Sunday, 22 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज सकाळपासून १४ तासांची जनता संचारबंदी पाळण्यात येत आहे. सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनं वगळता अन्य सर्व वाहतूक बंद असल्याचं चित्र दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दोन हात करत असलेल्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी पाच वाजता देशभर नागरिकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्याचं पाहायला मिळालं. यात अनेक राजकीय पुढारी, अभिनेते आणि लोकप्रतिनिधींनीही उत्साहानं भाग घेतल्याचं चित्र दिसून आलं.
****

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून देशभरातली रेल्वे सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज ही घोषणा केली. जीवनावश्यक वस्तूंसाठी मालगाड्यांची सेवा मात्र सुरूच रहाणार आहे. मुंबईतली उपनगरीय लोकल सेवाही आज मध्यरात्रीपासून  येत्या ३१ मार्चपर्यंत बंद रहाणार आहे.
****

 राज्यात उद्या पहाटेपर्यंत जनता संचारबंदी कायम राहणार असल्याची घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज जनतेला संबोधित करत होते. गरज नसल्यास आज रात्री नऊनंतर बाहेर न पडण्याचं आवाहन त्यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे. नागरी भागात आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात आल्याचंही  ठाकरे यांनी सांगितलं. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये, असं सांगून मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, केवळ काळजी घेण्यासाठी म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.

 जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससेवा सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री सांगितलं. पुढचे पंधरा दिवस क्वारंटाईन रूग्णांनी दक्षता घेणं गरजेचं असल्याचं सांगून राज्यातल्या कोरोना चाचणी केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. अन्नधान्य, भाजीपाला, औषधी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चालू राहतील. कार्यालयात पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले. पुढील पंधरा दिवस अत्यंत काळजीचे असून, ३१ मार्च हा पहिला टप्पा आहे. गरज पडल्यास त्यात आणखी वाढ करण्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले आहेत.
****

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टपाल कार्यालयातील बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करून तयार केले जाणारे आधार आणि आयपीपीबीचे व्यवहार तात्पुरते थांबविण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात उद्यापासून केली जाणार आहे. शिवाय, वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो टपाल कार्यालयात व्यवहारासाठी ३१ मार्चपर्यंत येऊ नये, असंही जाहीर करण्यात आल्याचं डाकघर अधिक्षक बी. रविकुमार यांनी सांगितलं.
****

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात संशयित रुग्णांची कठोर तपासणी करण्यात यावी, असे आदेश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ११ मार्चपासून परदेशातून येणारे प्रवासी, मुंबई आणि पुणे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून येणारे नागरिक आणि कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.
****

 जालना इथं रशिया, युक्रेन आणि दुबईतून परतलेल्या तीन जणांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. खबरदारी म्हणून या नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईनमध्ये किंवा आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात राहण्याचं सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खादगावकर यांनी दिली आहे.

 दरम्यान, जालना बाजार समितीमधील मोसंबी आणि रेशीमकोष बाजारपेठ येत्या 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये, गैरसोय टाळावी, असं आवाहन सभापती अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
****

 कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातल्या ३२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यात परदेशातून आलेल्या १७ जणांचा आणि, परवा दुबईहून परतलेल्या महिलेसह तिच्या सहवासात आलेल्या १५ जणांचा समावेश आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपत्कालीन कायद्या अंतर्गत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बँका, औद्योगिक कारखाने आणि रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री करणार्यावर निर्बंध जाहीर केले आहेत. आता बँकेमध्ये केवळ रक्कम भरणा आणि काढण्याचीच कामे होतील. बँकेत केवळ चार ते पाच ग्राहकांना एका वेळी प्रवेश दिला जाईल. अन्य व्यवहार बंद राहतील आणि ऑनलाइन व्यवहार जास्तीत जास्त व्हावेत यासाठी बँकांनी प्रयत्न करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
****

 जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतांनाही हॉटेलमध्ये पर्यटक ठेवल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर जवळील एका हॉटेल चालकावर आज दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात सर्व व्यवहार बंद असून, नागरीक घरातच बसून असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: