Saturday, 21 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.03.2020 11.00AM



आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 कोरोनाची लागण झालेले ६३ नवे रुग्ण देशभरात काल एकाच दिवसात आढळले. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या २३६ झाली आहे. राज्यातही बाधितांची संख्या ५२ वरुन ६३ वर पोहोचली आहे.

 दरम्यान, कोरोना या विषाणूचा आपल्याला संसर्ग होणार नाही, अशा भ्रमात तरुणांनी राहू नये, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तरुणांनाही रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं,असं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस अधानॉम घेब्रेयसस यांनी काल जिनिव्हा इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोनाला प्रतिबंधक करण्यासाठी तरुण स्वतःवरच जितके निर्बंध घालतील,त्यातूनच अनेक वयोवृद्धांचे प्राण वाचू शकतील असंही ते म्हणाले.सद्यस्थितीत तुम्हाला कोणताही आजार नसला, तरीही तुम्ही कुठे प्रवास करत आहात यावरच जगणं आणि मरणं अबलंबून असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
****

       चीनमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नसल्याचं ,चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं सांगितलं आहे. मात्र कोरोनाबाधित आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आयोगानं दिली आहे.
****

 कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लातूर  जिल्ह्यातल्या देशी, विदेशी, बिअर बार आणि ताडी  विक्री करणारे सर्व दुकानं , बार  आज पासून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश लातूर चे जिल्हाधिकारी  जी श्रीकांत यांनी दिले आहेत.
****

 कोल्हापूर जिल्ह्यातल्या  इचलकरंजी नगरपालिकेच्या सलग सहा सर्वसाधारण सभेला नगरसेवक संजय तेलनाडे आणि सुनील तेलनाडे गैरहजर राहिल्याच्या कारणावरून या दोघांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. इचरकंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी १जानेवारी २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल यासंबंधीचा आदेश काल जारी केला.
****

 कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदीचे आवाहन केले असले तरी रायगड जिल्ह्यातल्या जनतेनं आज आणि उद्या असे दोन दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कालपासूनच व्यापाऱ्यांनी शटर डाऊन केले आहे.आज अलिबाग आणि उरण तसेच अन्य तालुक्यातील बाजारपेठा बंद आहेत.महसळयातल्या व्यापर्यांनी आठ दिवस बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग हे  राज्यातलं मोठं पर्यटन स्थळ असलेल्या १३ मार्च नंतर अलिबागेत परदेशातून १८० व्यक्ती आलेल्या असल्याने सारेच विशेष काळजी घेतली जात आहे.
*****
***

No comments: