आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ मार्च २०२० सकाळी ११.०५
वाजता
****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र
साजरा होतो आहे. हिंदू कालगणनेनुसार आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नागरिकांनी
आज आपल्या घरावर गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं. कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी
लागू असल्याने, साधेपणानं सण साजरा होत आहे.
पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास
चाफा, गुलाब, तुळशी आणि मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि चांगले आरोग्य घेउन येईल.
अशी भावना त्यानी व्यक्त केली. तसंच कोविड -१९ सारख्या संकट काळात जनता हा उत्सव साजरा
करत आहे. या उत्सवात पारंपारिक उत्साह जरी दिसत नसला तरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा
संकल्प नक्कीच दृढ होईल. जनतेनं एकत्र येऊन कोरोनाविरूद्ध हा लढा असाच सुरू ठेवावा
अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील रजापूर गावात गुडीपाडव्याच्या दिवशी नवसाच्या बारागाड्या
ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
म्हणून ग्रामस्थांकडून ही प्रथा आज रद्द करण्यात आली. तसंच गावात बाहेर गावच्या लोकांना
प्रवेश बंद केला आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांनी ग्रामपंचायतीमध्ये
गावबंदीचा निर्णय घेतला आहे. गावाच्या वेशीवरच रस्ता बंद करण्यात आला असून गावातला
माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात
आहे. दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन आवश्यकतेसाठी
हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे. अपरिहार्य कारणास्तव
स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची व्यवस्था
केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे.
****
बाळापूर पोलिसांनी आज सकाळी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या
आखाडा बाळापूर सीमेवर पथसंचलन करून जमलेली गर्दी आटोक्यात आणली. मात्र, यानंतर कोणी
रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केल्यास बळाचा वापर करण्याचा इशाराही पोलिसांतर्फे देण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment