Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** आगामी पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात राज्य विद्युत नियामक
आयोगाकडून जाहीर
** कोरोना विषाणू प्रार्दुभाव लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर
पीक कर्जासाठीच्या दोन टक्के व्याज सवलत आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेस
३१ मे पर्यंत मुदतवाढ
** आरोग्य आणि
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे २५ हजार
कोटी रुपयांच्या निधीची मागणी
** राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २२०; दोन जणांचा मृत्यू
** आणि
** मराठवाड्यात अवकाळी पाऊस; माजलगाव तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू
****
राज्य विद्युत नियामक आयोगानं, राज्यातल्या विविध संवर्गाकरिता
पुढील पाच वर्षांसाठी, वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात जाहीर केली आहे. आयोगाचे
अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी काल ही कपात जाहीर केली. आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई
वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर, तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी
होणार असून, घरगुती विजेकरिताचे दर, ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे
वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची
दर कपात होत असून, यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन
मिळेल, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. तथापि, वीज दरात कपात झाली म्हणून, ग्राहकांनी
विजेचा अनावश्यक वापर न करता, गरजेपुरता वापर करावा, असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं
आहे.
****
कोरोना विषाणू प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू
करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीच्या दोन टक्के
व्याज सवलत, आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेस, ३१ मे पर्यंत मुदतवाढ
देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं काल घेतला. चार टक्के व्याज दरानं, तीन लाख रूपयांपर्यंत
पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येतं. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर, बँकापर्यंत पोहाचण्यासाठी
तसंच त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ते वेळेत कर्जाची
परतफेड करू शकलेले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन, ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ
दिलेल्या कालावधीसाठी, बँका शेतकऱ्यांना कोणताही दंड आकारणार नाही. सरकार शेतकऱ्यांना
दोन टक्के व्याज सवलत, आणि तत्पर कर्जफेड केल्यास, अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत देऊन
पीक कर्जाचा पुरवठा करते.
****
केंद्र सरकारने लागू केलेल्या एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये
वाढ करण्याची, कोणतीही योजना नसल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट
केलं आहे. लॉकडाऊन वाढवलं जणार असल्याबाबत, सामाजिक संपर्क माध्यमांमधल्या वृत्ताचं,
केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी खंडन केलं. सामाजिक संपर्क माध्यमांमधून, पसरवल्या
जात असलेल्या या चर्चा निराधार असून, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
दरम्यान, पुढील आदेश मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून सूट देण्यात आली. यापूर्वी केवळ ३१ मार्च
पर्यंत सूट देण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधल्या दोन आठवड्यांचा
काळ अद्याप बाकी असून, या काळात नागरिकांनी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं, असं आवाहन,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क
माध्यमांवरून, जनतेशी बोलत होते. पुढचे काही दिवस नागरिकांनी काटकसरीची सवय लावून घ्यावी,
अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं, पोलिसांशी हुज्जत घालून गैरवर्तन करू नये,
असं आवाहनही पवार यांनी केलं. ऊसतोडणी कामगारांचं काम संपल्यावर, कारखान्यांनी कारखाना
परिसरातच, त्यांची पुढचे तीन ते चार आठवडे निवास, भोजन, तसंच वैद्यकीय उपचारांची सुविधा
करून द्यावी, अशी सूचना पवार यांनी केली आहे. नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून
विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही, त्यांनी उत्तरं दिली.
****
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर,
उद्भवलेल्या आरोग्य आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, अर्थमंत्री अजित पवार यांनी
केंद्र सरकारकडे, २५ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. पवार यांनी केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री
प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रानं वेगवगेळ्या शिर्षाखाली बाकी असलेली,
१६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकीही द्यावी, अशी मागणी केली आहे.
****
लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या, आणि परराज्यातील अडकलेल्या
कामगारांच्या व्यवस्थेसाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदेशानुसार, ४५कोटी रुपयांचा
निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे १० कोटी, तर उर्वरीत
औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक विभागासाठी, प्रत्येकी ५ कोटी निधी मंजूर करण्यात
आला आहे. विस्थापित कामगारांसाठी निवारा गृह, अन्नधान्य आणि भोजन तसंच इतर तातडीनं
करावयाच्या उपाययोजनांसाठी, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली, आपत्ती व्यवस्थापन
राज्य कार्यकारी समितीची काल बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २२० झाली
आहे. काल मुंबईत आठ, पुण्यात पाच,
नागपूर इथं दोन, तर नाशिक आणि कोल्हापूर इथं प्रत्येकी
एक, असे नवीन १७ रुग्ण आढळले. या आजारातून
आतापर्यंत ३९ जण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. तर राज्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत ७८ वर्षीय पुरुषाचा, तर पुण्यात ५२ वर्षीय
पुरुषाचा या आजारानं मत्यू झाला. त्यामुळे
राज्यात कोरोना आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या, दहा झाली
आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली.
****
स्वस्त धान्य दुकानावरील धान्य खरेदी करण्यासाठी, कोणत्याही
प्रकारचा फॉर्म, अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सामाजिक
आणि अन्य काही माध्यमावरून, अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात
काहीही तथ्य नसून, असा कोणताही निर्णय, अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला
नसल्यानं, नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी, असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असं
आवाहन, अन्न, नागरी पुरवठा विभागानं केलं आहे.
****
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात
घेऊन, औरंगाबाद इथला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठ परिसर, उस्मानाबाद
इथला उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय आणि घनसावंगीचं मॉडेल कॉलेज, येत्या १४ एप्रिलपर्यंत
संपुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात
सर्व प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी, मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल
ते प्रशासकीय काम करावं, असे निर्देशही कुलगुरूंनी दिले आहेत.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील
सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा, पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. परीक्षा रद्द झाल्याबद्दल, समाज माध्यमात प्रसारीत होत असलेले परिपत्रक खोटे
असून, सर्व संबंधितांनी, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिलेली माहितीच अधिकृत
समजावी, असं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातून, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं दाखल
झालेल्या, कामगार महिला,
पुरुष आणि लहान मुलांची, जिल्हा परिषद
शाळेत व्यवस्था करण्यात आली. बदनापूर इथल्या स्वयंसेवी संस्थांनी, प्रशासनाच्या मदतीनं सर्व कामगारांची, जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर संबंधित कारखान्याचे मालक, या सर्व कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची
जबाबदारी घेऊन, शेंद्रा इथं घेऊन गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरात
सकाळी अकरानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी
स्वतः शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या महसूल,
तलाठी, वाहन चालक कर्मचारी संघटना तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी, एका दिवसाचं
वेतन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर
काल सादर केलं. संघटनेच्या वतीनं दहा लाख रूपये या निधीस देण्यात आल्याचं, संघटनेचे
अध्यक्ष नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्याचे
खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी, आपल्या खासदार
निधीतून एक कोटी रुपये निधी, आणि आपलं एका महिन्याचं एक लाख रुपये वेतन, पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिलं आहे. निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही,
आपल्या स्थानिक विकास निधीतून, एक कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं आहे. आरोग्य
सुविधांच्या उपलब्धतेसाठी हा निधी असून, गरज भासल्यास आणखी निधी देऊ, असं आमदार निलंगेकर
यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा
तालुक्यात सुधीर राठोड यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी, सामाजिक अंतर ठेवून, गरजू
लोकांना धान्य वाटप केलं. कळमनुरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी,
सहकाऱ्यांच्या मदतीनं, वयोवृद्ध, निराधार आणि गरजू मजुरांना धान्यासह आवश्यक साहित्याचं
वाटप केलं.
****
लातूर शहरातल्या सर्व अठरा प्रभागांमध्ये उद्यापासून
जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. दररोज पाच ते सहा प्रभागांमध्ये सकाळी सात ते बारा
आणि दुपारी चार ते संध्याकाळी सात या दरम्यान फवारणी होईल. येत्या आठ तारखेपर्यंत फवारणीचे
तीन टप्पे होणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
परभणी शहरात महापालिकेकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत
असून, आरोग्य विभागामार्फत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दवाखाना बंद ठेवणाऱ्या
डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दवाखान्यांचा दररोजचा
अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत
कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी काही सोयी सुविधा तातडीनं तयार करण्यात येत आहे. या
सुविधांसाठी वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आपत्कालीन निधीमधून दोन कोटी सतरा लाख रुपये खर्चास
जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात
येणार असून रुग्णवाहिका, मालट्रक, छोट्या मालवाहू वाहनांची तपासणी करूनच शहरात प्रवेश
दिला जाणार आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक
प्रवासी वाहतुकीला मुळीच परवानगी नसून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिस विभाग
संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही शहरात फिरणाऱ्या
दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
लातूर शहरातल्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी सामाजिक प्रसार माध्यमातून केलं आहे. कायदा
आणि सुव्यवस्थेचे पालन करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन गुरुनाथ मगे यांनी केलं
आहे. बीड तसंच परभणी इथंही रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
****
संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद
शहरात सत्तेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेकजण शहराच्या
विविध भागात विनाकारण तसंच तोंडावर मास्क न बांधता फिरत असल्याचं आढळून आलं. काही दुकानदारांनी
विनाकारण आपली दुकानं उघडी ठेवली होती, तर काही रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून रिक्षात
गर्दी करून फिरताना आढळून आले. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत
शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अद्याप
आढळलेला नाही, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून अंतर योग्य अंतर राखावं,
असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे
येणाऱ्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह येत आहे, मात्र तरीही नागरिकांनी आवश्यक असेल
तेव्हा, योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर यावं, असं त्यांनी सांगितलं. सकाळच्या वेळी फिरण्याचा
व्यायामही टाळावा, घरीच व्यायाम करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. अफवांवर नागरिकांनी
विश्वास ठेवू नये, सुमारे महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू जिल्ह्यात उपलब्ध
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या युवकांच्या बचत गटानं मुख्यमंत्री सहाय्यता
निधीसाठी दोन लाख रूपये दिले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे
दोन लाख रूपयांचा धनादेश या युवकांनी सुपुर्द केला.
मुंबईतले खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई शहर आणि उपनगर
भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या संघटनांनी
जिल्ह्यातल्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा २४
तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी केलं
आहे. लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात दवाखाने बंद असल्यामुळं आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातल्या
नागरिकांची गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुगळीकर यांनी हे
आवाहन केलं आहे.
****
परभणी महानगरपालिके मार्फत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या
विलंब शास्तीवर देण्यात आलेल्या सवलतीची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत
आज संपणार होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या
अनुषंगाने शासनानं राज्यात संचार बंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरीकांना कराचा
भरणा करण्यासाठी इच्छा असूनही करांचा भरणा करता आलेला नाही, त्यामुळे ही मुदत वाढवण्यात
आल्याचं मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितलं.
****
जालना शहरात जुना जालना भागातल्या भाजीमंडईत होणारी गर्दी
टाळण्यासाठी हा बाजार आता सकाळी सहा ते बारावाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते आठवाजेपर्यंतचं
सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यांचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत
ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. बीड इथं रोटरी क्लब आणि भारतीय जैन संघटनेनं एकत्रित येऊन आजपासून रक्तदान
शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर उद्यापर्यंत चालणार आहे.
परभणी इथंही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून
काल यात ३० जणांनी रक्तदान केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा आणि सोनपेठ इथं दोन दिवसांच्या
सलग सुट्ट्यानंतर काल शेतकऱ्यांसह नागरिकांनी बँकेमध्ये गर्दी केली होती. मात्र बँकेच्या
प्रशासनाने नागरिकांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याची जाणीव करून देत बँकेच्या दरवाजापासून
एका-एका ग्राहकास बँकेत बोलावून व्यवहार पूर्ण केले. केंद्र शासनाच्या विविध योजने
अंतर्गत खात्यात पैसे जमा झाले आहेत का? हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात
गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं दर सोमवारी भरणारा आठवडी
बाजार भाजी विक्रेत्यांनी प्रशासनची नजर चुकवून काल दुसऱ्या ठिकाणी भरवला. या बाजारात
शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही बाब पोलीस प्रशासन आणि
नगरपालिकेच्या लक्षात येताच हा बाजार बंद करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात आंतरराज्यीय बासर
नाक्यावर तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेल्या ५४ कामगारांना ताब्यात घेण्यात आलं असून
त्यांना धर्माबाद इथल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. हे सर्व कामगार नांदेड
जिल्ह्यातले रहिवाशी आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसर
प्रशासनानं वाहतुकीस बंद केला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात
घरोघर जाऊन माहिती संकलित करत आहेत. मात्र या भागातले नागरिक सहकार्य करत नसल्याची
तक्रारी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या भागाची पाहणी
केली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजात
योग्य अंतर राखण्याचा नियम पाळला जात आहे. शेतातली आवश्यक कामंही योग्य अंतर राखून
पूर्ण केली जात आहेत.
****
कोल्हापूर इथल्या
कोळंबा मध्यवर्ती कारागृहातले ३५ कैदी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मास्कची निर्मिती
करत आहेत. या कारागृहाकडे विविध ठिकाणांहून तीस हजार मास्कची मागणी करण्यात आली आहे.
या मागणी आणि पुरवठ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे वार्ताहर -
कारागृह तीस हजार मास्क ची मागणी विविध ठिकाणाहून
नोंदवण्यात आली आणि गेल्या वीस दिवसात या कैद्यांनी पंचवीस हजाराहून अधिक मास्क ची
निर्मिती पाणीपुरवठा करून ही मागणी पूर्णत्वास आणली आहे बाजारात पंचवीस ते पन्नास रुपयाला
मिळणारे मास्क हे कैदी केवळ बारा रुपये प्रति
नग या दराने उपलब्ध करून देत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रवींद्र कुलकर्णी
****
कोरोना विषाणू संदर्भात संभ्रम निर्माण करणारे
संदेश पसरवल्यास ग्रुप ॲडमिनविरूद्ध गुन्हा
दाखल करण्याचा इशारा राज्याच्या पोलिस यंत्रणेनं दिला आहे. त्यामुळे कोणीही एप्रिल फूल म्हणून पसरवू नये, असं आवाहन करण्यात
आलं आहे. उद्या एक एप्रिल रोजी एकमेकांना एप्रिल फूल करुन त्याचा आनंद
साजरा करण्याची पद्धत आहे, मात्र यंदा कोरोना विषाणू संदर्भात
अफवा पसरतील, असे संदेश पसरणार नाहीत आणि प्रशासनावर ताण निर्माण
होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करणारं पत्र पोलिसांतर्फे जारी करण्यात
आलं आहे.
****
लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी भाडेकरू कामगारांना घरातून
बाहेर काढू नये, असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. कोणत्याही
आस्थापनांनीही कामगारांना कामावरून कमी करू नये, असं आवाहनही डॉ शिंदे यांनी केलं आहे.
इतर राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी सुमारे चार हजारावर कामगार आलेले आहेत.
या सर्वांना जिल्हा प्रशासनानं मदत शिबिरात निवारा उपलब्ध करुन दिला असून त्यांना अन्न,
पाणी, वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली
****
एक फेब्रुवारी पासून मुदत संपलेल्या वाहन परवाना, आणि
नोंदणीला ३० जुन पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं काल याबाबत निर्णय
घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाड्यात काल सर्वत्र अवकाळी पावसानं हजेरी
लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या
काही भागात काल रात्री पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातल्या परभणी, पूर्णा, पालम,
गंगाखेड, जिंतूर तालुक्यात काल रात्री वादळी वारा,
विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातल्या नाखलगाव इथं वीज
पडून एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
परळी जवळच्या गोपीनाथ गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह
पाऊस झाल्यानं घरांवरची पत्रे उडून गेली, अनेक भागात झाडं उन्मळून
पडली.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहरासह वसमत, कुरुंदा, सेनगाव,
कळमनुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातल्या परतूर, मंठा, घनसावंगी,
तीर्थपुरी, राणीउंचेगाव, श्रीष्ठी या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस
झाला. भारडी शिवारात मोसंबी पिकाचं मोठं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस
झाला. या अवकाळी पावसानं
आंबा, कांदा, गहू पिकांचं, तसंच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
****
No comments:
Post a Comment