Friday, 27 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 27 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्यामुळे, रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपचारादरम्यान कोरोनाग्रस्ताच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा होतो, आणि त्यानंतर रुग्णाला सुटी मिळते, त्यामुळे कोरोना बरा होतोच, हे सर्वांनी लक्षात घ्यावं, असं टोपे यांनी सांगितलं.
सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्यामुळे आता बाहेरच्या बाधित देशातून संसर्ग होण्याचा धोका नाही, मात्र देशातल्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका संभवतो, त्यामुळे सर्वांनी समाजाच्या थेट संपर्कात येणं टाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. पीपीई किंवा एन ९५ प्रकारचे मास्क रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने वापरणं आवश्यक आहे, इतरांनी साधे मास्क वापरणं देखील पुरेसं असल्याचं, टोपे यांनी स्पष्ट केलं.
****
गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. या लॉकडाऊनच्या काळात, आर्थिक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकाने आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा, असं आवाहन पवार यांनी केलं. कोरोना प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांनाही पवार यांनी उत्तरं दिली.
*****
रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना, कर्ज हप्त्यांच्या वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे उद्योग व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल, त्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी पन्नास लाख रुपये मदत दिली आहे.
****
कोल्हापूर शहरात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण रहिवासी असलेल्या मंगळवार पेठ भक्ती पूजा नगर परिसराची स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी कोल्हापूर महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचं अमरावती शहरात २४ दुकानदारांनी उल्लंघन केलं आहे. बंदी असूनही काही दुकानदारांनी दुकाने उघडल्याने गर्दी झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर या २४ दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रूग्णालयाला भेट दिली. उपचारासाठी आवश्यक साहित्याची प्रशासनाने सरकारकडे मागणी केली आहे. चव्हाण यांनी सर्व संबंधितांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घाटी प्रशासनाला अत्यावश्यक वस्तूंची त्वरीत पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
****
अमरावती जिल्ह्यात धारणी, चिखलदरा तहसील अंतर्गत अंगणवाडीतल्या ३ ते ६ वर्षे वयोगटातल्या ३१ हजार आदिवासी बालकांना घरबसल्या पोषण आहार देण्यात येत आहे. मागील दहा दिवसापासून ही योजना बंद होती मात्र आजपासून १५ मे पर्यंत पोषण आहार घरपोच मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****


No comments: