस आयुक्तालय कार्यालयाला एक हजार २५० मास्क कैद्यांनी तयार केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोविड-एकोणीस अर्थात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी एक नवी व्यूहरचना आखत नवीन मार्गदर्शिका तयार केली आहे. सर्व रुग्णालयात जे रुग्ण श्वसनासंबंधी आजाराने त्रस्त असून ज्यांना अल्पश्वसन, ताप आणि खोकल्याचा त्रास आहे त्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या पाच ते १४ दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचीही एकदा तपासणी करण्यात येणार आहे.
****

No comments: