Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 March 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या
देशाला, कोरोनाच्या विरूद्ध लढाईसाठी, देशभर लॉक डाऊन करण्याशिवाय दुसरा कोणता
मार्गच नव्हता. कोरोनाच्या विरोधातील लढा, हा जीवन आणि मृत्यु यांच्यातील लढाई आहे
आणि या लढाईत आम्हाला जिंकायचं आहे. यासाठीच ही कठोर पावलं उचलण्यात आल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना होत असलेल्या
त्रासाची आपणाला जाणीव आहे, असंही ते म्हणाले.
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रम
मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा दहावा भाग होता. कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून बऱ्या
झालेल्या रुग्णाशी, इटलीहून भारतात आल्यानंतर विलगीकरण कक्षात राहिलेल्या नागरिकाशी
ही मोदींनी संवाद साधला. त्याचबरोबर या समस्येशी थेट दोन हात करणाऱ्या दोन डॉक्टरांकडून
पंतप्रधानांनी त्यांच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली. देशभरातील
सुमारे २० लाख डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, आशा, सफाई कामगारांसाठी
५० लाख रूपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेची घोषणा सरकारनं केली आहे, याचा
पुनरुच्चारही त्यांनी केला.
या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचेही
नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. पण होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलेल्या, पण
त्याचं पालन न करणाऱ्या कोरोना विषाणुच्या संशयितांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त
केली. या समस्येकडे आणखी गांभीर्याने पाहण्याची आणि तसंच वर्तन करण्याची गरज
असल्याचं ते म्हणाले.
****
येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत गरीबांची उपासमार होऊ
नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार
आहे. लातूर जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकांनामध्ये गहू, तांदूळ आणि डाळ उपलब्ध असेल,
अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
पालकमंत्री देशमुख यांनी लातूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार
संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली. गरज भासल्यास स्वस्त धान्य
दुकानांतून भाजीपाला, फळे, दूध, तेल, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील, असं जाधव यांनी यावेळी
सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमधल्या एकाच कुटुंबातल्या
२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या कुटुंबातल्या ७ महिन्यांच्या मुलीचा अहवाल काल
सकारात्मक आला. या सर्व रुग्णांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या
रुग्णालयात १४० रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या
इस्लामपूर इथून जवळपास ६० ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यात आले आहेत. बाधित क्षेत्रातून
हे सर्व ऊसतोड कामगार आल्यानं या सर्वांना विलगीकरण कक्षात तात्काळ भरती करण्यात आलं
आहे. माजलगाव इथल्या दोन विलगीकरण कक्षांत ३१, तर धारूर इथल्या एका विलगीकरण कक्षात
२९ जणांना ठेवण्यात आलं आहे. यातल्या एकाही कामगारास कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळून
आली नाहीत.
****
पोलीस विभागानं नांदेड शहरात संपूर्ण नाकेबंदी केली आहे.
आजपर्यंत शहरात ६० ठिकाणी बंदोबस्ताचे नाके लावण्यात आहेत. रस्त्यांवर विनाकारण येणारी
दुचाकी वाहनं जप्त करण्याची मोहीमही नांदेड पोलीसांनी सुरू केली आहे.
संचारबंदी झुगारत गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातल्या
रस्त्यांवर फिरणाऱ्या एक हजाराहून अधिक वाहनधारकांवर पोलिसांनी गेल्या २ दिवसात कारवाई
केली आहे. या वाहन मालकांवर गुन्हे दाखल करण्याची
प्रक्रिया सुरु आहे. संचारबंदी पूर्णपणे संपेपर्यंत ही वाहनं पोलीसांच्या ताब्यात असणार
आहेत. दुचाकी चारचाकी वाहनांसह अन्य वाहनांचा यात समावेश आहे.
****
संचारबंदी काळातही जीवनावश्यक बाब म्हणून जालना कृषी
उत्त्पन्न बाजार समितीमधल्या भाजी बाजार परिसरात सकाळी होणारी नियमित खरेदी-विक्री
सुरु आहे. मात्र, याठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विक्रते आणि शेतकरी
आवश्यक खबरदारी घेत नसल्याचं निदर्शनास आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या
जिंतुर तालुक्यामधल्या पोखर्णी तांडा इथं आज जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
****
अहमदनगर शहरातल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल नकारात्मक
आल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आलं. हा रुग्ण दुबईहून आला होता. चाचण्यांमधून त्याला
कोरोना झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं.
****
No comments:
Post a Comment